Current Affairs 23 January 2020
डिसेंबर 2020 आणि जून 2021 मध्ये विनामनुष्य यान पाठवणार
भारताच्या पहिल्या मानवी अवकाश मोहिमेची पूर्वतयारी म्हणून या वर्षी डिसेंबरमध्ये पहिली निर्मनुष्य अवकाश मोहीम हाती घेतली जात असून तशीच दुसरी मोहीम जून २०२१ मध्ये होणार आहे. त्यानंतर २०२१ मध्ये भारताचे अवकाशवीर गगनयानातून अवकाशात पाठवले जातील, अशी माहिती भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजे इस्रोचे प्रमुख के. शिवन यांनी दिली.‘मानवी अवकाश मोहीम- सध्याची आव्हाने व भविष्यातील स्थिती’ या विषयावरील परिसंवादाचे उद्घाटन करताना ते बोलत होते.
अवकाशात भारतीयांचे अस्तित्व या मोहिमातून सिद्ध होणार आहे. गगनयान मोहिमेतून इस्रोच्या दीर्घकालीन आंतरग्रहीय मोहिमांच्या उद्दिष्टांना पूरक असे काम केले जाणार आहे. मानवी अवकाश मोहिमेसाठी इस्रोने १० टनांचे वजन वाहून नेऊ शकेल असा प्रक्षेपक तयार केला असून त्यात अवकाशात वापरण्यास अनुकूल अशा पॅराशूट्सचाही अवकाशवीरांना परत आल्यानंतर उतरवण्यासाठी वापर केला जाणार आहे. या मोहिमेत डीआरडीओ प्रयोगशाळा, भारतीय हवाई दल, सीएसआयआर, इतर राष्ट्रीय प्रयोगशाळा, काही कंपन्या यांची मदत घेतली जात आहे.
भारताच्या अवकाशवीरांना अंतराळात पाठवण्यापूर्वी व्योममित्र (अवकाशमित्र) नावाच्या स्त्री अर्धयंत्रमानवास (याला पाय नसतात) गगनयानातून पाठवले जाणार आहे. पहिला अवकाशवीर युरी गागारिन याला रशियाने अवकाशात पाठवले त्याआधी इव्हान इव्हानोविच हा यंत्रमानव त्यावेळीही चाचणीसाठी पाठवण्यात आला होता. हा स्त्री यंत्रमानव बुधवारी मानवी अवकाश मोहिमांवरील परिसंवादात सादर करण्यात आला. व्योम याचा अर्थ अवकाश असा असल्याने व्योममित्रचा अर्थ अवकाश मित्र असा आहे. या यंत्रमानव महिलेने तिचा परिचय उपस्थितांना करून देताना सांगितले की, मी व्योममित्र, यंत्रमानव, गगनयानच्या पहिल्या निर्मनुष्य मोहिमेत मी अवकाश प्रवास करणार आहे. या अवकाश मोहिमेत मी विविध घटकांचे निरीक्षण करून तुम्हाला सतर्क करणार आहे. जीवनपूरक कृतींचे परीक्षण यात केले जाणार आहे. मी अवकाशवीरांशी संभाषण करू शकेन, त्यांना ओळखू शकेन व त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देऊ शकेन.
आफ्रिकेत बहुपयोगी आंतरराष्ट्रीय केंद्राचे उद्घाटन
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मृती प्रित्यर्थ भारतानं दक्षिण आफ्रिकेत सुरु केलेल्या बहुपयोगी आंतरराष्ट्रीय केंद्राचं परराष्ट्र व्यवहारमंत्री एस जयशंकर आणि नायजेरियाचे अध्यक्ष महामदू इसोफू यांनी संयुक्तरित्या उद्घाटन केले.
हे आंतरराष्ट्रीय केंद्र भारत आणि नायजेरियामधल्या सदृढ मैत्रीचे प्रतिक आहे, असे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातर्फे जारी केलेल्या पत्रकात सांगण्यात आले. महात्मा गांधीजींच्या 150 व्या जयंतीनिमित्त भारताने आफ्रिकेमधे सुरु केलेलं अशाप्रकारचे पहिलच आंतरराष्ट्रीय केंद्र आहे, असेही या पत्रकात म्हटले आहे. या केंद्रात दोन हजार लोकांच्या क्षमतेचे प्रशस्त असे सभागृह, ग्रंथालय आहे.
