नेपचुनच्या नव्या चंद्राचा शोध , एलियन्स सापडणार?
- कॅलिफोर्निया विद्यापीठातील सेटी इन्स्टिट्यूटच्या शास्त्रज्ञांनी नेपच्यूनच्या नव्या चंद्राचा शोध लावला असून त्याचं नामकरण ‘हिप्पोकॅंप’ असं करण्यात आलं आहे. प्राथमिक पाहणीतून या चंद्रावर जीवसृष्टी असल्याची शक्यता वर्तवली जात असून इथे एलियन्स भेटू शकतात, अशी चर्चा वैज्ञानिकांच्या वर्तुळामध्ये आहे.
- नेपच्यूनच्या १२ उपग्रहांचा आतापर्यंत शोध लागला असून हा १३वा उपग्रह आहे. प्रोटियस कॉमेटपासून या चंद्राची निर्मिती झाली आहे. ग्रीक पुराणांमध्ये ‘हिप्पोकॅंप’ नावाच्या एका काल्पनिक प्राण्याचा उल्लेख येतो. त्या प्राण्याचे नावच या ग्रहाला देण्यात आले आहे. ‘हिप्पोकॅंप’वरील वातावरण प्रचंड थंड आहे.
- येथील सूर्यप्रकाश आणि इतर गोष्टी जीवसृष्टीला पोषक असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळेच येत्या काळात इथे एलियन्स सापडू शकतील, अशी आशा शास्त्रज्ञांना वाटते आहे.
पाकिस्तानचे पाणी रोखणार
- प्राधान्य देशाचा दर्जा काढून घेतल्यानंतर पाकिस्तानचे पाणीही तोडण्याचा निर्णय भारताने घेतला आहे. सिंधू, चिनाब आणि झेलम या भारतातून पाकिस्तानकडे वाहात जाणाऱ्या नद्यांचा प्रवाह यमुनेकडे वळविण्याचा निर्णय भारताने घेतला आहे.
- अर्थात अधिकाऱ्यांच्या मते असा प्रवाह अडवण्यासाठी किमान १०० मीटर उंचीची धरणे बांधणे आवश्यक असून त्यासाठी किमान सहा वर्षांचा कालावधी लागेल. म्हणजेच पाकिस्तानची प्रत्यक्ष पाणी-कोंडी होण्यासाठी सहा वर्षांचा कालावधी लागणार आहे.
- सिंधु पाणीवाटप करारानुसार रावी, बिआस आणि सतलज या तिन्ही नद्यांच्या पाण्यांवर भारताचा पूर्ण हक्क आहे. त्याबदल्यात सिंधू, चिनाब आणि झेलम या नद्यांचा पाकिस्तानकडे जाणारा प्रवाह अर्निबध ठेवण्याची अट आहे.
- प्राधान्य देशाचा दर्जा काढताच भारतात आयात होणाऱ्या पाकिस्तानी उत्पादनांवर २०० टक्के आयातशुल्क लावले गेले आहे.
- याआधी २०१६मध्ये उरी हल्ल्यानंतरही असेच पाऊल भारताने उचलले होते. या नद्यांच्या पाणीवाटपाबाबत उभय देशांच्या सिंधू नदी जलआयुक्तांची वर्षांतून दोनदा बैठक होते. ती बैठक भारताने तेव्हा रद्द केली होती.
लष्करप्रमुखांचे ‘तेजस’मधून उड्डाण
- लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी गुरुवारी स्वदेशी बनावटीच्या एलसीए ‘तेजस’मधून उड्डाणाचा अनुभव घेतला. तेजस हे हिंदुस्थान एरोनॉटिक्सने लि.ने (एचएएल) बनवलेले हलके लढाऊ विमान आहे.
- तेजस हे विस्मयकारक लढाऊ विमान असल्याचा निर्वाळा रावत यांनी दिला. बंगळूरु येथे सुरू असलेल्या एरो इंडिया, एअर शोदरम्यान रावत यांनी तेजसमधून उड्डाण केले. या लढाऊ विमानाचा हवाई दलातील समावेशाचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
- तेजस हे छोटे, हलके लढाऊ विमान असले तरी अन्य मोठय़ा लढाऊ विमानांप्रमाणे तेही अत्याधुनिक शस्त्रे वाहून नेण्यास सक्षम आहे. तेजसमधून शत्रूच्या विमानावर क्षेपणास्त्राद्वारे हल्ला करता येऊ शकतो.
