हवाई दलाच्या MI-35 हेलिकॉप्टरवरुन SANT क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
भारतीय हवाई दलाच्या एमआय-३५ हिंद गनशिप हेलिकॉप्टरवरुन सोमवारी स्टँड ऑफ अँटी टँक (SANT) क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करण्यात आली.
ओडिशाच्या समुद्र किनाऱ्यावर ही चाचणी घेण्यात आली.
SANT हे हवेतून मारा करणारं क्षेपणास्त्र आहे. डीआरडीओच्या ‘इमरत’ या संसोधन संस्थेच्यावतीने आणि भारतीय हवाई दलाच्या सहकार्याने या क्षेपणास्त्राची निर्मिती करण्यात आली आहे.
७ ते ८ किमी रेंज असलेल्या हेलिना क्षेपणास्त्राची ही सुधारित आवृत्ती असून नव्या SANT क्षेपणास्त्राची रेंज १५ ते २० किमी आहे.
भारतीय हवाई दल (IAF) आणि भारतीय लष्करातील एव्हिएशन कॉर्प्स (AAC) यांची एकत्रितरित्या ४,००० SANT क्षेपणास्त्राची गरज आहे. सन २०२१ च्या शेवटापर्यंत ही मागणी डीआरडीओकडून पूर्ण करण्यात येणार आहे.
एएलएच रुद्र एमके ४ आणि हलकी लढाऊ हेलिकॉप्टर्सच्या ताफ्यांसाठी SANT हे हवेतून मारा करणारे रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र विकसित करण्यात आलं आहे.
सर्वात शक्तिशाली देशांमध्ये भारताचा चौथा क्रमांक कायम
आशिया पॅसिफिक भागात सर्वात शक्तिशाली देशांमध्ये भारताचा चौथा क्रमांक कायम आहे.
सिडनीतील लोवी इन्स्टिट्यूटने आशिया पॉवर इंडेक्स २०२० जाहीर केला आहे.
या यादीत यंदाही अमेरिका अव्वल आहे. मात्र, आशिया पॅसिफिक भागात त्याची पकड सैल होत आहे. चीनचा प्रभाव वाढत आहे. अहवालात अमेरिका, चीन आणि जपाननंतर भारताचा क्रमांक आहे.
भारताला चीनच्या आर्थिक आउटपुटच्या ४०% पोहोचण्यात अजून दहा वर्षे लागतील असा संस्थेचा अंदाज आहे. गेल्या वर्षी अंदाज होता की, भारत २०३० पर्यंत चीनच्या आर्थिक आउटपुटच्या ५०% पर्यंत पोहोचेल.
करोनावरील संभाव्य उपचारासाठी भारतीय वंशाच्या मुलीस पुरस्कार
भारतीय वंशाच्या अमेरिकी मुलीस करोनावरील संभाव्य उपचार पद्धतीसाठी २५ हजार डॉलर्सचा तरुण वैज्ञानिक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
अनिका छेब्रोलू ही टेक्सासमधील फ्रिस्को येथे आठव्या इयत्तेत शिकत असून तिने ‘थ्री एम यंग सायंटिस्ट’ चॅलेंज स्पर्धेत भाग घेतला होता.
तिने सिलिको पद्धतीने औषधी रेणू शोधण्याची पद्धत प्रस्तावित केली असून हा रेणू सार्स सीओव्ही २ म्हणजे करोना विषाणूच्या घातक प्रथिनाला जाऊन चिकटतो. थ्री एम ही अमेरिकेतील उत्पादन कंपनी आहे.
छेब्रोलू हिला गेल्या वर्षी इन्फ्लुएंझा झाला होता त्यावेळी तिने त्यावर उपाय शोधण्याचे ठरवले होते पण नंतर करोनाचा नवीन विषाणू आला त्यामुळे तिने त्यावर लक्ष केंद्रित केले. यात तिला थ्रीएमच्या वैज्ञानिकांनी औषध कसे विकसित करतात याचे प्रशिक्षण दिले.
यावर्षीच्या ‘थ्रीएम’ तरुण शास्त्रज्ञ स्पर्धेतील १० अंतिम उमेदवारांत तिचा समावेश होता. यात तिला थ्री एमच्या वैज्ञानिक डॉ. महफूझा अली यांचे मार्गदर्शन लाभले.
नासा आणि नोकिया चंद्रावर 4G नेटवर्क स्थापित करण्यासाठी आखताय योजना
अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासा आणि जगातील आघाडीची मोबईल आणि नेटवर्क क्षेत्रातील कंपनी नोकिया चंद्रावर 4G नेटवर्क स्थापित करण्यासाठी योजना आखत आहेत.
नोकियाची संशोधन शाखा असलेली ‘बेल लॅब्ज’ या कंपनीला नासाने चंद्रावर अॅडव्हान्स्ड टिपिंग पॉईंट तंत्रज्ञानाद्वारे मोबाईल नेटवर्क निर्माण करण्याच्या कामासाठी प्रमुख पार्टनर म्हणून निवडले आहे.
या प्रकल्पासाठी १४.१ मिलियन डॉलरचा निधी देखील मंजूर करण्यात आला आहे.
याद्वारे चंद्रावर पहिले वायरलेस नेटवर्क प्रस्थापित करण्यात येणार आहे. 4G/LTE तंत्रज्ञानापासून याला सुरुवात होणार असून ते 5G तंत्रज्ञानामध्ये देखील रुपांतरीत करण्यात येणार आहे.