Current Affairs 22 April 2020
फेसबुकचा Jio सोबत मोठा करार

अमेरिकेतील सोशल मीडिया कंपनी फेसबुक (Facebook) ने भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी असलेल्या jio सोबत मोठा करार केला आहे. फेसबुकचा आणखीन विस्तार करण्यासाठी भारतातील सर्वात मोठी डिजिटल कंपनी रिलायन्स जिओ सोबत एक करार केला आहे.
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मालकीची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या डिजिटल ऑपरेशनने रिलायन्स जिओमध्ये फेसबुकने 43 हजार 574 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. फेसबुकने यासंदर्भात बुधवारी मोठी घोषणा केली.
फेसबुक (Facebook ) कंपनीची Jio मध्ये 9.99 टक्के भागीदारी (Stake)- कंपनीने दिलेल्या माहितीनुसार सोशल मीडियामधील लोकप्रिय प्लॅटफॉर्म असलेल्या फेसबुकने भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी असलेल्या रिलायन्स जिओमध्ये 9.99 टक्के भागीदारी घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर जिओसोबत एक करार केला असून फेसबुकने त्यामध्ये तब्बल 43 हजार 574 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. या करारामुळे फेसबुक रिलायन्स जिओमध्ये भागदारक असलेली सर्वात मोठी कंपनी ठरली आहे.
HDFC ने व्याजदरात केली कपात

एचडीएफसीने खातेधारकांना लॉकडाउन दरम्यान गुड न्यूज दिली आहे. एचडीएफसीने गृहकर्जाच्या व्याजदरात 0.15% कपात केली आहे. नवे दर आजपासून म्हणजे 22 एप्रिल 2020 पासून लागू झाले आहेत.
करोना संकटामुळे मंदीचा सामना करणाऱ्या अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो रेटमध्ये कपात केली होती. त्यानंतर अन्य बँकाही व्याज दरांमध्ये कपात करत आहेत. (दि.21) एचडीएफसीने हाउसिंग लोनवरील रिटेल प्राइम लेंडिंग रेटमध्ये (RPLR) 0.15% कपात करण्याचे जाहीर केले. एचडीएफसीने, गृह कर्जाच्या व्याजदरात 0.15% कपात केल्याने नवे व्याजदर आता 8.05% ते 8.85% दरम्यान असतील.
दरम्यान, मागील काही दिवसांपासून विविध कंपन्यांचे तिमाही नकारात्मक आले असताना एचडीएफसीने मात्र चांगली कमाई केल्याचे दिसून आले. गेल्या तिमाहीत एचडीएफसीचा नफा वाढला आहे. चौथ्या तिमाहीत(जानेवारी ते मार्च) बँकेचे व्याजातील उत्पन्न गेल्या वर्षीच्या तुलनेत 16.5 टक्क्यांनी वाढत 15,204.06 कोटी रुपयांच्या घरात पोहोचले आहे. चौथ्या तिमाहीत या कालावधीत बँकेचा नफा गेल्या वर्षीच्या तुलनेत 17.72 टक्क्यांनी वधारुन 6,927.69 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
केरळमध्ये करोना चाचणीचा वेगवान, अचूक संच विकसित

केरळमधील श्री चित्रा तिरूनाल इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्सेस अँड टेक्नॉलॉजी या संस्थेने करोनाचा किफायतशीर, वेगवान निदान चाचणी संच शोधून काढला असून त्यात दोन तासात चाचणीचा निकाल हाती येतो.
‘चित्रा जीन लॅम्प एन’ असे या संचाचे नाव असून त्याच्या मदतीने केलेल्या चाचण्या जास्त विश्वासार्ह आहेत. ‘रिव्हर्स ट्रान्सस्क्रिप्ट लुप मेडिएटेड अॅम्प्लिफिकेशन ऑफ व्हायल न्युक्लीइक अॅसिड’ (आरटी लॅम्प) पद्धतीने त्यात सार्स सीओव्ही २ म्हणजे करोना विषाणूचा एन जनुक शोधून त्याच्या अस्तित्वाची खातरजमा केली जाते.
चित्रा जीन लॅम्प एन संचाचा वापर करून दहा मिनिटात जनुक शोधला जातो. चाचणीला नमुने घेऊन निकाल येईपर्यंत दोन तास लागतात. एकावेळी या यंत्रात ३० नमुने तपासता येतात.
हा चाचणी संच संस्थेतील वैज्ञानिक डॉ. अनुप थेकुवेट्टील यांच्या मार्गदर्शनाखाली तीन आठवडय़ात तयार करण्यात आला असून या यंत्राची किंमत अडीच लाख रुपये असून एन जनुकाच्या दोन भागांची चाचणी त्यात होते. एका चाचणीला हजार रुपये खर्च येतो. आरटी पीसीआर यंत्राची किंमत १५ ते ४० लाख रुपये असते व एका चाचणीला १९०० ते २५०० रुपये खर्च येतो. या यंत्राची मांडणी जिल्हा रुग्णालयांमध्ये करता येऊ शकते, त्यासाठी प्रशिक्षित तज्ज्ञांची गरज असते.