अमेरिकेत पुन्हा मंदीची भीती
- अमेरिकेत पुढील दोन वर्षांत म्हणजे २०२० आणि २०२१मध्ये मंदीसदृश स्थिती निर्माण होण्याचा धोका आहे, असे मत एका पाहणीत दिसून आले आहे. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मात्र ही शक्यता पूर्णपणे फेटाळली आहे. अमेरिकेतील अर्थव्यवस्थेचे चित्र संमिश्र झाले असल्याचे इतरही काही अमेरिकी अहवालांमध्ये म्हटले आहे.
- ‘नॅशनल असोसिएशन फॉर बिझीनेस इकॉनॉमिस्ट’ या संस्थेने ही पाहणी केली असून तिचा अहवाल सोमवारी जाहीर झाला. या पाहणीत म्हटले आहे की, २०१८ मध्ये व्याजदरात केलेली वाढ कमी करून फेडरल रिझव्र्ह या मध्यवर्ती बँकेने ठोस संदेश दिला आहे. सध्यातरी या बँकेच्या काही उपाययोजनांमुळे मंदीसदृश स्थिती रोखली गेली आहे.
- या वर्षीच मंदी सुरू होण्याची शक्यता २ टक्के अर्थतज्ज्ञांनी वर्तवली आहे. एनएबीईचे अध्यक्ष कॉन्सटन्स हंटर यांनी सांगितले की, पुढील वर्षीच मंदी सुरू होईल असे ३८ टक्के अर्थतज्ज्ञांना वाटते, तर ती २०२१ मध्ये सुरू होईल, अशी ३४ टक्के तज्ज्ञांची अटकळ आहे. ४६ टक्के अर्थतज्ज्ञांना फेडरल रिझर्वकडून आणखी एक दरकपात अपेक्षित आहे. अमेरिका आणि चीन यांच्यात नाममात्र का होईना, पण समझोता होईल आणि कोंडी फुटेल, अशी आशा ६४ टक्के अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
बालेश शर्मा यांचा व्होडाफोन-आयडियाच्या सीईओ पदाचा राजीनामा
- व्होडोफोन- आयडियाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पदाचा बालेश शर्मा यांनी वैयक्तीक कारणामुळे राजीनामा दिला आहे. कंपनीकडून सांगण्यात आले आहे की, त्यांच्या जागी व्होडाफोन समूहाचे भारतातील प्रतिनिधी रवींद्र टक्कर यांना तत्काळ प्रभावाने एमडी आणि सीईओपदी नियूक्त करण्यात आले आहे.
- व्होडाफोन-आयडियाच्या विलिनीकरणापासून शर्मा हे सीईओ पदावर होते. त्या अगोदर त्यांच्याकडे सीओओ पदाची जबाबदारी होती. तसेच, व्होडाफोन-आयडियाने सांगितले की, बालेश यांनी संयुक्त व्यवसायाची रणनीती तयार होण्यापासून चालविली आहे.
- रवींद्र टक्कर हे सध्या व्होडाफोन-आयडिया आणि इंडस टॉवरचे बोर्ड मेंबर आहेत. शिवाय भारतातील व्होडाफोन समूहासाठी देखील ते जबाबदार आहेत. २०१७ पासून ते या पदावर आहेत. सध्याच्या त्यांच्यावरील जबाबदारी पूर्वी ते व्होडाफोन रोमानियाचे तीन वर्षे सीईओ आणि लंडनमध्येही व्होडाफोन पार्टनर मार्केटचे सीईओ होते. ते १९९४ पासून व्होडाफोन समुहामध्ये आहेत.
आंतरराष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धा – हिमाचे सुवर्णयश!
- चेक प्रजासत्ताक येथे झालेल्या अॅथलेटिकी मिटिंक रेयटर आंतरराष्ट्रीय स्पध्रेतील ३०० मीटर शर्यतीत महिलांमध्ये हिमा दासने आणि पुरुषांमध्ये मोहम्मद अनासने सुवर्णपदकाची कमाई केली.
- २ जुलैपासून हिमाने युरोपीयन शर्यतींमध्ये मिळवलेले हे सहावे सुवर्णपदक ठरले. यापैकी पाचवे सुवर्ण तिने चेक प्रजासत्ताकमधील नोव्हे मेस्टो येथे झालेल्या ४०० मीटर शर्यतीत जिंकले होते. ‘‘चेक प्रजासत्ताक येथील अॅथलेटिकी मिटिंक रेयटर स्पध्रेत ३०० मीटर शर्यतीत अग्रस्थान मिळवले,’’ असे ‘ट्वीट’ हिमाने शनिवारी स्पर्धा जिंकल्यानंतर केले.
- अनासने ३२.४१ सेकंद वेळ नोंदवत पुरुषांचे सुवर्णपदक प्राप्त केले. त्याने ‘ट्विटर’वर म्हटले आहे की, ‘‘अॅथलेटिकी मिटिंक रेयटर २०१९ स्पध्रेच्या ३०० मीटर शर्यतीचे ३२.४१ सेकंदांच्या वेळेसह सुवर्णपदक मिळाल्याचा अत्यंत आनंद होत आहे.’’
ज्येष्ठ संगीतकार खय्याम यांचे निधन
- ‘उमराव जान’, ‘कभी-कभी’ यांसारख्या चित्रपटांमधून अजरामर संगीताची अमूल्य भेट श्रोत्यांना देणारे ज्येष्ठ संगीतकार खय्याम यांचे मुंबईतील सुजय रुग्णालयात हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते.
खय्याम यांच्या निधनाने भारतीय संगीतविश्वातील एक अनमोल हिरा काळाच्या पडद्याआड गेला आहे