⁠
Uncategorized

चालू घडामोडी – २४ जुलै २०१६

देश-विदेश

दोन वर्षांत २२ हजार कोटींची अघोषित संपत्ती
# प्राप्तिकर विभागाने गेल्या दोन वर्षांत एकंदर ९,५०० ठिकाणी टाकलेल्या धाडी व तपासातून देशांतर्गत एकूण अघोषित संपत्तीचे प्रमाण २२,४७५ कोटी रुपयांच्या घरात जाणारे असल्याचा निष्कर्ष काढला असल्याचे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितले.आर्थिक वर्ष २०१४-१५ आणि २०१५-१६ अशा दोन वर्षांत शहानिशेचा भाग प्राप्तिकर विभागाने ९९० करदात्यांसंबंधाने पूर्ण केलेल्या धाडसत्रांतून १४७४ कोटी रुपयांची मालमत्ता जप्तही केली आहे, असे जेटली यांनी लोकसभेत एका लेखी उत्तरादाखल स्पष्ट केले. याच कालावधीतील अन्य ९,५४७ धाडींमधून एकूण अघोषित संपत्तीची मात्रा २२,४७५ कोटी रुपयांची असल्याचे आढळून आले असल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र

सचिनच्या खासदार निधीतून निराश्रित बालकांच्या छात्रावासाला आश्रय
# क्रिकेटचा देव अर्थात, भारतरत्न सचिन तेंडूलकरच्या खासदार निधीतून डॉ. हेडगेवार जन्मशताब्दी सेवा समितीच्या वतीने संचालित निराश्रित बालकांच्या ‘आश्रय’ छात्रावास प्रकल्पाचे भव्य व अद्ययावत बांधकाम येथे होत आहे. रा.स्व. संघाचे स्वयंसेवक व समितीचे अध्यक्ष डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार यांच्या हस्ते या छात्रावासाचे भूमिपूजन झाले. तेंडूलकरने या छात्रावासाच्या बांधकामासाठी निधी दिल्याबद्दल त्याचे सर्वत्र कौतूक करण्यात येत आहे. निराश्रित बालकांच्या संस्कारक्षम संगोपनासाठी येथील डॉ. हेडगेवार जन्मशताब्दी सेवा समितीने ‘आश्रय’ नावाने २००३ मध्ये छात्रावास स्थापन केले. रा.स्व. संघाच्या तत्कालीन विभाग प्रचारकांनीच या ‘आश्रय’ची मुहूर्तमेढ रोवली होती. चंद्रपूर व गडचिरोली या जिल्ह्य़ातील दुर्गम आदिवासी परिसरात प्रवास करताना तेथे आढळलेल्या होतकरू व शिकण्याची इच्छा असलेल्या, पण सुविधांअभावी वंचित राहणाऱ्या मुलांना त्यांनी येथे आणले. ही मुले आता शिकून मोठी झाली, तर सिरोंचा, एटापल्ली, मुलचेरा, कोरची, जिवती, गोंडपिपरी या परिसराच्या दुर्गम भागातीले विद्यार्थी आजही येथे राहून शिक्षण घेत आहेत.

‘ई-कम्प्लेंट’द्वारे नोंदवा घरबसल्या तक्रारी:मुख्यमंत्री
# क्राइम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टिम (सीसीटीएनएस) पूर्णतः कार्यान्वित करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. तसेच, नागरिकांना आता घरबसल्या पोलिस ठाण्यात ऑनलाइन तक्रार नोंदविता येईल. राज्यातील नागरिकांना पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी “ई-कम्प्लेंट‘ हे ऑनलाइन पोर्टल उपलब्ध करण्यात येणार असून, पथदर्शी प्रकल्प म्हणून पुणे शहरात याची सुरवात करण्यात येत आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे सांगितले. महाराष्ट्र राज्य पोलिस कर्तव्य मेळाव्याच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, पोलिस महासंचालक (कायदा व तंत्रज्ञान) प्रभात रंजन, पोलिस आयुक्त रश्‍मी शुक्‍ला, गुन्हे अन्वेषण विभागाचे अतिरिक्‍त पोलिस महासंचालक संजयकुमार, राज्याचे कारागृह महानिरीक्षक भूषणकुमार उपाध्याय, विशेष पोलिस महानिरीक्षक (गुन्हे) रितेश कुमार आदी या वेळी उपस्थित होते.

क्रीडा

भारतीय महिला हॉकी संघाची विजयी हॅट्ट्रिक
# भारतीय महिला हॉकी संघाने अमेरिका दौऱ्यावर विजयी मालिका कायम राखताना हॅट्ट्रिक नोंदवली. पूनम राणी, रेणुका यादव व अनुराधा थॉकचोम यांच्या प्रत्येकी एका गोलच्या जोरावर भारताने सलग दुसऱ्या लढतीत कॅनडावर ३-१ असा विजय मिळवला. भारतीय महिलांनी आक्रमक खेळ करताना पहिल्या काही मिनिटांतच गोल करण्याच्या संधी निर्माण केल्या. मात्र, कॅनडाच्या रोवन हॅरिसने त्यांचे प्रयत्न हाणून पाडले. पहिल्या सत्रात गोलशून्य बरोबरी समाधान मानावे लागल्यानंतर भारताने १९व्या मिनिटाला आघाडी घेतली. कॅनडाची बचावफळी सहज भेदून पूनम राणीने गोल केला. तीन मिनिटानंतर नॅटेलीए सौरीसीयूने गोल करून सामना १-१ असा बरोबरीत आणला. सामन्यातील तणाव वाढलेले असताना भारताच्या दीप ग्रेस एक्काला हिरवे कार्ड दाखवण्यात आले, तर कॅनडाला पेनल्टी कॉर्नर बहाल करण्यात आली. मात्र, त्यांना संधीचा फायदा घेता आला नाही. मध्यंतरापर्यंत सामना १-१ असा बरोबरीतच होता.

नरसिंह यादव उत्तेजक द्रव्य चाचणीत दोषी
# नवी दिल्ली – रिओ ऑलिंपिक स्पर्धेसाठी निवड झालेला भारताचा कुस्तीपटू नरसिंह यादव हा राष्ट्रीय उत्तेजक द्रव्यविरोधी संस्थेच्या (नाडा) उत्तेजक चाचणीमध्ये दोषी आढळला असल्याची माहिती नाडाचे संचालक नवीन अगरवाल यांनी आज (रविवार) दिली. भारतीय कुस्ती संघाच्या जॉर्जिया येथे होत असलेल्या सराव सत्रामध्ये जाण्यापासून यादव याला रोखण्यात आल्यानंतर त्याच्या ऑलिंपिक स्पर्धेमधील खेळण्यावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते.

‘एमसीए’च्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणार – शरद पवार
# राजकारण आणि भारतीय क्रिकेट मंडळातील प्रभावी आणि गाजलेल्या काही नावांमध्ये अग्रस्थानी असलेल्या शरद पवार यांना मुंबई क्रिकेट मंडळाच्या (एमसीए) अध्यक्ष पदावरुन काढता पाय घ्यावा लागणार आहे. नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत वयाची पंच्याहत्तरी ओलांडलेल्या शरद पवार यांनी आपल्याला न्यायालयाचे निर्णय मान्य आहेत, असे सांगत अध्यक्षपद सोडण्यास तयार असल्याचे संकेत दिले आहेत. महाराष्ट्र राज्यात मुंबई क्रिकेटअसोसिएशन, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन, विदर्भ क्रिकेट असोसिएशन आणि भारतीय क्रिकेट मंडळाशी देखील शरद पवार संलग्न आहेत.

Related Articles

Back to top button