Current Affairs 22 March 2018
1) जगातील एकमेव पांढऱ्या नर गेंड्याचा मृत्यू
जगातील एकमेव अशा पांढऱ्या नर गेंड्याने केन्यातील ओआय पेजेटा अभायरण्यात शेवटचा श्वास सोडला. त्याच्या मृत्यूसह या पृथ्वीतलावरून व्हाइट ऱ्हायनो प्रजातीचाही अंत झाला आहे. सुदान असे नाव असलेला हा गेंडा 45 वर्षांचा होता. तसेच तो पृथ्वीतलावरील एकमेव मेल व्हाइट ऱ्हायनो होता. त्याला काही वर्षांपूर्वीच झेक रिपब्लिकच्या अभयारण्यातून केन्यात आणले होते. झेक येथे तो जगात शिल्लक आणि जिवंत असलेल्या शेवटच्या दोन फीमेल व्हाइट ऱ्हायनोसोबत राहत होता.
2) ‘अमेरिका फर्स्ट’च्या स्पर्धेत भारताचे ‘मेक इन इंडिया’च्या बाजूने अभियान
जागतिक व्यापार संघटनेमध्ये (डब्ल्यूटीओ) भारताने ‘मेक इन इंडिया’ विरुद्ध ‘अमेरिका फर्स्ट’च्या लढाईत विजयासाठी लॉबिंग सुरू केली आहे. अमेरिका डब्ल्यूटीओच्या नियमात बदल करून घेण्याचा प्रयत्न करत आहे. या माध्यमातून भारताला ई-कॉमर्स प्रकरणात चर्चेसाठी तयार करण्याचा अमेरिकेचा मानस आहे. त्यामुळे भारताने स्वत:च्या बाजूने वातावरण तयार करण्यासाठी डब्ल्यूटीओतील जवळपास ५० सदस्य देशांची दोनदिवसीय औपचारिक बैठक दिल्लीत बोलावली आहे. डब्ल्यूटीओमधील “डिस्प्यूट सेटलमेंट’ प्रणाली रद्द करण्याचा अमेरिकेचा प्रयत्न आहे. डब्ल्यूटीओच्या स्थापनेपासून आतापर्यंत भारताने आपल्या आर्थिक हितांच्या रक्षणासाठी याच्या १७६ वादाच्या प्रकरणांत सहभाग घेतला आहे. या दृष्टीने भारत यात अव्वल ७ सदस्य देशांत आहे. तर इतर अमेरिका (३९३), युरोपियन युनियन (२६०), जपान (२१२), चीन (१९६), कॅनडा (१८२) व्या क्रमांकावर आहे.
3) निवडणुकांवर खर्च होतात हजारो कोटी
सेंटर फॉर मीडिया स्टडीज या संस्थेच्या अहवालानुसार देशात २0१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये प्रचारकार्यासाठी राजकीय पक्ष व उमेदवार यांनी मिळून तब्बल ३३ हजार कोटी रुपये खर्च केले होते. जो अमेरिकेत २0१२ साली झालेल्या निवडणुकीपेक्षाही जास्त आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, २0१४ च्या लोकसभा निवडणुकांत प्रचारासाठी सर्वाधिक पैसा भाजपाने खर्च केला. ती रक्कम होती ७१४ कोटी. काँग्रेसने ५१६ कोटी रुपये खर्च केले. राष्ट्रवादीने खर्च केलेली रक्कम होती ५१ कोटी. बहुजन समाज पार्टीतर्फे ३0 कोटी रुपये निवडणुकीवर खर्च झाले. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने खर्च केलेली रक्कम होती १९ कोटी रुपये. हा झाला राजकीय पक्षांचा खर्च त्यात त्या पक्षांच्या तसेच अपक्ष उमेदवारांनी केलेल्या खर्चाचा समावेश नाही. तो सर्व एकत्र केल्यास रक्कम ३३ हजार कोटींवर जाते. अमेरिकेत २०१२ साली झालेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत प्रचारासाठी ४ अब्ज डॉलर म्हणजेच २७ हजार कोटी रुपये खर्च झाले होते. म्हणजेच भारतातील राजकीय पक्षांनी २0१४ साली अमेरिकेपेक्षा जास्त खर्च केला.
4) गोमांस बाळगल्याच्या संशयातून लोकांना ठार मारणाऱ्या जमावाला न्यायालयाने शिक्षा सुनावण्याची देशातील पहिलीच घटना
गेल्यावर्षी जून महिन्यात झारखंडच्या रामगढ येथे अलिमुद्दीन अन्सारी (55) यांना गोमांस बाळगल्याप्रकरणी जमावाने ठार मारले होते. याप्रकरणी आज न्यायालयाने खटल्यातील 12 दोषी आरोपींपैकी 11 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. गोमांस बाळगल्याच्या संशयातून लोकांना ठार मारणाऱ्या एखाद्या जमावाला न्यायालयाने शिक्षा सुनावण्याची ही देशातील पहिलीच घटना आहे. झारखंडमधील जलद गती न्यायालयाने (फास्ट ट्रॅक) महत्त्वपूर्ण निकाल दिला.
5) देशातील सर्वात जास्त भिकारी पश्चिम बंगालमध्ये
देशातील सर्वात जास्त भिकारी पश्चिम बंगालमध्ये आहेत. समाजकल्याणमंत्री थावरचंद गहलोत यांनी लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार देशात सध्याच्या घडीला चार लाख 13 हजार 760 भिकारी आहेत. त्यातील 2 लाख 21 हजार पुरुष तर उर्वरित महिला भिकारी आहेत. यातील सर्वाधिक भिकारी पश्चिम बंगालमध्ये आहेत. पश्चिम बंगालमध्ये एकूण 81 हजार 244 भिकारी आहेत भिकाऱ्यांच्या क्रमवारीत उत्तर प्रदेश दुसऱ्या तर बिहार तिसऱ्या स्थानावर आहे. उत्तर प्रदेशात 65 हजार 835 तर बिहारमध्ये 29 हजार 723 भिकारी आहेत. महाराष्ट्रामध्ये 24 हजार 207 भिकारी आहेत. भिकाऱ्यांची संख्या विचारात घेतली तर पूर्वोत्तर राज्यांमध्ये परिस्थिती चांगली आहे. येथे इतर भागांच्या तुलनेत भिकाऱ्यांची संख्या फार कमी आहे. पूर्वोत्तर भागातील अरुणाचल प्रदेशमध्ये केवळ 114 भिकारी आहेत, तर नागालँडमध्ये 124, मिझोराममध्ये केवळ 53 भिकारी आहेत केंद्रशासित प्रदेशाचा विचार करता दमण दीवमध्ये केवळ 22 तर लक्षद्वीपमध्ये केवळ दोन भिकारी आहेत. या यादीमध्ये उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश या पर्वतीय राष्ट्रांमध्येही भिकाऱ्यांची संख्या कमी आहे. उत्तराखंडमध्ये 3320 भिकारी आहेत, तर हिमाचल प्रदेशात केवळ 809 भिकारी आहेत.
MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी Mission MPSC ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.