देश-विदेश
‘कांउन्टर इन्सर्जन्सी ॲण्ड अँन्टी टेररिस्ट स्कूल’ स्थापण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी
# महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी यांना नक्षलविरोधी व दहशतवादविरोधी लढ्यामध्ये समर्थपणे भूमिका बजावण्यासाठी सुराबर्डी (नागपूर) येथील अपारंपारिक अभियान प्रशिक्षण केंद्रात ‘कांउन्टर इन्सर्जन्सी ॲन्ड अँन्टी टेररिस्ट स्कूल’ स्थापन करण्यास मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. जंगल टॅक्टीस, फिल्ड क्रॉम्प्ट, जंगल फिल्ड, मॅप रिडींग, शस्त्र हाताळणी, दहशतवाद व नक्षलवाद विरोधी मोहिमा आदी विषयामध्ये राज्यातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पारंगत करण्यासाठी ‘कांउन्टर इन्सर्जन्सी ॲन्ड अँन्टी टेररिस्ट स्कूल’ कार्यरत राहणार आहे. याबाबत केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला होता. त्यानुसार पूर्णपणे राज्यशासनाच्या अखत्यारित असलेले हे विद्यालय विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान, नागपूर) यांच्या अधिपत्याखालील कार्यरत होईल.
एनएसजी प्रवेशाबाबत चीनची भूमिका
# आण्विक पुरवठादार गटातील (एनएसजी) समावेशाबाबत भारताला जो न्याय दिला जाईल तोच पाकिस्तानलाही लागू करावा, अशी अनपेक्षित भूमिका आता चीनने घेतली आहे. चीन सरकारचे मुखपत्र असणाऱ्या ‘ग्लोबल टाईम्स’मधून ही भूमिका मांडण्यात आली आहे. पाकिस्तानचा अणवस्त्रप्रसाराबाबतचा नकारात्मक भूतकाळ त्यांच्या ‘एनएसजी’मधील समावेशासाठी आडकाठी बनला आहे. मात्र, अणुशास्त्रज्ञ अब्दुल कादीर खान यांच्या अणवस्त्र प्रसाराला पाकिस्तान सरकारचा पाठिंबा नव्हता, असे सांगत चीनने पाकची बाजू उचलून धरली आहे. खान यांना त्यांच्या कृत्याबद्दल पाकिस्तानने शिक्षादेखील केली होती. त्यामुळे एनएसजी प्रवेशाबाबत भारताला सूट देण्यात येत असेल तर पाकिस्तानलाही तोच न्याय लागू झाला पाहिजे, असे चीनचे म्हणणे आहे. चीनकडून पहिल्यांदाच भारताच्या एनएसजी प्रवेशाच्या मुद्द्यावरून इतक्या उघडपणे भूमिका घेण्यात आली आहे. भारताच्या एनएसजी गटात समावेश करण्याला चीन आणि अन्य काही देशांचा विरोध आहे. भारताचा या गटात समावेश झाल्यास मोठी समस्या निर्माण होऊ शकते. त्यापेक्षा भारताने पाकिस्तानच्या साथीने या गटात प्रवेश केल्यास ते अधिक योग्य ठरेल, असे ‘ग्लोबल टाईम्स’मधील लेखात म्हटले आहे.
