⁠
Uncategorized

Current Affairs 24 January 2018

1) प्रधानमंत्री राष्ट्रीय सहाय्यता निधीत आज २ हजार ८७५ कोटी १० लाख रुपयांचा निधी

नैसर्गिक व इतर आपत्ती काळात ज्या कोषातून आपत्तीग्रस्तांना मदत दिली जाते त्या प्रधानमंत्री राष्ट्रीय सहाय्यता निधीत आज २ हजार ८७५ कोटी १० लाख रुपयांचा निधी जमा आहे, तर २०१० ते २०१७ या काळात सहाय्यता निधीतून २०८६ कोटींचा निधी आपत्तीग्रस्तांना सहाय्यता निधी म्हणून देण्यात आला आहे. महाराष्ट्रातील आपत्तीग्रस्तांना ४ कोटींचे अर्थसहाय्य मिळाले आहे. प्रधानमंत्री राष्ट्रीय सहाय्यता निधीची स्थापना जानेवारी १९४८ साली करण्यात आली. त्या वेळी पाकिस्तानातून आलेल्या विस्थापितांना सहाय्य करणे हा उद्देश होता. आज या निधीच्या माध्यमातून नैसर्गिक आपत्ती, अपघात, अतिरेकी हल्ले, दंगली तसेच हृदय उपचार, किडनी रोपण आदींसाठी या सहाय्यता निधीचा वापर केला जातो. सन २०१० ते नोव्हेंबर २०१७ या आठ वर्षांच्या काळात प्रधानमंत्री राष्ट्रीय सहाय्यता निधीत दान स्वरूपात व जमा रकमेवरील व्याज असे एकूण ३३०८ कोटी ८१ लाख रुपयांचा निधी जमा झाला होता, तर या आठ वर्षांत २०८६ कोटी ४४ लाख रुपयांचा निधी गरजूंना वितरीत करण्यात आला आहे. गेल्या पाच वर्षांत २७४१ कोटी ४१ लाख या निधीत जमा झाले. सन २०१०-११ या वर्षी १६२५ कोटी ६४ लाखांची शिल्लक होती, ती नोव्हेंबर २०१७ अखेर २८७५ कोटी १० लाख इतकी झाली आहे. पुणे जिल्ह्यातील माळीण भूस्खलन, पुण्यातील बेकरी आग, राज्यातील पूरपरिस्थिती, घाटकोपर व भेंडी बाजार इमारत दुर्घटना, परेल रेल्वे स्टेशन येथील चेंगराचेंगरी या सर्व दुर्घटनांमधील आपत्तीग्रस्तांना व मृतांच्या नातेवाइकांना प्रधानमंत्री राष्ट्रीय सहाय्यता निधीतून ४ कोटी ७६ लाख रुपयांचा सहाय्यता निधी देण्यात आला आहे.

2) ‘भारत-पाक’ने चर्चेद्वारे प्रश्न सोडवावेत – संयुक्त राष्ट्र

आंतरराष्ट्रीय सीमा व नियंत्रण रेषेवरील तणाव शिगेला पोहोचला असताना संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटारेस यांनी सोमवारी पुन्हा एकदा ‘भारत-पाक’मध्ये मतैक्य झाल्याशिवाय काश्मीर प्रश्नात मध्यस्थी करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. ‘उभय राष्ट्रांनी चर्चेद्वारे आपसातील प्रलंबित मुद्दे सोडवावेत,’ असे आवाहन त्यांनी केले आहे.’संयुक्त राष्ट्र प्रमुख मध्यस्थी करण्यासाठी तत्त्वत: सदैव उपलब्ध आहेत. मात्र, वैश्विक संघटनेला सहभागी करवून घेण्याच्या मुद्यावर प्रत्येकाचे मतैक्य होणे गरजेचे आहे,’ असे संयुक्त राष्ट्राच्या सरचिटणीसांचे प्रवक्ते स्टिफन दुजारिक यांनी म्हटले आहे. भारत-पाक सीमा व नियंत्रण रेषेवर गत पंधरवड्यापासून सातत्याने गोळीबार सुरू आहे. शस्त्रसंधीच्या उल्लंघनामुळे दोन्ही देशांतील तणाव शिगेला पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर गुटारेस यांच्या कार्यालयाने हे स्पष्टीकरण दिले आहे. दुजारिक यांनी यावेळी भारत-पाक सीमेवर मागील १० दिवसांपासून काय सुरू आहे, याची आपल्याला ठोस माहिती असल्याचेही यावेळी स्पष्ट केले. ‘सरचिटणीस सातत्याने दोन्ही पक्षांना चर्चेद्वारे आपसातील प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी प्रोत्साहित करत आहेत,’ असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. ‘एखाद्या प्रश्नात एकाहून अधिक पक्षांचा समावेश असेल तर साहजिकच त्यातील प्रत्येकाला ‘युनो’ची मध्यस्थी मान्य असली पाहिजे. किंबहुना कोणत्याही मध्यस्थीसाठी ही पहिली वास्तविक अट आहे,’ असे दुजारिक म्हणाले.