जागतिक लोकशाही सूचीमधील भारताचे स्थान घसरले – इआययूचा अहवाल
जागतिक लोकशाही सूचीमधील क्रमवारीत भारताची १० अंकांनी घसरण झाल्याचा एक अहवाल नुकताच सादर करण्यात आलाय. २०१९ या वर्षासाठी ही यादी जाहीर करण्यात आली असून यामध्ये १६७ देशांचा समावेश आहे. ब्रिटन स्थित द इकॉनॉमिस्ट या साप्ताहिक वृत्तपत्राच्या‘इंटेलिजन्स युनिट’द्वारे सादर करण्यात आलेल्या या अहवालामध्ये भारतातील नागरी स्वातंत्र्यात घट’झाल्याने भारताची क्रमवारी घसरल्याचं म्हंटलं आहे.
द इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिट ही जगभरातील अनेक देशांमधील राजकीय व आर्थिक परिस्थितीच्या संशोधन व विश्लेषणाद्वारे अहवाल सादर करणारी संस्था आहे. या संस्थेद्वारे सादर करण्यात आलेला जागतिक लोकशाही सूची अहवाल हा त्या देशातील निवडणूक प्रक्रिया, वैविध्य, सरकारचे कामकाज, राजकीय सहभाग, राजकीय संस्कृती, आणि नागरी स्वातंत्र्य या मुद्द्यांच्या आधारे तयार केला जातो.
दरम्यान, २०१८ या वर्षासाठी सादर करण्यात आलेल्या जागतिक लोकशाही सूचीमध्ये भारत ७.२३ गुणांसह ४१व्या स्थानी होता. मात्र २०१९ या वर्षासाठी सादर करण्यात आलेल्या अहवालात भारताला ६.९० गुण मिळाल्याने भारताची ५१व्या स्थानावर घसरण झाली.
जागतिक लोकशाही सूची अहवालामध्ये दक्षिण आशियाई देशांमध्ये भारताचे स्थान अव्व्ल असून श्रीलंका (६९) बांगलादेश (८०), पाकिस्तान (१०८) तर चीन (१५३) व्या स्थानावर आहेत.
खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा : महाराष्ट्राला सलग दुसऱ्यांदा विजेतेपद
महाराष्ट्राच्या खेळाडूंनी केलेल्या अप्रतिम कामगिरीमुळे ‘खेलो इंडिया’ युवा क्रीडा स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा सर्वसाधारण विजेतेपद मिळवण्याचा मान महाराष्ट्राने पटकावला. महाराष्ट्राने ७८ सुवर्ण, ७७ रौप्य आणि १०१ कांस्यपदकांसह एकूण २५६ पदकांची कमाई करत विजेतेपद मिळवले. हरयाणा २०० पदकांसह दुसऱ्या स्थानी तर दिल्ली १२२ पदकांसह तिसऱ्या स्थानी आहे.
महाराष्ट्राने यंदा २० क्रीडाप्रकारांपैकी १९ खेळांमध्ये सहभाग नोंदवला होता. त्यापैकी जलतरणात सर्वाधिक ४६ पदकांची कमाई महाराष्ट्राच्या खेळाडूंनी केली. जिम्नॅस्टिक्समध्ये ४०, कुस्तीमध्ये ३१, अॅथलेटिक्समध्ये २९ आणि वेटलिफ्टिंगमध्ये २५ पदके मिळवत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी आपला दबदबा राखला.
अखेरच्या दिवशी टेनिसमध्ये महाराष्ट्राच्या स्नेहल माने आणि मिहिका यादव यांनी २१ वर्षांखालील महिला दुहेरीत सुवर्णपदक पटकावले. अंतिम फेरीत त्यांनी तेलंगणाच्या समा सात्त्विका आणि श्राव्या चिलाक्लापुडी यांचा ६-३, १०-७ असा पाडाव केला.
महाराष्ट्राच्या करिना शांता हिने मुलींच्या १७ वर्षांखालील गटात २०० मीटर्स ब्रेस्टस्ट्रोक शर्यत जिंकून सोनेरी सांगता केली. महाराष्ट्राच्या वेदांत बापना व आरोन फर्नाडिस यांनी रौप्यपदकाची कमाई केली.