Current Affairs 20 March 2020
माजी सरन्यायाधीश रंजन गोगोईंची राज्यसभेत शपथ
राष्ट्रपतींनी राज्यसभेवर नामनियुक्त केलेले माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांना राज्यसभेत शपथ दिली. राज्यसभेचे राष्ट्रपतीनियुक्त सदस्य के.टी.एस. तुलसी यांचा कार्यकाळ संपल्याने रिक्त झालेल्या जागेवर त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यसभेत सभापती वेंकय्या नायडू यांनी गोगोई यांचे शपथविधीसाठी नाव पुकारताच विरोधी बाकांवरील सदस्यांनी विरोधात घोषणा देऊन निषेध केला.
निर्भयाच्या चारही दोषींना फाशी
निर्भया प्रकरणातील चार दोषी मुकेश सिंह, पवन गुप्ता, विनय शर्मा आणि विनयकुमार सिंह यांना आज, शुक्रवारी पहाटे साडेपाच वाजता तिहार तुरुंगात फासावर चढविले जाणार आहे. एकाच वेळी चार आरोपींना फाशीची शिक्षा ठोठावली जाण्याची ही पहिलीच वेळ असेल. निर्भयाला ७ वर्षांनी न्याय मिळाला.
दोषींना फाशी देण्यासाठी पवन नावाच्या जल्लादाला पाचारण करण्यात आले असून त्याला प्रत्येक फाशीसाठी १५ हजार रुपये मिळणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून ‘जनता कर्फ्यू’ची घोषणा
‘जागतिक संकट बनलेल्या करोनाचा फैलाव रोखण्यासाठी येत्या रविवारी, २२ मार्च रोजी १३० कोटी भारतीयांनी सकाळी ७ ते रात्री ९दरम्यान ‘जनता कर्फ्यू’चे पालन करून घराबाहेर पडण्याचे टाळावे’, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी रात्री देशाला उद्देशून केलेल्या संबोधनात केले. ‘करोनासारख्या जागतिक साथीच्या रोगाचा सामना करताना संकल्प आणि संयम या दोन गोष्टी आवश्यक असून, तो दाखविण्याची वेळ आली आहे’, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.
जगातल्या ज्या देशांमध्ये करोना व्हायरस आणि त्याचा प्रभाव जास्त आहे तिथे अचानक करोनाचं संकट गहिरं झालं आहे. करोनाग्रस्तांची संख्या त्या देशांमध्ये वेगाने वाढली आहे. भारत सरकार या स्थितीबाबत नजर ठेवून आहे. भारताची लोकसंख्या १३० कोटीच्या घरात आहे. आपण विकासासाठी प्रयत्नशील देश आहोत. आपल्या देशावर आलेलं हे संकट साधंसुधं नाही असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. प्रत्येकाने संयम ठेवला पाहिजे आणि संकल्प केला पाहिजे की केंद्र आणि राज्य सरकारच्या निर्देशांचं पालन करु.
Coronavirus: रुपयाची ऐतिहासिक घसरण; प्रथमच घसरला ७५ च्या खाली
करोनाचा परिणाम जसा जागतिक बाजारपेठेवर दिसत आहे, तसाच तो देशातील बाजारपेठेवरही दिसू लागला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शेअर बाजाराच्या पडझडीचं सत्र सुरू आहे. गुरूवारीही शेअर बाजाराच्या निर्देशांकात मोठी घसरण पाहायला मिळाली होती. त्यानंतर आता डॉलरच्या तुलनेत रूपयाही घसल्याचं दिसत आहे. गुरूवारी इतिहासात पहिल्यांदाच डॉलरच्या तुलनेत रूपयाची मोठी घसरण होऊन तो ७५ रूपये प्रति डॉलर्सवर पोहोचला.
देशात करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होत असून याच पार्श्वभूमीवर गुरुवारी गुंतवणुकदारांकडून देशाच्या आर्थिक स्थितीबद्दलची भिती आर्थिक व्यवहारांमध्ये व्यक्त झाली. अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची मागणी घटल्याचा परिणाम रूपयावर झाल्याचं पहायला मिळालं. आपल्या अर्थव्यवस्थेवरही इतर देशांच्या अर्थव्यवस्थेप्रमाणे करोनाचं सावट पसरलं आहे. याचीच भीती गुंतवणुकदारांच्या मनात असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार देशात सध्या करोनाचे १६९ रूग्ण सापडले आहेत. तर जगभरात करोनामुळे ९ हजारांपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
का होतेय रूपयाची घसरण?
शेअर बाजारात होणारी घसरण आणि परदेशी गुंतवणुकदारांकडून सुरू असेलेलं विक्रीचं सत्र यामुळे व्यापाऱ्यांची चिंता वाढली आहे. या परिस्थितीत मागील सत्राच्या तुलनेत गुरूवारी रूपयाची किंमत ७० पैशांनी घसरून तो ७४.९६ च्या स्तरावर उघडला. बुधवारी अखेरच्या सत्रात रूपया डॉलरच्या तुलनेत ७४.२६ वर बंद झाला होता.
काय आहेत कारणं ?
रूपयाची घसरण होण्याचं प्रमुख कारण कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमती आहेत. भारत कच्च्या तेलाची आयात करणारा एक प्रमुख देश आहे. भारताला कच्च्या तेलाची रक्कम डॉलर्समध्ये फेडावी लागते. तर दुसरीकडे परदेशी गुंतवणुकदारांकडून होणारी विक्री हेदेखील रूपयाची किंमत घसरण्याचं प्रमुख कारण आहे.