⁠
Uncategorized

Current Affairs 24 March 2018

1) राज्यसभेत भाजपा ‘नंबर वन

सात राज्यांमध्ये राज्यसभेच्या २६ जागांसाठी शुक्रवारी मतदान झालं. त्यात भाजपाला १२, काँग्रेसला पाच, तृणमूल काँग्रेसला चार, जदयूला एक आणि तेलंगणा राष्ट्र समितीला तीन जागा मिळाल्या. या वर्षाचा विचार करायचा झाल्यास, राज्यसभेच्या १७ राज्यांमधील ५९ जागा रिक्त झाल्या होत्या. त्यापैकी, ३३ जागा बिनविरोध निवडल्या गेल्या. त्यापैकी भाजपाचे १६ जण होते. म्हणजेच, वर्षभरात भाजपाचे २८ खासदार राज्यसभेवर निवडून गेले आहेत. राज्यसभेत आता भाजपाचे ६९ खासदार झाले आहेत, तर काँग्रेस सदस्यांची संख्या ५० आहे. एकूण २४५ सदस्यांच्या राज्यसभेत बहुमतासाठी १२६ चा आकडा गाठणं आवश्यक आहे. राज्यसभेच्या उत्तर प्रदेशातील नऊ जागा भाजपाने जिंकून दाखवल्या. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पुन्हा एकदा धमाका केला. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यासह भाजपाचे सर्व नऊ उमेदवार राज्यसभेवर निवडून आले आहेत.

2) अमेरिकेचे चिनी आयातीविरुद्ध तब्बल ६0 अब्ज डॉलरचे शुल्क

अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चिनी आयातीविरुद्ध तब्बल ६0 अब्ज डॉलरचे शुल्क लावले आहे. अमेरिकी बौद्धिक संपदेची चीनकडून होत असलेल्या चोरीबाबत चौकशीनंतर आलेल्या अहवालाच्या आधारे हे शुल्क लावण्यात आले. आयात शुल्क वाढीच्या कारवाईतून अमेरिकेने युरोपीय देश, बिटन, आॅस्ट्रेलिया, ब्राझिल, दक्षिण कोरिया अशा काही देशांना वगळले आहे. याआधी अमेरिकेने कॅनडा आणि मेक्सिको या शेजारी देशांनाही शुल्कवाढीतून दिलासा दिला होता.

3) फेसबुक डेटा लीकप्रकरणी इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाची केम्ब्रिज अॅनालिटिकाला नोटीस

अमेरिकेसह अनेक देशांच्या निवडणुकांमध्ये 5 कोटी फेसबुक सदस्यांचा डेटा चोरून मतदारांवर प्रभाव पाडण्याचा आरोप असणाऱ्या केम्ब्रिज अॅनालिटिका कंपनीला इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं नोटीस बजावली आहे. या नोटीसद्वारे 31 मार्चपर्यंत 6 प्रश्नांची उत्तर द्यायला सांगितले आहे. अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, अशा इशारादेखील माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने केम्ब्रिज अॅनालिटिकाला दिला आहे. भारतीयांच्या माहितीचा वापर करण्यामध्ये कंपनीचा स्वतःचा सहभाग आहे का?,कंपनीच्या माध्यमातून भारतीयांची माहिती मिळवणाऱ्या दुसऱ्या कंपन्या कोणत्या आहेत?, भारतीयांची माहिती त्यांनी कशा प्रकारे मिळवली?, माहिती मिळवण्यापूर्वी संबंधित व्यक्तीची परवानगी घेतली होती का?, या माहितीपर्यंत कंपनी कशी पोहोचली?, या मिळवलेल्या माहितीच्या आधारे काही नवी प्रोफाईल्स तयार करण्यात आली आहेत का? यांसारख्या प्रश्नांचा नोटीसमध्ये समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. 23 मार्च 2018 ला केंद्र सरकारने केम्ब्रिज अनॅलिटिकाला ही नोटीस पाठवली आहे. फेसबुकवरील डेटाचोरीच्या प्रकरणाने अमेरिका, इंग्लंड आणि भारतात रान उठवले असतानाच आणि त्याबद्दल फेसबुकचा सीईओ मार्क झुकेरबर्ग याने माफीही मागितली आहे.

4) ‘स्पेस एक्स’नं फेसबुक पेज केलं डिलीट

अमेरिकन उद्योगपती एलॉन मस्क यांनी त्यांच्या ‘स्पेस एक्स’ आणि इलेक्ट्रीक कार तयार करण्याऱ्या ‘टेस्ला’ या कंपन्याचे फेसबुकवरील पेज बंद केले आहेत. केम्ब्रिज अॅनालिटिका प्रकरणानंतर एखाद्या कंपनीने फेसबुकवरील पेज बंद करण्याची ही पहिलीच घटना आहे. फेसबुकसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. फेसबुक डेटा चोरी प्रकरणानंतर ट्विटरवर एका युजरने एलॉन मस्क यांना फेसबुकवरील ‘स्पेस एक्स’चे अधिकृत पेज बंद करण्याचे आव्हान दिले होते. मस्क यांनीदेखील काही वेळातच फेसबुकवरील पेज बंद करुन फेसबुकला जोर का झटका दिला आहे. ‘आम्ही फेसबुकसोबत कधीही जाहिरात केलेली नाही. आमची खोटी जाहिरात करण्यासाठी आम्ही कोणाला सांगत नाही किंवा त्यासाठी कोणाची सेवा घेत नाही. माझ्या कंपन्यांची सर्व उत्पादने ही त्यांच्या दर्जामुळेच चालतात, असे त्यांनी सांगितले.

5) टाटा समूह देशातील अव्वल पोलाद उत्पादक : भूषण स्टीलवर टाटा स्टीलचे नियंत्रण

भूषण स्टीलवर अखेर टाटा स्टीलचे नियंत्रण आले आहे. याबाबतच्या निविदा प्रक्रियेत टाटा स्टीलने निविदा मिळविली आहे. टाटा समूहातील पोलाद कंपनीने या व्यवहारासाठी ३५,००० कोटी रुपये मोजले असल्याचे कळते. रोखीने हा व्यवहार झाला असून याद्वारे टाटा समूह देशातील अव्वल पोलाद उत्पादक ठरला आहे. ५६ लाख टन उत्पादन क्षमता असलेल्या भूषण स्टीलच्या अधिग्रहणामुळे टाटा स्टीलच्या १३ लाख टन उत्पादन क्षमतेत आता अधिक भर पडणार आहे. भूषण स्टीलला कर्ज देणाऱ्या बँकांच्या समितीने टाटा स्टीलची खरेदीसाठीची निविदा मंजूर केल्याची माहिती शुक्रवारी जाहीर केली.भूषण स्टीलवर विविध बँकांचे ४८,१०० कोटी रुपयांचे कर्ज आहे. तिच्या लिलावाकरिता कंपनीतील कर्मचारी गटानेही याबाबतच्या खरेदी प्रक्रियेत भाग घेतला होता. राष्ट्रीय कंपनी कायदे लवादाच्या निर्देशानुसार रिझव्‍‌र्ह बँकेने निश्चित केलेल्या १२ थकीत कर्जदार कंपन्यांच्या यादीत भूषण स्टीलचेही नाव आहे.

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी Mission MPSC ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Related Articles

Back to top button