Current Affairs 20 February 2018
1) राज्य सरकारमधील कर्मचा-यांना 4 टक्के वाढीव महागाई भत्ता
राज्य सरकारमधील कर्मचा-यांना 4 टक्के वाढीव महागाई भत्ता देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. 1 जुलै 2017 पासून ही वाढ देण्यात असून, यामुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर सुमारे 100 कोटी रूपयांचा बोजा पडणार आहे. राज्य सरकारमध्ये कार्यरत असलेल्या 19 लाख लोकांना आणि निवृत्त अधिकरी- कर्मचारी यांना याचा लाभ होईल. उद्या किंवा परवा होणा-या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याची घोषणा केली जाईल. राज्य सरकार केंद्र सरकारच्या नियमावलीप्रमाणे वर्षातून दोनदा म्हणजे 1 जानेवारी आणि 1 जुलै या तारखांना महागाई निर्देशांकानुसार भत्यामध्ये घट किंवा वाढ करते. सध्या राज्य सरकारमधील कर्मचा-यांना 136 टक्के महागाई भत्ता मिळत आहे. आता 4 टक्के वाढीमुळे तो 140 टक्क्यांवर जाईल.
2) पायलटरहित लढाऊ विमाने
भारत देश पहिले पायलटविरहित लढाऊ विमान तयार करण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे. ‘घातक’ नावाच्या या प्रकल्पासाठी सुमारे दशकभराहून अधिक काळ पडद्यामागून हालचाली सुरू होत्या. याचे प्रोटोटाइप ‘स्विफ्ट’ बांधण्याच्या अंतिम टप्प्यात आहे.मार्च २०१९ पर्यंत या विमानाची पहिली चाचणी होईल. त्यानंतर विमान बांधणीचे काम सुरू होईल. या प्रकल्पावर डीआरडीओ व एअरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी काम करत आहे. याची निर्मिती संपूर्ण देशभरात सुरू आहे. घातकचे एअरफ्रेम डिझाइन आयआयटी कानपूरच्या सहकार्याने एअरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी तयार करत आहे. प्रारंभिक डिझाइन तयार झालेले आहेत. यात एक अंतिम होईल. यात ‘स्टेल्थ गुण’ असतील. म्हणजे याचा आकार व बनावट रडारला चकमा देणारी असेल. यासाठी डीआरडीओच्या हैदराबाद येथील लॅब ‘ऑरेंज’(आऊटडोअर रडार क्रॉस सेक्शन टेस्ट मेजरमेंट फॅसिलिटी)ची मदत घेण्यात आली आहे. तसेच भारतात विकसित ‘कावेरी इंजिन’चा यात वापर होणार आहे. डीआरडीओच्या लॅबमध्ये या इंजिनाची चाचणी याआधी यशस्वी झाली नव्हती. यासाठी फ्रान्सची मदत घेण्याचे ठरले. याच्या कमकुवत बाजूवर काम करून ते कार्यान्वित करण्याची योजना होेती.
3) आध्यात्मिक गुरू बुशरांशी इम्रान खानचा निकाह
माजी क्रिकेटपटू आणि पाकिस्तानच्या तेहरीक- ए- इन्साफ पार्टीचे प्रमुख इम्रान खान यांनी रविवारी बुशरा मानेका यांच्याशी तिसरा निकाह केला. बुशरा या त्यांच्या अाध्यात्मिक गुरू आहेत. पिंकी पीर नावाने त्या प्रसिद्ध आहेत. तिसरा विवाह केल्यानंतरच इम्रान यांना पंतप्रधानपदाचा योग आहे, असे भविष्य बुशरा यांनी वर्तवले होते. यापूर्वी इम्रान यांनी ब्रिटिश वंशाच्या जेमिमा गोल्डस्मिथ आणि रेहम खानशी निकाह केले होते. इम्रान खान यांनी यापूर्वी 1995 मध्ये ब्रिटिश अब्जाधीशाची कन्या जेमिमा हिच्याशी विवाह केला. जेमिमाकडून इम्रान यांना दोन अपत्ये आहेत. 2004 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. 2015 मध्ये इम्रान यांनी दुसऱ्यांदा विवाह केला. ते ब्रिटिश टीव्ही अँकर रेहाम खानच्या प्रेमात पडले होते. वर्षभराच्या आत त्यांच्यात तलाक झाला.
4) भारताच्या ‘चांद्रयान-2’ मोहीमेचा खर्च हॉलिवूड चित्रपटापेक्षाही कमी
भारताच्या आगामी चांद्रयान-2 मोहीमेचा खर्च हॉलिवूडच्या ‘इंटस्टेलर’ या चित्रपटापेक्षाही कमी असल्याची बाब समोर आली आहे. इंटरस्टेरल या चित्रपटाच्या निर्मितीसाठी 1,062 कोटींचा खर्च आला होता. मात्र, भारताची चांद्रयान-2 मोहीम अवघ्या 800 कोटींमध्ये पार पडणार आहे. यापूर्वीची भारताची 2013 मधील मंगळयान मोहीमही कमी खर्चामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चेचा विषय ठरली होती. या मोहीमेसाठी 470 कोटी रूपये खर्च झाला होता. त्यावेळी प्रदर्शित झालेल्या ‘ग्रॅव्हिटी’ या हॉलिवूडपटाचे बजेटही ( 644 कोटी) या मोहीमेपेक्षा जास्त होते. भारतीय अंतराळ अवकाश संस्थेने (इस्त्रो) इतक्या कमी खर्चात मोहीम पार पाडल्याबद्दल आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे खूप कौतुकही झाले होते.
5) सिंगापूर प्रत्येक नागरिकास देणार बोनस
सिंगापूर सरकारने अर्थसंकल्पातील शिलकी रकमेतून देशातील २१ वर्षे व त्याहून अधिक वयाच्या प्रत्येकाला ‘बोनस’ देण्याची घोषणा केली आहे. नागरिकांना त्यांच्या करपात्र उत्पन्नानुसार १०० ते ३०० सिंगापूर डॉलर (४९०० रुपये ते १४ हजार ७०० रुपये) एवढी रक्कम बोनस म्हणून मिळेल. वित्तमंत्री हेंग स्वी किएत यांनी १० अब्ज सिंगापुरी डॉलर शिलकीचा अर्थसंकल्प मांडताना सुमारे ७०० दशलक्ष सिंगापुरी डॉलर नागरिकांना ‘बोनस’ म्हणून वाटण्याची घोषणा केली. सुमारे २७ लाख नागरिकांना तो मिळेल. चालू वित्तीय वर्ष संपण्यापूर्वी त्याचे वाटप होईल. या बोनसचे वर्णन मंडारियन भाषेत ‘हाँगबाओ’ असे केले आहे. याचा अर्थ विशेष आनंदाप्रसंगी दिली जाणारी रोख बक्षीस रक्कम. सिंगापूरच्या आर्थिक प्रगतीत प्रत्येक नागरिकास सहभागी करून घेण्याची सरकारची प्रतिबद्धता यातून दिसून येते, असे हेंग म्हणाले.
MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी Mission MPSC ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.