3) भारताचा विकास यंदा ७.४ टक्के

जागतिक आर्थिक मंचाच्या वार्षिक बैठकीस स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी गेले असतानाच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) भारतासाठी एक चांगला अहवाल प्रसिद्ध केला आहे. आर्थिक वर्ष २०१९ मध्ये म्हणजेच पुढील आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था ७.४ टक्के दराने विकास साधले, असे भाकीत आयएमएफने आपल्या अहवालात केले आहे. यामुळे भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा एकदा जगातील सर्वात वेगाने विकास साधणारी अर्थव्यवस्था ठरणार आहे. तसेच २०१७ साली जागतिक अर्थव्यवस्थेने मागील सात वर्षांच्या तुलनेत सर्वात उत्तम विकास साधला असल्याचेही आयएमएफने आपल्या या अहवालात नमूद केले आहे.

4) दावोसमध्ये पंतप्रधान नरेंद्र माेदींचे 50 मिनिटे हिंदीत भाषण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी स्वित्झर्लंडच्या दावोस शहरात जागतिक आर्थिक परिषदेच्या ४८ व्या वार्षिक बैठकीच्या उद््घाटनपर सत्राला संबोधित केले. हिंदीतून ५० मिनिटांच्या भाषणात त्यांनी हवामान बदल, दहशततवाद आणि आत्मकेंद्रित होणे ही जगापुढील तीन सर्वात मोठी आव्हाने असल्याचे प्रतिपादन केले. ती मोडून काढण्यासाठी त्यांनी ४ उपायही सुचवले. भारत हे गुंतवणुकीसाठी जागतिक स्थळ असल्याचे सांगत मोदी म्हणाले, सरकारने रेड टेपला (लालफीतशाही) रेड कार्पेटमध्ये (लाल गालिचा) बदलले आहे. रवींद्रनाथ टागोर यांच्या प्रसिद्ध वक्तव्याने त्यांनी भाषण संपवले.

पंतप्रधान म्हणाले

– वैश्विक हवामान बदल, दहशतवाद व आत्मकेंद्रित होणे ही ३ मोठी आव्हाने
– सातत्यपूर्ण प्रयत्नामुळे भारत गुंतवणुकीचे जागतिक डेस्टिनेशन
– जगातील राजकीय, आर्थिक व सुरक्षा संस्थांत सुधारणांचे आवाहन

जगापुढील ३ आव्हाने
१ हवामान बदल : कार्बन उत्सर्जन घटवा, असे सर्वच सांगतात. मात्र असे किती देश आहेत जे विकसनशील देशांना तंत्रज्ञान देण्यासाठी समोर येतात.
२ दहशतवाद : दहशतवादापेक्षा त्यात केलेला गुड टेररिस्ट आणि बॅड टेररिस्ट असा बनावट भेद अधिक धोकादायक आहे.
३आत्मकेंद्रित : अनेक समाज आणि देश जास्तीत जास्त आत्मकेंद्रित होत आहेत. अशा मनोवृत्ती आणि चुकीच्या प्राथमिकतांचे परिणाम हवामान बदल व दहशतवादाच्या धाेक्यापेक्षा कमी नाहीत.

अाव्हानांवर ४ उपाय
१ सर्वांनी मतभेद मोडून समान आव्हानांविरुद्ध एकत्र येत काम करावे.
२ आंतरराष्ट्रीय कायदे व नियमांचे योग्य पालन व्हावे.
३ जगातील मुख्य राजकीय, आर्थिक व सुरक्षा संस्थांत सुधारणा व्हावी.
४ जगाच्या आर्थिक प्रगतीला चालना द्यावी लागेल.

5) सर्वात मोठ्या घुमटाकार प्रार्थनास्थळी 54 महामानवांचे पुतळे

एमआयटी विश्वशांती विद्यापीठाच्या वतीने पुण्याजवळील विश्वराजबाग लोणी काळभोर येथे विश्वशांती आणि मानवतेचे प्रतीक म्हणून उभारण्यात येत असलेल्या जगातील सर्वात मोठ्या घुमटाकार प्रार्थना सभागृहाचा कळसाराेहण समारंभ २६ जानेवारी राेजी अायाेजित करण्यात अाला अाहे. त्याला संत श्री ज्ञानेश्वर महाराज विश्वशांती प्रार्थना सभागृह असे नाव देण्यात अाले अाहे. विश्वकल्याणाचे महान कार्य करणारे संत, शास्त्रज्ञ आणि तत्त्वज्ञ यांच्या भव्य ५४ पुतळ्यांचा त्यात समावेश अाहे.

MSPC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी Mission MPSC ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्रामवर फॉलो करा.

Related Articles

Check Also
Close
Back to top button