चालू घडामोडी – २४ एप्रिल २०१६
देश-विदेश
पाण्याचा प्रत्येक थेंब अनमोल- पंतप्रधान
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज ‘मन की बात’ कार्यक्रमामधून देशवासियांशी संवाद साधताना दुष्काळ आणि शिक्षण या विषयांवर भाष्य केले. पाण्याचा प्रत्येक थेंब अनमोल असून त्याला वाचवा असे आवाहनही पंतप्रधानांनी आज केले. तसेच सरकारच्या अनेक योजना यशस्वी होत असल्याचे ते म्हणाले. देशातील जनतेने उस्फूर्तपणे गॅस सबसिडी सोडल्याबद्दल त्यांनी जनतेचे आभार मानले आहेत. आतापर्यंत १ कोटी लोकांनी गॅस सबसिडी सोडल्याचे त्यांनी म्हटले.
राष्ट्रपती मुखर्जी पुढील महिन्यात चीन दौऱ्यावर
मसूद अझहरवर बंदी घातली जावी यासाठी भारताने संयुक्त राष्ट्रात केलेले प्रयत्न चीनने रोखल्यामुळे दोन्ही देशांच्या संबंधांत काहीसा दुरावा आला असतानाही हे संबंध बळकट करण्याच्या प्रयत्नापोटी उच्चस्तरावरील द्विपक्षीय भेटींच्या मालिकेत राष्ट्रपती प्रणब मुखर्जी हे पुढील महिन्यात चीनच्या दौऱ्यावर जाणार आहेत. चीनचे पंतप्रधान ली केक्यांग यांच्याशी झालेल्या भेटीत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांनी या दौऱ्याची घोषणा केली.
क्रीडा
सलमान ऑलिम्पिक पथकाचा सदिच्छादूत
रिओ येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी बॉलीवूड अभिनेता सलमान खान भारतीय पथकाचा सदिच्छादूत असणार आहे. विविध कारणांसाठी वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या सलमानची अचानकच एका कार्यक्रमात सदिच्छादूतपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ‘‘ऑलिम्पिकसाठीच्या भारतीय पथकाच्या सदिच्छादूतपदी नियुक्ती होणे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे,’’ अशा शब्दांत सलमानने आपल्या भावना प्रकट केल्या.
400 ग्रॅम जास्त वजनामुळे विनेश ऑलिंपिकबाहेर
उलनबटोर (मंगोलिया)- पहिल्या जागतिक ऑलिंपिक पात्रता कुस्ती स्पर्धेचा दुसरा दिवस भारतासाठी धक्कादायक ठरला. प्रमुख महिला कुस्तीगीर विनेश फोगटला 400 ग्रॅम वजन जादा भरल्यामुळे तिला 48 किलो वजनी गटातून अपात्र ठरविण्यात आले.