स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी
1) स्मार्ट सिटी योजनेत 99 शहरांचा समावेश
केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी स्मार्ट सिटी योजनेच्या चौथ्या टप्प्यात नऊ शहरांची निवड करण्यात आली आहे. यासोबतच या योजनेसाठी देशभरातून निवडण्यात आलेल्या शहरांची संख्या ९९ झाली आहे. चौथ्या टप्प्यात निवडलेल्या शहरांमध्ये राज्यातील एकाही शहराचा समावेश नाही. उत्तर प्रदेशातील मोरादाबाद, बरेली व सहारनपूरसह तामिळनाडूतील एरोडे, बिहारमधील बिहार शरीफ, दादरा व नगर हवेलीतील सिल्वासा, दमण व दीवमधील दीव, लक्षद्विपमधील कावारट्टी व अरुणाचल प्रदेशमधील इटानगर या शहरांची स्मार्ट सिटी योजनेसाठी निवड करण्यात आल्याचे केंद्रीय गृहनिर्माण व शहर मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी सांगितले. यासह स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत निवडलेल्या देशभरातील शहरांची संख्या ९९ झाली आहे. या योजनेनुसार निवडलेल्या प्रत्येक शहराला केंद्राकडून विविध प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी ५०० कोटींचा निधी दिला जाणार आहे. या योजनेअंतर्गत १ लाख ४० हजार कोटींच्या ३००० प्रकल्पांची अंमलबजावणी केली जात असल्याचेही पुरी यांनी सांगितले. स्मार्ट सिटी योजनेत राज्यातील औरंगाबाद, पिंपरी चिंचवड, नाशिक, ठाणे, नागपूर, कल्याण, सोलापूर व पुणे या शहरांचा अगोदरच समावेश झालेला आहे.
२) घरगुती वापराच्या पाणीपट्टीत 17% तर औद्योगिकसाठी 50 टक्के वाढ
तब्बल सात वर्षांनंतर महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने राज्यातील ग्रामपंचायतींपासून ते महापालिकांपर्यंतच्या पाणीपट्टीचे दर वाढवले असून घरगुती वापरासाठी सुमारे १७ टक्के आणि औद्योगिक वापरासाठी ५० टक्क्यांपर्यंत पाणीपट्टी वाढवण्यात आलेली आहे. एक हजार लिटरमागे ग्रामपंचायतींना १३.२ पैशांवरून १५ पैसे, नगरपालिकांसाठी १५.८ पैशांवरून १८ पैसे, महापालिकांसाठी २१ पैशांवरून २५ पैसे, तर टाऊनशिपसाठी २१ पैशांवरून १.२५ रुपये इतकी दरवाढ करण्यात आली आहे. मिनरल वॉटर, शीतपेये, बिअर उत्पादक उद्योगांसाठी सर्वाधिक १६ रुपयांवरून १२० रुपये इतकी वाढ करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र जलसंपदा नियामक प्राधिकरणाचे अध्यक्ष के. पी. बक्षी यांनी शुक्रवारी दिली. पाणी वापरासाठीचे सुधारित दर आगामी १ फेब्रुवारी २०१८ पासून, तर सिंचनासाठीचे सुधारित दर आगामी उन्हाळी हंगाम २०१८ पासून लागू होणार आहेत. वैयक्तिक शेतकऱ्यांसाठी पाण्याचा दर खरीप, रब्बी व उन्हाळी हंगामासाठी अनुक्रमे प्रति एक हजार लिटरसाठी ४.५० पैसे, ८ पैसे आणि १३.५० पैसे राहणार असून पाणी वापर स्थापनेस प्रोत्साहन देण्यासाठी या दरात २५ टक्के सूट देण्यात आलेली आहे. तसेच सूक्ष्म सिंचनासाठीही या दरामध्ये २५ टक्के प्रोत्साहनात्मक सूट देण्यात आली आहे.
