Current Affairs 23 April 2020
राष्ट्रपतींकडून अध्यादेशावर शिक्कामोर्तब; वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्यास सात वर्षांपर्यंतची शिक्षा
आरोग्यसेवा कर्मचाऱ्याविरोधातील कुठल्याही प्रकारचा हिंसाचार, त्यांची छळवणूक सहन केली जाणार नाही. हल्लेखोरांवर फौजदारी कारवाई केली जाईल. त्यासाठी १२३ वर्षे जुन्या ‘महासाथीविरोधातील कायदा- १८९७’ मध्ये बदल करण्यात आला असून तसा अध्यादेश तातडीने काढला जाईल, अशी माहिती केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी बुधवारी दिली होती.
त्यानंतर यासंदर्भातील अध्यादेश काढण्यात आला होता. आज (गुरूवार) राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ‘महासाथीविरोधातील अध्यादेश (सुधारणा) -२०२०’च्या अध्यादेशावर शिक्कामोर्तब केलं. त्यामुळे आता वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर हल्ला करणं हे महागात पडणार आहे.
डॉक्टर, परिचारिका आणि अन्य आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांवरील सातत्याने होणारे हल्ले रोखण्यासाठी केंद्राने कठोर धोरण राबवण्याचा निर्णय घेतला आहे. हल्लेखोरांना किमान तीन महिने ते सात वर्षे तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. तसेच, ५० हजार ते ५ लाख रुपयांची दंडात्मक कारवाईही होऊ शकते. हल्लेखोरांविरोधातील दाखल झालेला गुन्हा दखलपात्र व अजामीनपात्र असेल. त्याची ३० दिवसांत चौकशी पूर्ण केली जाईल आणि एका वर्षांत दोषींना शिक्षा ठोठावली जाईल. केंद्रीय गृहमंत्रालयाने सर्व राज्यांना पत्र पाठवून आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांविरोधातील हल्लेखोरांवर कठोर कारवाईचा आदेश दिला आहे.
करोनाला पराभूत करणारा न्यूझीलंड देश ठरला पहिला
न्यूझीलंड हा करोनाला हद्दपार करणारा पहिला देश ठरला आहे.ऑकलँड विश्वविद्यालयाचे वॅक्सीन विशेषज्ञ हेलेन पेटूसिस-हैरिस यांनी म्हंटले कि, करोनाला हरविण्यासाठी त्याचे संक्रमण (ट्रान्समिशन) रोखणे गरजेचे आहे. असे झाल्यास हा विषाणू आपोआप संपेल, असे त्यांनी सांगितले आहे.
न्यूझीलंड या देशाची लोकसंख्या जवळपास ५० लाख असून ब्रिटनएवढे त्याचे क्षेत्रफळ आहे. यामुळे येथे सोशल डिस्टेंसिंग पाळणे संभव होते. याशिवाय न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न यांच्या निर्णय आणि कठोर अंमलबजावणीसमोर करोना व्हायरसने हार मानली आहे.
न्यूझीलंडमध्ये मार्चच्या शेवटास १०० करोनाबाधित रुग्ण आढळले होते. यानंतर दिवसागणिक ९० करोनाग्रस्त रुग्ण समोर येण्यास सुरुवात झाली. मात्र, आता ही संख्या कमी होऊन मंगळवारी केवळ ५ रुग्ण आहेत. याशिवाय न्यूझीलंडमध्ये करोना व्हायरसमुळे १३ जणांचा मृत्यू झाला आहे.
याविषयी बोलताना जेसिंडा अर्डर्न म्हणाल्या कि, २० मार्चपासून परदेशी नागरिकांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. येथे जर कोणी बाहेरून देशात आला तर त्याला क्वारंटाईन करण्यात आले आहे. असे केल्याने हा आजार बर्याच अंशी नियंत्रित झाला आहे. दरम्यान, न्यूझीलंड सरकार लॉकडाऊन उठविण्याच्या कोणतीही घाई करताना दिसत नाही.
