देश-विदेश
उत्तराखंडमधील राष्ट्रपती राजवट हायकोर्टाकडून रद्दबातल
उत्तराखंडमधील लोकनियुक्त सरकार राष्ट्रपती राजवट लागू करून खाली खेचण्याचा केंद्र सरकारचा निर्णय तेथील उच्च न्यायालयाने गुरुवारी रद्दबातल ठरवला. उत्तराखंडमध्ये लावण्यात आलेली राष्ट्रपती राजवट सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी दिलेल्या निर्णयांच्या विरोधात असल्याचेही उत्तराखंड उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. न्यायालयाच्या निर्णयामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील केंद्र सरकारला मोठा झटका बसला आहे. उत्तराखंडमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी केंद्र सरकारने ज्या मुद्द्याचा वापर केला, तो त्यांना हवाच होता, असेही निरीक्षण न्यायालयाने नोंदविले. उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती के. एम. जोसेफ आणि न्या. व्ही. के. बिस्त यांनी हा निकाल दिला.
न्यूयॉर्कमधील लढतीत क्लिंटन, डोनाल्ड ट्रम्प विजयी
अमेरिकी अध्यक्षीय उमेदवारीच्या निवडणुकीतील न्यूयॉर्कच्या प्रतिष्ठेच्या लढतीत घरच्या मैदानावर डोनाल्ड ट्रम्प व हिलरी क्लिंटन यांनी विजय मिळवले, त्यामुळे या निवडणुकीत दोघांचा वरचष्मा कायम राहिला आहे.आता त्यांना उमेदवारी मिळणार हे जवळपास निश्चित झाले आहे.
सीमाप्रश्नी चीन-भारत चर्चेची १९ वी फेरी
चीन व भारत यांच्यात वादग्रस्त सीमा प्रश्नावर चर्चेची एकोणिसावी फेरी आज घेण्यात आली. जैश ए महंमदचा प्रमुख मौलाना मसूद अझर याच्यावर संयुक्त राष्ट्रांनी बंदी घालून र्निबध लागू करावे या भारताच्या प्रस्तावात चीनने कोलदांडा घातल्याने दोन्ही देशातील संबंध ताणले गेले असताना ही चर्चा झाली. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोव्हल व त्यांचे चीनमधील समपदस्थ यांग जेइशी यांनी द्विपक्षीय पातळीवर सीमा प्रश्नी चर्चा केली. सीमा प्रश्नाच्या व्यतिरिक्त वादग्रस्त द्विपक्षीय, प्रादेशिक व आंतरराष्ट्रीय मुद्देही चर्चेला होते. चीनने या वर्षी लागोपाठ दुसऱ्यांदा पाकिस्तानच्या दहशतवादी नेत्यांविरोधात कारवाईसाठी भारताने केलेल्या प्रयत्नात खीळ घातली आहे.
महाराष्ट्र
त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गर्भगृहात केला प्रवेश
स्वराज्य संघटनेच्या प्रमुख विनीता गुट्टेंसह अन्य महिलांनी गुरूवारी सकाळी त्र्यंबकेश्वर मंदिरातील गर्भगृहात प्रवेश केला. आज सकाळी पावणेसहाच्या सुमारास कडेकोट बंदोबस्तात या महिलांनी गर्भगृहात प्रवेश करून त्र्यंबकेश्वराला अभिषेक घातला. गेल्या काही दिवसांपासून महिलांना गर्भगृहात प्रवेश देण्यास मंदिर प्रशासन आणि ग्रामस्थ विरोध करत होते. याच कारणावरून स्वराज्य महिला संघटना आणि मंदिर प्रशासनासह स्थानिकांमध्ये बुधवारी हातघाई झाली होती.
अजित जोशी ‘प्राईम मिनिस्टर अॅवॉर्ड फॉर अॅडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सलन्स’ने सन्मानित
मूळचे सोलापूरचे व सध्या चंदीगडचे जिल्हाधिकारी असलेल्या अजित जोशी यांना ‘पंतप्रधान सर्वोत्कृष्ट प्रशासकीय कामगिरी’ पुरस्कार गुरुवारी प्रदान करण्यात आला. जनधन योजनेची सर्वात प्रभावी अंमलबजावणी केल्याबद्दल नरेंद मोदी यांनी जोशी यांचे कौतुक करत त्यांना पुरस्कार प्रदान केला. हरियाणा केडरमध्ये काम करणाऱ्या जोशी यांची आजवरची कारकीर्द अत्यंत प्रभावी ठरली आहे.
क्रीडा
उत्तेजकांप्रकरणी स्वतंत्र लवाद
‘उत्तेजक सेवन न करणाऱ्या खेळाडूंना सन्मानाने खेळता यावे या दृष्टीने आम्ही उत्तेजक प्रतिबंधक समितीद्वारे उत्तेजकात दोषी ठरलेल्या खेळाडूंवर तसेच त्यांच्या देशांवरही कडक कारवाई करीत आहोत. दोषी खेळाडूंवरील कारवाईबाबत स्वतंत्र लवाद समिती नियुक्त केली आहे व ऑलिम्पिक स्पर्धेनंतर ही समिती स्वतंत्ररीत्या खेळाडूंच्या तक्रारी व खटल्यांचे निराकरण करेल,’ असे आंतरराष्ट्रीय समितीचे अध्यक्ष थॉमस बॅच यांनी सांगितले. साने येथे आयोजित परिषदेत बॅच बोलत होते.
अर्थव्यवस्था
‘डब्लूटीओ’च्या निर्णयाविरोधात भारत मागणार दाद
लंडन – भारतामधील सौर कंपन्यांबरोबर येथील सरकारने केलेले करार हे आंतरराष्ट्रीय व्यापार संकेतांचे उल्लंघन करणारे असल्याच्या जागतिक व्यापार संघटनेच्या (डब्ल्यूटीओ) समितीने दिलेल्या निर्णयाविरोधात अपील करणार असल्याचे सरकारने आज (बुधवार) स्पष्ट केले.