Current Affairs 21 April 2020
कच्च्या तेलाच्या किंमतीत ऐतिहासिक घसरण
आज कमॉडिटी बाजारात खनिज तेलाचा भाव इतिहासात पहिल्यांदाच शून्याखाली गेला आहे. अचानक तेलाचा भाव शून्यखाली कोसळल्याने अमेरिका, रशियासह आखाती देशांमधील खनिज तेल उत्पादक देशांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.
यापूर्वी दुसऱ्या महायुद्धानंतर १९४६ मध्ये खनिज तेलाच्या भावात इतकी मोठी घसरण झाली होती.
मंगळवारी वेस्ट टेक्सास क्रूडचा भाव मंगळवारी उणे ३७.६३ डॉलर प्रती बॅरल इतका खाली कोसळला. याचा अर्थ खनिज तेलाची साठवणूक करणे जिकरीचे बनल्याने विक्रेत्यांनी खरेदीदारांना प्रती बॅरल ३७.६३ डॉलर दिले. करोना रोखण्यासाठी जवळपास निम्मे देशांत अघोषित टाळेबंदी आहे. अशा स्थितीत वाहतूक व्यवस्था, उद्योग धंदे ठप्प आहेत. परिणामी खनिज तेलाच्या मागणीत प्रचंड घट झाली आहे.
टॉम अँड जेरीचे दिग्दर्शक जीन डाइच यांचे निधन
ऑस्कर पुरस्कार विजेते रेखाचित्रकार आणि टॉम अॅन्ड जेरीचे दिग्दर्शक जीन डाइच (वय ९५) यांचे नुकतेच निधन झाले. १६ एप्रिल रोजी चेक प्रजासत्ताकमधील प्राग शहरात त्यांची प्राणज्योत मालवली.
चेक प्रजासत्ताकमधील जीन यांचे प्रकाशक पीटर हिमेल यांनी डाइच यांच्या मृत्यूच्या वृत्तास दुजोरा दिला. त्यांचा जन्म ८ ऑगस्ट १९२४ रोजी शिकागोत झाला, त्यांचे पूर्ण नाव युजीन मेरिल डाइच असे होते. त्यांनी काही लोकप्रिय अॅनिमेशन पटांचे दिग्दर्शन केले. त्यात, पॉपिये द सेलर मॅन, मुन्रो, टॉम टेरिफिक अँड नुडनिक यांचा समावेश होता. त्यांनी टॉम अँड जेरीच्या १३ भागांचे दिग्दर्शन केले. ‘पॉपिये द सेलर’ मालिकेतील अनेक भाग त्यांनी दिग्दर्शित केले होते. १९५९ मध्ये ते प्राग येथे दहा दिवसांच्या दौऱ्यावर आले असता झडेन्का हिच्या प्रेमात पडले, तिच्याशी विवाह करून ते प्राग येथे स्थायिक झाले.
डाइच यांना उत्कृष्ट लघु अॅनिमेशनपटासाठी १९६० मध्ये मुन्रोच्या रूपाने ऑस्कर पुरस्कार मिळाला होता. याच प्रवर्गात त्यांना १९६४ मध्ये ‘हिअर इज नुडिक’ व ‘हाउ टू अॅव्हॉइड फ्रेंडशिप’ या अॅनिमेशनपटांसाठी नामांकन मिळाले होते. ‘सिडनीज फॅमिली ट्री’ या मालिकेचे ते सह निर्माते होते त्यासाठी त्यांना १९५८ मध्ये ऑस्कर नामांकन मिळाले होते.
बीएमडब्ल्यूचे सीईओ रुद्रतेज सिंह यांचे निधन
बीएमडब्ल्यू ग्रुप इंडियाचे अध्यक्ष अाणि सीईअाे रुद्रतेज सिंह (४६) यांचे साेमवारी हृदयविकाराने निधन झाले. गेल्याच वर्षी त्यांनी नवीन पदभार सांभाळला हाेता. गेल्या तीन दशकांपासून ते वाहन उद्याेगात कार्यरत हाेते.