देश-विदेश
राज्यातील एकमेव ताडोबात जल साठवणुकीचा विक्रमी प्रयोग
# ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनच्या जंगलात पावणे चार कोटींचा निधी खर्च करून ८६ वनतळे, १ हजार ५८४ दगडी नालाबांध व १० सिमेंट बंधारे बांधण्यात आल्याने विक्रमी ५ लाख १० हजार घनमीटर पाण्याची साठवणूक होणार आहे. असा पाणी साठवणुकीचा प्रयोग राज्यातील या एकमेव व्याघ्र प्रकल्पात होत असल्याने भविष्यात ताडोबा बफरमधील वन्यप्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याची चिंता मिटणार असून शंभरावर गावातील पाण्याची पातळी वाढून शेतकऱ्यांना त्याचा थेट फायदा होणार आहे.
पाकिस्तानात प्रसिद्ध कव्वाली गायक अमजद साबरींची गोळ्या झाडून हत्या
# साबरी ब्रदर्स या कव्वाली ग्रुपचे सर्वेसर्वा अमजद साबरी यांची बुधवारी दुपारी कराचीमध्ये अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली. दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी अमजद साबरी यांच्या मोटारीच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार केला. गंभीर जखमी झालेल्या साबरी यांना लगेचच रुग्णालयात हलविण्यात आले. पण तिथे उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.
‘इस्रो’कडून एकाच वेळी २० उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण
# भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या(इस्रो) तब्बल वीस उपग्रहांना एकाच वेळी अवकाशात घेऊन जाणाऱया ‘पीएसएलव्ही-सी३४’ या प्रक्षेपकाचे श्रीहरिकोटा येथून बुधवारी सकाळी ९ वाजून २६ मिनिटांनी यशस्वी उड्डाण झाले. विशेष म्हणजे, इस्रोच्या या प्रक्षेपकामध्ये समाविष्ट असलेल्या २० उपग्रहांमध्ये गुगल कंपनीच्या उपग्रहासह भारतीय विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या दोन उपग्रहांचा देखील समावेश आहे. सत्यभामासॅट व स्वयम, अशी या भारताच्या दोन शैक्षणिक उपग्रहांची नावे आहेत. ‘पीएसएलव्ही’ प्रक्षेपकाचे हे ३६वे उड्डाण असून, इतर अवकाश संस्थांच्या दहापट कमी खर्चात ही मोहीम राबवली गेली.
नासाच्या केप्लर दुर्बिणीने सर्वात तरुण बाहय़ग्रहाचा शोध
# नासाच्या केप्लर दुर्बिणीने के २ मोहिमेत एक पूर्ण विकसित बाहय़ग्रह शोधला असून, तो आतापर्यंत सापडलेला सर्वात तरुण बाहय़ग्रह आहे. त्याचे नामकरण के २-३३ बी असे केले असून, तो नेपच्यूनपेक्षा थोडा मोठा आहे. तो ताऱ्याभोवती पाच दिवसांत प्रदक्षिणा पूर्ण करतो. तो केवळ ५ ते १० दशलक्ष वर्षे जुना असून, आतापर्यंत फार कमी नवजात ग्रह सापडले आहेत. आपली पृथ्वी साडेचार अब्ज वर्षे वयाची आहे त्या तुलनेत के २-३३ बी हा ग्रह तरुण आहे. तो बाल ग्रह आहे असे म्हणायला हरकत नाही, असे कॅलटेकचे ट्रेव्हर डेव्हिड यांनी सांगितले. वैज्ञानिकांनी आतापर्यंत तीन हजार बाहय़ग्रह निश्चित केले असून ते मध्यमवयीन ताऱ्यांभोवती फिरत आहेत. ग्रहांच्या निर्मितीवर या ग्रहाच्या शोधाने प्रकाश पडणार असून, त्यामुळे पृथ्वीची निर्मिती कशी झाली असावी हे समजू शकेल, असे कालटेकचे संशोधक एरिक पेटीग्युरा यांनी सांगितले.
अर्थव्यवस्था
रेल्वे अर्थसंकल्प रद्द करण्याचा केंद्राचा विचार
# या वर्षी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सादर केलेला रेल्वे अर्थसंकल्प अखेरचा ठरण्याची शक्यता आहे, कारण केंद्र सरकार रेल्वेचा वेगळा अर्थसंकल्प सादर करण्याची पद्धत बंद करण्याच्या विचारात आहे. या संदर्भात नीती आयोगाने पंतप्रधान कार्यालयाला २० पानी निवेदन पाठवले असून त्यात रेल्वे अर्थसंकल्पाची पद्धत बंद करण्याच्या बाजूने मत नोंदवले आहे. त्या निवेदनावर केंद्र सरकारने रेल्वे खात्याचे मत मागवले आहे.