३) संसदीय सचिवपदी राहिलेले ‘आप’चे 20 आमदार अपात्र
निवडणूक आयोगाने केजरीवाल सरकारला झटका देत आपच्या २० आमदारांना लाभाचे पद स्वीकारल्याबद्दल दोषी ठरवले. त्यांना अपात्र ठरवण्याची शिफारसही राष्ट्रपतींकडे केली. १३ मार्च २०१५ ते ८ सप्टेंबर २०१६ दरम्यान हे आमदार संसदीय सचिव होते. केजरीवाल सरकारने २१ अामदारांना संसदीय सचिव केले. एका अामदाराने सचिवपद नंतर साेडले. हायकाेर्टाने २०१६ मध्ये सर्व नियुक्त्या रद्द केल्या. यात आदर्श शास्त्री, अलका लांबा, अनिल वाजपेयी, अवतारसिंह, गहलोत, मदनलाल, मनोजकुमार, नरेश यादव, एन. त्यागी, पी. कुमार, राजेश गुप्ता, राजेश ऋषी, संजीव झा, सरिता सिंह, सोमदत्त, शरदकुमार, शिवचरण गोयल, सुखबीरसिंग, विजेंद्र गर्ग, जर्नेलसिंग यांचा समावेश आहे. घटनेच्या कलम १०२(१)(अ) व कलम १९१ (१)(अ) तसेच लोकप्रतिनिधी कायदा कलम ९ (अ) मध्येही आमदारांना इतर लाभाचे पद भूषवण्यास व त्याचे वेगळे वेतन व भत्ते घेण्यास मनाई आहे.
४) गुजरातच्या आनंदीबेन पटेल यांची मध्य प्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती
गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांची मध्य प्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली. गुजरातचे राज्यपाल ओ. पी. कोहली यांच्याकडे सध्या मध्य प्रदेशच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार आहे. अानंदीबेन पटेल मध्य प्रदेशच्या दुसऱ्या महिला राज्यपाल ठरल्या. यापूर्वी सरला ग्रेवाल यांनी मार्च १९८९ ते फेब्रुवारी १९९० दरम्यान हे पद सांभाळले हाेते. पटेल यांच्या निवडीत लाेकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांची महत्त्वाची भूमिका असल्याचे मानले जाते.
५) जगाला मिळाला नवा युसेन बोल्ट
वाऱ्याच्या वेगाने धावणारा जमैकाचा विश्वविक्रमी धावपटू युसेन बोल्ट निवृत्त झाल्यानंतर, ट्रॅक अँड फिल्डवरचा नवा हिरो कोण, याबद्दल तमाम क्रीडाप्रेमींना उत्सुकता होती. त्या सगळ्यांना आता नवा ‘युसेन बोल्ट’ सापडला आहे आणि तो आहे अमेरिकेचा सुस्साट धावपटू क्रिस्टियन कोलमन. 60 मीटरची इनडोअर शर्यत अवघ्या 6.37 सेकंदांत पूर्ण करून त्यानं नव्या विश्वविक्रमाची नोंद केली आहे. अमेरिकेचाच धावपटू मॉरिस ग्रीनने दोन वेळा 60 मीटरची शर्यत 6.39 सेकंदांत पूर्ण केली होती. 1998 मध्ये त्याने हा विक्रम रचला होता. त्यानंतर, तब्बल 20 वर्षांनी तो मोडण्याचा पराक्रम अमेरिकेच्याच क्रिस्टियन कोलमननं करून दाखवलाय. 21 वर्षीय कोलमनने गेल्या वर्षी यूएस इनडोअर स्पर्धेदरम्यान जगभरातील क्रीडाप्रेमींचं लक्ष वेधून घेतलं होतं. 100 मीटरची शर्यत 9.82 सेकंदांत पूर्ण करत त्याने आपली क्षमता दाखवून दिली होती. आणखी थोडी मेहनत घेतल्यास तो युसेन बोल्टच्या विक्रमाच्या जवळ जाऊ शकतो किंवा तो विक्रम मोडूही शकतो, असं अनेकांना वाटलं होतं. त्या दिशेनं त्याची वाटचाल सुरू असल्याचे संकेत या 60 मीटर शर्यतीने दिले आहेत.
MSPC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी Mission MPSC ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्रामवर फॉलो करा.