चालू घडामोडी : २३ नोव्हेंबर २०२०
Current Affairs : 23 November 2020
यंदाच्या गाजलेल्या पुस्तकांमध्ये 3 भारतीयांच्या पुस्तकांचा समावेश
या वर्षी गाजलेल्या 100 पुस्तकांच्या यादीमध्ये तीन भारतीयांनी लिहीलेल्या आणि टीकाकारांनी गौरवलेल्या तीन पुस्तकांचाही समावेश आहे. “न्यूयॉर्क टाईम्स’ने ही यादी प्रसिद्ध केली आहे.
या यादीमध्ये अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ‘अ प्रॉमिस्ड लॅंड’ या आठवणींच्या संग्रहाचाही समावेश आहे. “न्यूयॉर्क टाईम्स’च्या संपादक मंडळाने काल्पनिक, कविता आणि वास्तव अशा श्रेणींमधील 100 पुस्तकांची निवड केली आहे.
या यादीमध्ये जन्माने भारतीय असलेल्या मेघा मजुमदार यांनी लिहिलेल्या ‘ए बर्निंग’ या काल्पनिक साहित्याचाही समावेश आहे. यामध्ये भारतातील महानगरांमधील दहशतवादी कृत्यांमुळे एखाद्या निरपराध व्यक्तीला भोगाव्या लागलेल्या तुरुंगवासाची कहाणी आहे.
केरळमध्ये वाढलेल्या दीपा अनप्पा यांनी लिहिलेल्या ‘दिजिन पेट्रोल ऑन पर्पल लाईन’ चाही यादीमध्ये समावेश आहे. या पुस्तकात आपल्या वर्गातील बेपत्ता झालेल्या मित्राचा शोध घेण्याचा 9 वर्षांच्या मुलाकडून झालेल्या प्रयत्नाची कथा आहे.
भारताची IRNSS प्रणाली “वर्ल्ड वाइड रेडिओ नेव्हिगेशन सिस्टम (WWRNS)” याचा एक घटक बनला
हिंद महासागर प्रदेशात कार्य करण्यासाठी भारताची स्वदेशी GPS प्रणाली ‘इंडियन रीजनल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टम (IRNSS)’ याला आंतरराष्ट्रीय समुद्री संघटनेनी (IMO) “वर्ल्ड वाइड रेडिओ नेव्हिगेशन सिस्टम (WWRNS)” याच्या एका घटकाच्या रूपात स्वीकारले आहे.
“वर्ल्ड वाइड रेडिओ नेव्हिगेशन सिस्टम (WWRNS)” याचा एक घटक बनल्यामुळे ही प्रणाली 50°N अक्षांश, 55°E रेखांश, 5°S अक्षांश आणि 110°E रेखांश, जे भारतीय सीमेपासून अंदाजे 1500 किलोमीटरपर्यंत आहे, एवढ्या क्षेत्रात व्यापलेल्या महासागराच्या जलक्षेत्रामध्ये जहाजांच्या सुचालनामध्ये सहाय्य करण्यासाठी ठिकाणाची माहिती मिळविण्यासाठी GPS आणि GLONASS प्रणाली प्रमाणेच IRNSS वापरण्यास व्यापारी जहाजांना सक्षम करणार.
ग्लोबल सिटिझन पुरस्कारासाठी मुंबईच्या तरुणीला नामांकन
झोपडपट्टी भागांतील महिलांमध्ये मासिक पाळीबाबत जनजागृती करण्याबरोबरच, त्याबाबतच्या उत्पादनांत या महिलांना सहभागी करून घेत उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून देणाऱ्या २६ वर्षीय सुहानी जलोटा या मुंबईकर तरुणीला ‘ग्लोबल सिटिझन पुरस्कार : सिस्को युथ लीडरशिप अवार्ड’साठी नामांकन प्राप्त झाले आहे.
या पुरस्कारासाठी नामांकित झालेल्या आणि अंतिम तीन जणांमध्ये स्थान मिळवलेल्या सुहानी जलोटा या एकमेव भारतीय आहेत.
भारतीय अॅथलेटिक्सचे उच्च कामगिरी संचालक हेरमॅन यांचा राजीनामा
केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने २०२४ च्या ऑलिम्पिकपर्यंत कार्यकाळ वाढवला असला तरी व्होल्कर हेरमॅन यांनी भारतीय अॅथलेटिक्स संघाच्या उच्च कामगिरी संचालक पदाचा राजीनामा दिला आहे.
हेरमॅन यांनी काही आठवडय़ांपूर्वीच राजीनामा दिलेला असून, याबाबत कोणतेही विशिष्ट कारण दिलेले नाही, असे भारतीय अॅथलेटिक्स महासंघाच्या सूत्रांनी सांगितले.
जर्मनी हेरमॅन यांनी जून २०१९पासून पदाची धुरा सांभाळली. २०२१पर्यंत लांबलेल्या टोक्या ऑलिम्पिकपर्यंत त्यांचा कार्यकाळ होता. परंतु क्रीडा मंत्रालयाने सप्टेंबर महिन्यात तो वाढवून २०२४ च्या ऑलिम्पिकपर्यंत त्यांच्याकडे सूत्रे दिली. पण हेरमॅन यांनी नव्या करारावर स्वाक्षरी केली नव्हती.
खाशाबा यांच्या मरणोत्तर ‘पद्मश्री’साठी पाठपुरावा!
देशाला पहिलेवहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक जिंकून देणारे राज्यातील कुस्तीपटू खाशाबा जाधव यांना मरणोत्तर ‘पद्मश्री’ मिळण्यासाठी भारतीय कुस्ती महासंघाकडून (डब्ल्यूएफआय) पाठपुरावा करण्यात येणार आहे. १९५२ च्या हेलिसिंकी ऑलिम्पिकमध्ये जाधव यांनी कांस्यपदक जिंकले होते.