स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी
अमेरिकेवर आर्थिक संकट, सरकार ‘शटडाऊन’
अमेरिकी सिनेटने पाच वर्षांनंतर पहिल्यांदाच लघुमुदतीच्या खर्चाचे विधेयक फेटाळल्याने सरकारी कामकाज बंद झाले आहे. याला ‘शटडाऊन’ असे म्हटले जाते. डोनाल्ड ट्रम्प यांना सत्तेवर येऊन एक वर्ष पूर्ण होत असतानाच ही नामुष्की ओढवली आहे. रात्री १२ वाजून १ मिनिटाने काही रिपब्लिकन सदस्य डेमोक्रॅटिक सदस्यांना जाऊन मिळाले त्यामुळे ट्रम्प प्रशासनाची आर्थिक कोंडी करण्यात त्यांना यश आले. लघुमुदतीचे खर्च विधेयक त्यामुळे मंजूर झाले नाही. परिणामी, आता पेंटॅगॉन व संघराज्य संस्थांचे आर्थिक व्यवहार बंद झाले.
अनेक द्विपक्षीय बैठका होऊनही अर्थपुरवठय़ासाठीचे विधेयक मंजूर होऊ शकले नाही. १६ फेब्रुवारीपर्यंतच्या तात्पुरत्या खर्चासाठी हे विधेयक मांडले होते, त्याच्या संमतीसाठी ६० मते मिळणे आवश्यक होते, पण ती मिळाली नाहीत व सिनेटमध्ये हे विधेयक ५० विरुद्ध ४८ मतांनी फेटाळले गेले. यात १६ फेब्रुवारीच्या अर्थसंकल्पापर्यंत आर्थिक गरजा भागवण्यासाठी तात्पुरते खर्च विधेयक मांडले जात असते ते फेटाळले गेले तर शटडाऊन म्हणजे अमेरिकेचे सरकारी आर्थिक व्यवहार ठप्प होत असतात.
भारताने अंधांचा क्रिकेट विश्वचषक जिंकला
अंधांच्या विश्वचषक स्पर्धेत भारताने शनिवारी पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा पराभव करत विश्वषचकावर आपले नाव कोरले. शारजा येथे झालेल्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा दोन गडी राखून पराभव केला. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर विजयासाठी ३०८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. भारताने हे आव्हान दोन गडी राखून पार केले.
सर्वंकष आर्थिक विकासात महाराष्ट्र देशात अव्वल
सर्वंकष आर्थिक विकासात देशात अग्रेसर राज्याचा मान महाराष्ट्राने मिळविला आहे. “ग्रोथ इनोव्हेशन लीडरशिप इंडेक्स फॉर इकॉनॉमिक डेव्हपलमेंट इन इंडिया’ याबाबत “फ्रोस्ट सॉलिव्हॅन’ या जागतिक संघटनेच्या वतीने करण्यात आलेल्या संशोधनातून महाराष्ट्राला प्रथम क्रमांक मिळाला आहे. देशातील 29 राज्यांचे 100 निर्देशकांच्या माध्यमातून संशोधन करण्यात आले. “फ्रोस्ट सॉलिव्हॅन’ संस्थेचे जागतिक अध्यक्ष अरूप झुत्शी यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन राज्याचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्रदान केला.
या संशोधनाच्या माध्यमातून देशातील 29 राज्यांचा आर्थिक विकास या संबंधी संशोधन करण्यात आले. त्यासाठी प्रमुख दहा मापदंडाच्या आधारे संशोधन करण्यात आले असून त्यात संगणकीकरण, आर्थिक समृद्धी, शैक्षणिक कौशल्य, प्रशासनातील परिणामकारकता, गुंतवणूक क्षमता, महिला सबलीकरण, पायाभूत विकास, रोजगार कार्यक्षमता, आरोग्य सुधारणा आणि दळणवळणाच्या सुविधा या निकषांच्या आधारे अभ्यास करून एकूणच सर्वंकष आर्थिक विकासात महाराष्ट्र प्रथम क्रमांकाचे राज्य ठरले आहे.
MSPC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी Mission MPSC ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्रामवर फॉलो करा.