चालू घडामोडी : २० मार्च २०२१
संयुक्त राष्ट्राकडून जगातील सर्वात आनंदी देशांची यादी जारी
सलग चौथ्या वर्षी फिनलँड हा जगातील सर्वात आनंदी देश ठरला आहे. संयुक्त राष्ट्राकडून जगातील सर्वात आनंदी देशांची यादी जारी करण्यात आली.
संयुक्त राष्ट्राकडून जारी करण्यात आलेल्या या यादीत १४९ देशांचा समावेश करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे आनंदी देशांच्या यादीत भारताचा क्रमांक पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका या देशांपेक्षाही खाली आहे.
१४९ देशांच्या यादीत भारताला १३९ क्रमांक मिळालाय.
ही यादी जाहीर करताना देशाची जीडीपी, सामाजिक सुरक्षा, व्यक्तिगत स्वातंत्र्य, भ्रष्टाचार अशा विविध मुद्द्यांवर पश्न विचारले जाऊन हॅपीनेस स्कोर तयार केला जातो. यानुसार पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ या देशांमधील नागरिक भारतीय नागरिकांपेक्षा जास्त आनंदी आहेत.
चीन या यादीत ८४ व्या स्थानी, पाकिस्तान १०५ , नेपाळ ८७ व्या स्थानी तर बांगलादेश आणि श्रीलंका अनुक्रमे १०१ आणि १२९ व्या स्थानी आहे. फिनलँडने पहिला क्रमांक पटकावला असून फिनलँडच्या खालोखाल डेन्मार्क दुसऱ्या स्थानावर आहे.
तर, स्वित्झर्लंड, आईसलँड आणि नेदरलँड या देशांनी अनुक्रमे तिसरा, चौथा आणि पाचवा क्रमांक मिळवलाय. जगातील सर्वात श्रीमंत देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकेलाही या यादीत पहिल्या १० देशांमध्ये स्थान मिळालेलं नाही. जगातील सर्वात आनंदी देशांमध्ये अमेरिकेचा १९ वा क्रमांक आहे.
कॅथेड्रल सर्वात सुंदर, ताजमहाल ८ व्या स्थानी
रूफिंग मेगास्टोअर या संस्थेने वैज्ञानिकदृष्ट्या जगातील सर्वात सुंदर ५० इमारतींची यादी जारी केली आहे.
त्यात लंडनचे सेंट पॉल्स कॅथेड्रल ही सर्वात सर्वात सुंदर इमारत मानली आहे.
इमारतीचे केंद्र, बनावट आणि वय हे त्यासाठीचे निकष ठेवण्यात आले होते.
भारतातील ताजमहल हे ८ व्या स्थानी आहे
विकास दर १२ टक्के!
चालू, वर्ष २०२१ मध्ये भारतीय अर्थव्यवस्था १२ टक्के वेगाने प्रवास करेल, असा विश्वास मूडीज या अमेरिकी वित्तसंस्थेच्या विश्लेषकांनी व्यक्त केला आहे.
देशाच्या वाढत्या अर्थव्यवस्थेसाठी पूरक पतधोरण आणि वित्तीय धोरणे निमित्त ठरतील, असे कारण देण्यात आले आहे. जोडीला रिझव्र्ह बँकेचे रेपो दर ४ टक्क्यांखाली येणार नाहीत, असा दावाही करण्यात आला.
गेल्या वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेचा प्रवास उणे ७.१ टक्के राहिला आहे. मात्र नजीकच्या कालावधीत अर्थव्यवस्थेतील उभारीची चिन्हे दिसत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
आधीच्या (जुलै-सप्टेंबर २०२०) तीन महिन्यांतील उणे ७.५ टक्क्यांच्या तुलनेत ऑक्टोबर ते डिसेंबर २०२० मध्ये भारताचा विकास दर सकारात्मक, ०.४ टक्के राहिल्याकडे मूडीजने लक्ष वेधले आहे. प्राप्तिकरातील कपातीसारख्या सरकारच्या प्रत्यक्ष आर्थिक सुधारणांचा अर्थव्यवस्थेला फारसा हातभार लागणार नाही, अशीही शंका व्यक्त करण्यात आली आहे.
भारताच्या देशांतर्गत, बाहेरील मागणीतही सुधार होत असून टाळेबंदी शिथिलीकरणामुळे हे घडल्याचे आंतरराष्ट्रीय वित्तसंस्थेचे विश्लेषक नमूद करतात. गेल्या काही महिन्यांपासून देशातील निर्मिती क्षेत्रातही वाढ होत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.