चालू घडामोडी : २३ जानेवारी २०२१
Current Affairs : 23 January 2021
HAL च्या ‘हॉक-आय’ मधून ‘SAAW’ ची यशस्वी चाचणी
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने (एचएएल) हॉक-आय विमानातून स्मार्ट अँटी एअरफिल्ड शस्त्राची यशस्वी चाचणी केली.
या चाचणीच्या यशामुळे स्वदेशी हॉक-आय कार्यक्रमाला गती मिळणार आहे. ओदिशाच्या किनाऱ्यावर ही चाचणी घेण्यात आली.
एचएएलचे टेस्ट पायलट निवृत्त विंग कमांडर पी. अवस्थी आणि निवृत्त विंग कमांडर एम. पटेल यांनी हॉक-आय मधून SAAW हे अस्त्र डागले.
पहिल्यांदाच भारतीय हॉक-Mk132 मधून हे स्मार्ट शस्त्र डागण्यात आले. १२५ किलो वर्गातील SAAW हे अत्याधुनिक, अचूकतेने वार करणारे शस्त्र आहे.
SAAW चा वापर करुन, १०० किमीच्या परिघातील शत्रूची धावपट्टी, रडार आणि बंकर उद्धवस्त करता येतात.
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडकडून हॉक-आय विमानांची निर्मिती केली जाते.
निती आयोग नाविन्यता निर्देशांक जाहीर ; कर्नाटक, महाराष्ट्र आघाडीवर
निती आयोग नाविन्यता निर्देशांक जाहीर करण्यात आला आहे. या वर्षी जाहीर करण्यात आलेल्या नाविन्यता निर्देशांकात कर्नाटक, महाराष्ट्र, तामिळनाडू, तेलंगणा, केरळ राज्य आघाडीवर आली आहेत.
या क्षेत्रात झारखंड, छत्तीसगड आणि बिहार मात्र खालच्या पातळीवर आहेत.
पहिल्या क्रमांकावरील कर्नाटक या राज्याला 42.5 गुण मिळाले आहेत. दुसऱ्या क्रमांकावरील महाराष्ट्राला 38 गुण मिळाले आहेत. शेवटच्या क्रमांकावरील बिहार राज्याला 14.5 इतके गुण मिळाले आहेत.
नाविन्य या क्षेत्रात अपेक्षेप्रमाणे शहरातील परिस्थिती ग्रामीण भागातील परिस्थितीपेक्षा चांगली आहे.
सृष्टी गोस्वामी बनणार एका दिवसासाठी उत्तराखंडची मुख्यमंत्री
हरिद्वारच्या दौलतपूर गावातील सृष्टी गोस्वामी एका दिवसासाठी उत्तराखंडची मुख्यमंत्री बनणार आहे.
राष्ट्रीय कन्या दिन २४ जानेवारी रोजी असल्यामुळे त्यादिवशी बाल मुख्यमंत्री म्हणून एक दिवसासाठी ती पदभार ग्रहण करणार आहे.
त्यानंतर सर्व विभागीय अधिकारी सृष्टी गोस्वामीसमोर त्यांच्या विभागाचा कार्य अहवाल सादर करतील.
याबाबत उत्तराखंडच्या बालहक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा उषा नेगी यांनी मुख्य सचिव ओमप्रकाश यांना पत्र लिहिले आहे.