‘भारत जगातल्या टॉप तीन अर्थव्यवस्थांमध्ये येईल’
- ‘भारत लवकरच पाच ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने आगेकूच करत आहे. पुढील १५ वर्षांत भारत जगातल्या टॉप तीन अर्थव्यवस्थांच्या रांगेत जाऊन बसेल, अशी मला आशा आहे,’ असा आशावाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.
- दक्षिण कोरियाची राजधानी सेऊल येथे ते बोलत होते.
- जागतिक बँकेच्या इझ ऑफ डुइंग बिझनेसच्या रँकिंगमध्ये भारत ७७ व्या स्थानी पोहोचला. आर्थिक सुधारणांमुळे पुढील वर्षभरात देश या यादीत टॉप ५० देशांमध्ये मजल मारील,’ असे मोदी म्हणाले.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी दक्षिण कोरियाच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. मोदींना सेऊल पीस प्राईज देऊन गौरवण्यात आले. या पुरस्काराची घोषणा ऑक्टोबर महिन्यात करण्यात आली होती. शुक्रवारी ते द. कोरियाचे पंतप्रधान मून यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. डोनाल्ड ट्रम्प-किम जोंग यांच्या परिषदेच्या पार्श्वभूमीवर अण्वस्त्रबंदीच्या मुद्द्यावर दोन्ही नेत चर्चा करणं अपेक्षित आहे.
निवृत्त न्यायमूर्ती डी. के. जैन ‘बीसीसीआय’चे लवाद अधिकारी
- सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी निवृत्त न्यायमूर्ती डी. के. जैन यांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळावर (बीसीसीआय) लवाद अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. न्यायालयाने ‘बीसीसीआय’वर नेमलेले ते पहिले लवाद अधिकारी आहेत.
- न्यायमूर्ती एस. ए. बोबडे आणि ए. एम. सप्रे यांचा समावेश असलेल्या खंडपीठाने म्हटले आहे की, ‘‘दोन्ही पक्षकारांच्या सहमतीने निवृत्त न्यायमूर्ती डी. के. जैन यांची ‘बीसीसीआय’चे लवाद अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.’
- खंडपीठासमोर सर्वोच्च न्यायालयातील सहा माजी न्यायमूर्तीची नावे ठेवण्यात आली होती. यापैकी जैन यांना प्राधान्य देण्यात आले. खंडपीठाने जैन यांच्या नावाविषयी विचारले असता सर्व वकिलांनी अनुकूलता दर्शवली.
- सर्वोच्च न्यायालयाने आपल्या ९ ऑगस्ट २०१८च्या निकालात लोकपालांच्या नियुक्तीची शिफारस केली होती.
नगरच्या आशिष राऊतच्या ‘फोल्डिंग टॉयलेट’ला राष्ट्रीय पारितोषिक
- केंद्र सरकारचा विज्ञान व तंत्रज्ञान विभाग, तसेच नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नवी दिल्लीतील आयआयटी येथे आयोजित केलेल्या ७ व्या राष्ट्रीय पातळीवरील इन्स्पायर अॅवॉर्डसाठी नगर शहरातील विद्यार्थी आशिष अजय राऊत याची अंतिम साठ संकल्पनांमध्ये निवड झाली आहे.
- त्याने बनवलेल्या ‘फोल्डिंग टॉयलेट’ या उपकरणाला महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक मिळाला होता. त्याचा लवकरच राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रपती भवनमध्ये सन्मान केला जाणार आहे, तसेच त्याच्या उपकरणाची जपानमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय इनोव्हेशन कॉन्फरन्ससाठी निवड करण्यात आली आहे.
- राष्ट्रीय पातळीवरील इनस्पायर अॅवॉर्ड प्रदर्शन नवी दिल्लीत १३ ते १५ फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनात भारतातील विविध राज्यांमधील निवडक ८५० उपकरणांचा सहभाग नोंदवण्यात आला.