⁠
Uncategorized

चालू घडामोडी – २० जून २०१६

देश-विदेश

संरक्षण, नागरी विमान वाहतूक क्षेत्रात १०० टक्के थेट परकीय गुंतवणुकीला मंजुरी
# देशातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणारा निर्णय केंद्र सरकारने सोमवारी घेतला असून, परकीय गुंतवणूक धोरणामध्ये बदल करण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली उच्चस्तरिय बैठकीमध्ये नव्या धोरणावर शिक्कामोर्तब करण्यात आले. परकीय गुंतवणुकीचे धोरण अधिक सुटसुटीत आणि मुक्त करण्यात आले असून, भारतात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांसाठी त्याचा फायदा होईल, असे केंद्र सरकारने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. अधिकाधिक परकीय गुंतवणूक झाल्यामुळे विकासाला आणि रोजगार निर्मितीला चालना मिळणार असल्याचेही सरकारने स्पष्ट केले. मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारने नोव्हेंबर २०१५ मध्ये परकीय गुंतवणूक धोरणामध्ये बदल केले होते. त्यानंतर दुसऱ्यांदा या धोरणामध्ये मोठे फेरबदल करण्यात आले आहेत.

संरक्षण क्षेत्रातील परकीय गुंतवणूक १०० टक्क्यांवर
सध्या संरक्षण क्षेत्रामध्ये ४९ टक्क्यांपर्यंत थेट परकीय गुंतवणुकीला परवानगी होती. आता यापुढे ४९ टक्क्यांपुढील परकीय गुंतवणूक केंद्र सरकारच्या परवानगीने करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नागरी विमान वाहतूक
आतापर्यंत नागरी विमान वाहतूक क्षेत्रातही ४९ टक्क्यांपर्यंत थेट परकीय गुंतवणुकीची मुभा होती. नव्या निर्णयानुसार केंद्र सरकारच्या पूर्वसंमतीने ४९ टक्क्यांपुढेही परकीय गुंतवणूक करता येणार आहे. अनिवासी भारतीय नागरिकांसाठी १०० टक्के थेट परकीय गुंतवणुकीची परवानगी देण्यात आली आहे.

औषधनिर्मिती
औषधनिर्मितीमधील नव्या प्रकल्पांमध्ये थेट १०० टक्के परकीय गुंतवणुकीला मंजुरी देण्यात आली असून, जे प्रकल्प सध्या सुरू आहेत तेथे ४९ टक्क्यांपेक्षा जास्त परकीय गुंतवणूक करायची असेल तर त्याला केंद्र सरकारची परवानगी घेणे आवश्यक करण्यात आले आहे.

परराष्ट्र सचिवांची चीनला भेट
# अणुपुरवठादार गटाचे सदस्यत्व भारताला मिळावे यासाठी पूरक वातावरण तयार करण्यासाठी परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांनी चीनला अनौपचारिक भेट दिली. १६ व १७ जूनला ते चीनला गेले होते. चीनने भारताच्या एनएसजी सदस्यत्वास विरोध केला असून, त्या देशाचे मन वळवण्याचा प्रयत्न करण्यात आला. एनएसजी देशांच्या गटाची २४ जूनला सोल येथे बैठक होत असून, तेथे भारताने एनएसजी सदस्यत्वासाठी केलेल्या अर्जावर विचार होणार आहेय त्याच्या एक आठवडा आधीच जयशंकर यांनी चीनला भेट दिली.

