Current Affairs 22 January 2020
दीपिकाचा क्रिस्टल अवॉर्डनं सन्मान
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोनचा क्रिस्टल अवॉर्ड देऊन विशेष सन्मान करण्यात आला. दीपिका पादुकोण यांनी मानसिक आरोग्यासाठी केलेल्या प्रशंसनीय कार्याबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
झारखंडमधील झारिया देशातील सर्वाधिक प्रदूषित शहर
भारतातील २८७ शहरांपैकी २३१ शहरे सर्वात प्रदूषित असल्याचे ग्रीनपीसच्या अहवालात म्हटले आहे. झारखंडमधील कोळसा खाणींचा उद्योग असलेले झारिया हे देशातील सर्वात प्रदूषित शहर असल्याचे स्पष्ट झाले असून दिल्लीचा क्रमांक दहावा लागला आहे.
दिल्ली वर्षांपूर्वी आठव्या स्थानावर होते. झारखंडमधील धनबाद हे ठिकाण कोळसा खाणी व उद्योगांसाठी प्रसिद्ध असून ते देशातील दुसरे प्रदूषित ठिकाण आहे. यात पीएम १० कणांचे प्रमाण देशातील २८७ शहरांत मोजण्यात आले.
मिझोराममधील लुंगलेइ हे ठिकाण सर्वात कमी प्रदूषित असून त्या खालोखाल मेघालयच्या डोवकी या ठिकाणांचा कमी प्रदूषणात दुसरा क्रमांक आहे. देशातील सर्वात प्रदूषित शहरांपैकी दहा उत्तर प्रदेशात असून त्यात नॉइडा, गाझियाबाद, बरेली, अलाहाबाद, मोरादाबाद, फिरोजाबाद यांचा समावेश आहे. दक्षिणेकडे सर्वाधिक प्रदूषित शहरात एकूण २८ ठिकाणांचा समावेश असला, तरी त्यात केरळमधील एकही ठिकाण नाही.
भारतात पीएम दहा कणांचे २४ तासांना १०० मायक्रोग्रॅम प्रतिघनमीटर तर वर्षांला सरासरी ६० मायक्रोग्रॅम घनमीटर इतके प्रमाण सुरक्षित मानले गेले आहे. झारखंडमधील झारिया येथे पीएम १० कणांचे प्रमाण प्रतिघनमीटरला ३२२ मायक्रोग्रॅम होते. धनबाद व नॉइडात ते प्रतिघनमीटरला २६४ मायक्रोग्रॅम होते. गाझियाबादेत २४५ मायक्रोग्रॅम होते.
खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा : जलतरणात महाराष्ट्राची सुवर्णझळाळी
हाराष्ट्राने अपेक्षेप्रमाणे जलतरण क्रीडाप्रकारात मंगळवारी सुवर्णजल्लोष साजरा केला. अपेक्षा फर्नाडिस, केनिशा गुप्ता आणि मिहीर आम्ब्रे यांनी आपापल्या शर्यती जिंकत महाराष्ट्राच्या सुवर्णयशात मोलाचा वाटा उचलला. वेटलिफ्टिंगमध्ये साताऱ्याच्या वैष्णवी पवार हिने सुवर्णपदक जिंकले.
अपेक्षाने मुलींच्या गटात २०० मीटर बटरफ्लाय शर्यत २ मिनिटे २१.५२ सेकंदात जिंकली. त्यानंतर तिने ५० मीटर ब्रेस्टस्ट्रोक प्रकारातही ३४.५६ सेकंद अशी वेळ देत सुवर्णपदक मिळवले. केनिशाने ५० मीटर फ्रीस्टाइल शर्यतीत २७.२९ सेकंद अशी वेळ नोंदवून विजेतेपद पटकावले. मुलांमध्ये मिहिरने ५० मीटर फ्रीस्टाइल शर्यत २३.६१ सेकंदात पार करून अव्वल क्रमांक पटकावला. वेटलिफ्टिंगमध्ये ८१ किलो वजनी गटात वैष्णवीने १३४ किलो वजन उचलून सुवर्णपदक प्राप्त केले. तिने स्नॅचमध्ये ६२ तर क्लिन आणि जर्क प्रकारात ७२ किलो वजन उचलले.
झेन, आकाश यांचा ‘शौर्य’सन्मान
प्रजासत्ताक दिनी दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय शौर्य पुरस्कारांची घोषणा मंगळवारी करण्यात आली. महाराष्ट्रातल्या दोन बालवीरांचा यात समावेश आहे. मुंबईची झेन सदावर्ते आणि औरंगाबादचा आकाश खिल्लारे या दोघांना हा राष्ट्रीय शौर्य पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. झेन सदावर्ते हिने तिच्या इमारतीला लागलेल्या आगीतून १७ जणांची सुखरूप सुटका केली होती. आकाशने नदीत बुडणाऱ्या मायलेकीला वाचवलं होतं. देशभरातून २२ मुलांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. यात १० मुली तर १२ मुलांचा समावेश आहे.राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते या सर्वांचा सन्मान करण्यात येणार आहे.
प्रतिष्ठेच्या भारत पुरस्काराचा मान जळत्या बसमधील चाळीस जणांचा जीव वाचविणाऱ्या केरळच्या १५ वर्षीय मास्टर आदित्य के. याला बहाल करण्यात आला आहे. मार्कंडेय पुरस्काराचा मान उत्तराखंडच्या १० वर्षीय राखी हिला मिळाला आहे. ओडिशाच्या पूर्णिमा गिरी (१६) आणि सबिता गिरी (१५) यांना ध्रुव पुरस्काराने गौरविण्यात आले आहे; तर, समुद्रात तीन मित्रांचा जीव वाचविणाऱ्या मोहम्मद मुशीन ई.सी. याला मरणोत्तर अभिमन्यू पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. प्रल्हाद पुरस्कारासाठी १० वर्षांच्या श्रीमती बद्राची निवड करण्यात आली आहे. जम्मू आणि काश्मीरच्या सरताज मोहिउद्दीन मुगलची श्रावण पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.