इराणचा पहिला लष्करी उपग्रह अवकाशात
अमेरिकेने निर्बंध लादल्याने दोन्ही देशात तणाव असतानाच इराणने लष्करी उपग्रह यशस्वीरीत्या अवकाशात सोडला असून तो कक्षेत प्रस्थापित करण्यात आला आहे, अशी माहिती इराणच्या रेव्होल्युशनरी गार्डने दिली आहे.
गुप्त अवकाश कार्यक्रम सुरू असल्याचे संकेत इराणने वेळोवेळी दिले आहेत. दरम्यान हा उपग्रह सोडण्यात आल्याची खातरजमा इतर मार्गाने होऊ शकलेली नाही. रेव्होल्युशनरी गार्डने म्हटले आहे की, आम्ही लष्करी उपग्रह सोडला असून त्याचे नाव ‘नूर’ असे आहे.
अमेरिकेचे परराष्ट्र खाते व पेंटॅगॉन यांनी अजून याबाबत प्रतिक्रिया दिलेली नाही. ट्रम्प यांनी जानेवारीत इराकमध्ये ड्रोन हल्ले करून इराणचे लष्करी अधिकारी सुलेमानी यांना ठार मारले होते.
इराणने जो उपग्रह सोडला आहे तो ४२५ कि.मी उंचीवरील कक्षेत असून इराणने सोडलेला तो पहिलाच लष्करी उपग्रह आहे. इराणमधील शाररौद येथील तळावरून हा उपग्रह सोडण्यात आला असून हा तळ सिमनान प्रांतात आहे. द्रव व घन इंधनावर चालणाऱ्या मेसेंजर प्रक्षेपकाच्या मदतीने हा उपग्रह सोडण्यात आला.
करोनाविरुद्धच्या लढय़ात पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वोच्च स्थानी
करोना साथीविरुद्धच्या लढय़ात जगभरातील नेत्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्वोच्च क्रमांक देण्यात आला.
सर्वेक्षणासाठी मतदान घेणाऱ्या ‘मॉर्निग कन्सल्ट’ ने अलीकडेच केलेल्या विश्लेषणानुसार जागतिक नेत्यांमध्ये मोदी हे सर्वाधिक लोकप्रिय आहेत. या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, १४ एप्रिल रोजी मोदी यांचे ‘अॅप्रूव्हल रेटिंग’ ६८ होते.
‘कोविड-१९ चा मुकाबला करण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगाचे नेतृत्व करत आहेत. एकीकडे भारतीयांची सुरक्षा व सुरक्षितता निश्चित करणे आणि दुसरीकडे इतर देशांना आवश्यक ती सर्व मदत पुरवणे यामुळे या महासाथीविरुद्धच्या लढय़ात ते जगभरातील नेत्यांमध्ये अव्वल ठरले आहेत’, असे नड्डा यांनी ट्विटरवर लिहिले. या संकटाच्या काळात देशाला मोदी यांच्या नेतृत्वावर संपूर्ण विश्वास आहे, असेही ते म्हणाले.
भारतातील करोना रुग्णावरील पहिली प्लाझ्मा थेरपी यशस्वी
करोना व्हायरसवर अद्यापही सुरक्षित आणि प्रभावी अशी लस आणि औषध नाही. अशात कोरोनाग्रस्तांसाठी आता आशेचा किरण आहे, ते प्लाझ्मा थेरेपी. भारतात कोरोना रुग्णावरील पहिली प्लाझ्मा थेरपी यशस्वी ठरली आहे.
दिल्लीतील एका खासगी रुग्णालातील 49 वर्षीय गंभीर कोरोना रुग्णावर प्लाझ्मा थेरपीने उपचार करण्यात आले. उपचारानंतर चार दिवसांतच या रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे दिसून आले.
जो रुग्ण तीन आठवड्यांपूर्वी बरा झाला आहे, त्यांच्या रक्तातील प्लाज्मा घेतले जातात. एका व्यक्तीच्या रक्तातून जास्तीत जास्त 800 मिलीलीटर प्लाज्मा घेतला जाऊ शकतो, तर करोना रुग्णाच्या शरीरात अँटिबॉडीज टाकण्यासाठी 200 मिलीमीटर प्लाझ्मा चढवला जातो.