भारत जगातील सर्वांत खुली अर्थव्यवस्था – मोदी
# नवी दिल्ली – संरक्षण, हवाई प्रवास आणि औषधनिर्मिती क्षेत्रामध्ये 100% थेट परकीय गुंतवणुकीच्या (एफडीआय) सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या पार्श्‍वभूमीवर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (सोमवार) यामुळे भारत आता जगामधील सर्वांत खुली अर्थव्यस्था झाल्याचे स्पष्ट केले. “”आज झालेल्या बैठकीमध्ये सुधारणा कार्यक्रमासंदर्भातील अत्यंत संवेदनशील निर्णय घेण्यात आले. या निर्णयांमुळे होणाऱ्या बदलामुळे भारतामध्ये रोजगारनिर्मितीस मोठ्या प्रमाणात चालना मिळेल,‘‘ असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

इतिहास रचण्यासाठी “इस्रो’ सज्ज
# श्रीहरीकोटा, ता. 20 : पीएसएलव्ही-सी34 या प्रक्षेपकाच्या साह्याने एकाच वेळी तब्बल वीस उपग्रह अवकाशात सोडण्यासाठी भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) 48 तासांचे काउंटडाऊन सुरू केले आहे. बावीस जूनला सकाळी 9.26 वाजता येथील सतीश धवन अवकाशकेंद्रावरून हे प्रक्षेपण होणार आहे. याआधी पीएसएलव्ही-सी9 च्या साह्याने “इस्रो‘ने 2008 मध्ये एकाच वेळी दहा उपग्रह अवकाशात सोडले होते. मात्र, ते सर्व एकाच कक्षेत सोडले होते.

1228 किलो : उपग्रहांचे एकूण वजन
5 : देशांचे उपग्रह (भारत, अमेरिका, कॅनडा, जर्मनी, इंडोनेशिया)

एकाच वेळी सोडलेले उपग्रह
33 : रशिया (2014)
29 : नासा (2013)
20 : भारत (2016)

क्रीडा

भारताच्या अन्नू राणी, शिवपालला सुवर्ण
# बुडापेस्ट (हंगेरी) : राष्ट्रीय विक्रम नोंदविणाऱ्या अन्नू राणी आणि शिवपाल सिंग यांनी बुडापेस्ट ओपन स्पर्धेत रविवारी भालाफेक प्रकारात सुवर्णपदक पटकावले. हिला गटात अन्नू राणी हिने 57.24 मीटर भालाफेक करत सुवर्णपदकावर नाव कोरले. भारताच्याच सॅफ क्रीडा स्पर्धा विजेती सुमन देवी हिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. तिने 55.38 मीटर भाला फेकला. पुरुष गटातही भारताने सुवर्ण आणि रौप्यपदक मिळविले. शिवपालने 76.74 मीटर भाला फेकत सुवर्णपदकाला गवसणी घातली. त्याचा सहकारी रजिंदरसिंग रौप्यपदकाचा मानकरी ठरला.

पुरुष रिले चमूला सुवर्ण
# किरगिझस्तानमध्ये शिश्‍केक येथे आजच झालेल्या स्पर्धेत पुरुषांच्या 4 बाय 100 रिले संघाने सुवर्णपदक पटकावले. याच शर्यतीत महिला विभागात भारतीय संघ रौप्यपदकाचा मानकरी ठरला. महिलांच्या शंभर मीटर शर्यतीत द्युती चंदने रौप्यपदक मिळविले.

दीपिका – अतानूला अखेर रौप्यच
# मुंबई : अंताल्या विश्‍वकरंडक तिरंदाजी स्पर्धेची सांगता दुहेरी यशाने करण्याचे दीपिका कुमारीचे स्वप्न भंगले. भारतास सांघिक ब्रॉंझपदकाच्या लढतीत हार पत्करावी लागली; तसेच मिश्र दुहेरीच्या अंतिम लढतीत कोरियास कडवी लढत दिल्याचे समाधानच भारतास लाभले. दीपिका कुमारी व अतानू दास या भारतीय जोडीने प्राथमिक फेरीत सहावे मानांकन मिळवले होते; पण बाद फेरीच्या लढतीत सरस प्रतिस्पर्ध्यांना हरवत त्यांनी अंतिम फेरी गाठली होती. पण चोई मिसुन व कु बॉनचान या अव्वल मानांकित कोरियाच्या जोडीने भारतीयांचा झंझावात 5-1 असा रोखला. भारतास या लढतीत 33-36, 36-36, 37-38 अशी हार पत्करावी लागली.

Related Articles

Back to top button