वेगवान महासंगणकाच्या यादीत पहिले दोनही क्रमांक चीनला
# चीनचा नवा सनवे तायहूलाइट हा महासंगणक जगात सर्वात वेगवान व कार्यक्षम ठरला आहे. तो ९३ पद्म (पद्म-१ वर पंधरा शून्य) आकडेमोडी सेकंदाला करू शकतो. सनवे तायहूलाइट संगणक नॅशनल रीसर्च सेंटर ऑफ पॅरलल कम्प्युटर इंजिनियरिंग अँड टेक्नॉलॉजी या संस्थेने तयार केला असून त्यात चीननिर्मित संस्कारक वापरले आहेत. चीनमधील नॅशनल सुपरकॉम्प्युटिंग सेंटर या संस्थेचा तियानहे २ हा महासंगणक गेली सहा वर्षे टॉप ५०० यादीत पहिल्या क्रमांकावर होता. वर्षांतून दोनदा वेगवान महासंगणकाची यादी जाहीर केली जाते. सनवे तायहूलाइट हा संगणक तियानहे २ पेक्षा दुप्पट वेगवान व तिप्पट कार्यक्षम आहे. तियानहे संगणक सेकंदाला ३३.८६ पद्म गणने करीत होता. तो आता दुसऱ्या क्रमांकावर आहे. टायटन हा क्रे एक्स ४० संगणक अमेरिकेच्या ऊर्जा खात्याच्या ओकरिज नॅशनल लॅबोरेटरीत बसवला असून त्याचा वेग सेकंदावा १७.५९ पद्म इतका आहे. तो तिसऱ्या क्रमांकावर आहे. आयबीएम ब्लू जीन म्हणजेच सिक्वोया हा लॉरेन्स लिव्हरमोर नॅशनल लॅबोरेटरीतील महासंगणक चौथ्या क्रमांकावर असून जपानचा फुजित्सु येथील के महासंगणक पाचव्या क्रमांकावर आहे. अमेरिकेचा मीरा, ट्रिनिटी, युरोपचा पिझजेन्ट. जर्मनीचा हॅझेल हेन, सौदी अरेबियाचा शाहीन २ हे महासंगणक पहिल्या दहामध्ये आहे. चीनकडे १६७ तर अमेरिकेत १६५ महासंगणक आहेत. यादीतील पहिले दोनही महासंगणक चीनचे आहेत.
क्रीडा
देवेंद्रसिंग उपांत्यपूर्व फेरीत, मनोजकुमारचीही आगेकूचू
# भारताच्या एल.देवेंद्रसिंगने ऑलिम्पिक बॉक्सिंग पात्रता स्पर्धेतील ४९ किलो गटात उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. त्याचा सहकारी मनोजकुमारनेही (६४ किलो) उप-उपांत्यपूर्व फेरी गाठली. राष्ट्रकुल रौप्यपदक विजेत्या देवेंद्रने अर्जेटिनाच्या लीन्द्रो ब्लँकचा ३-० असा दणदणीत पराभव केला. देवेंद्रला चौथे मानांकन देण्यात आले आहे. माजी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता मनोजने द्वितीय मानांकित मोहम्मद इस्लाम अहमदवर सनसनाटी विजय मिळविला. आशियाई रौप्यपदक विजेत्या देवेंद्र याला मंगळवारी दक्षिण आफ्रिकेच्या सिबुसिसो बांधला याच्याशी खेळावे लागणार आहे. सिबुसिसोने दक्षिण कोरियाच्या ली यिचान याचे आव्हान संपुष्टात आणले. ऑलिम्पिक प्रवेश करण्यासाठी देवेंद्रला अंतिम फेरीत स्थान मिळवावे लागणार आहे.
अर्थव्यवस्था
गव्हर्नरपदासाठी अरुंधती भट्टाचार्याचे नाव आघाडीवर
# रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांचे उत्तराधिकारी म्हणून त्यांच्याबरोबरच निवृत्त होणाऱ्या स्टेट बँकेच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांचे नाव सध्या आघाडीवर आहे. राजन यांची गव्हर्नर म्हणून सप्टेंबरमध्ये मुदत संपत आहे. तर भट्टाचार्य या अध्यक्षा म्हणून स्टेट बँकेतून त्याच महिन्यात निवृत्त होणार आहेत. रिझव्र्ह बँकेच्या गव्हर्नरपदी त्या नियुक्त झाल्यास मध्यवर्ती बँक स्थापनेच्या इतिहासात त्या पहिल्या महिला गव्हर्नर बनतील. यापूर्वी डेप्युटी गव्हर्नरपदाला महिला नेतृत्व लाभले आहे. याचबरोबर रिझव्र्ह बँकेशी संबंधित तीन व्यक्तींची नावेही चर्चेत आहेत. डॉ. ऊर्जित पटेल, डॉ. सुबीर गोकर्ण व राकेश मोहन हे ते तिघे आहेत. पैकी गोकर्ण व मोहन हे मध्यवर्ती बँकेचे डेप्युटी गव्हर्नर राहिले आहेत. तर पटेल सध्या या पदावर आहेत. केंद्र सरकारमधील वरिष्ठ पातळीवरील शक्तिकांता दास व अरविंद सुब्रमण्यन यांचीही नावे रिझव्र्ह बँकेच्या गव्हर्नरपदाच्या शर्यतीत सध्या आहेत.