Current Affairs 24 March 2020
महाराष्ट्रात संचारबंदी, देशभरात लाॅकडाऊन
करोनाचा सामना करण्यासाठी देशासह राज्यात हायअलर्ट ठेवण्यात आला आहे. सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यात संचारबंदी लागू केल्याचं जाहीर केलं.
“कोरोनाविरुद्धचा लढा गंभीरपणे घ्या. स्वतःच्या आणि दुसऱ्यांच्या आरोग्याशी खेळू नका. 144 कलम लावले आहे त्यामुळे केवळ अत्यावश्यक सेवाच सुरू राहतील. रस्त्यांवर वाहने आणून गर्दी करून कायदा मोडू नका, असे ट्विट उद्धव ठाकरे यांनी ट्विट केलं होतं.राज्यभरात १४४ कलम लागू केलंय.
वित्त विधेयक मंजुरीनंतर संसद संस्थगित
लोकसभेत सोमवारी वित्त विधेयक आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आले. त्यानंतर संसद संस्थगित करण्यात आली.
नेहमीचा प्रश्नोत्तर आणि शून्यप्रहर वगळून थेट वित्त विधेयक सभागृहाच्या पटलावर मांडण्यात आले. सभागृहाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सर्वपक्षांच्या नेत्यांची बैठक घेतली. त्यात वित्त विधेयकावर चर्चा न करता ते मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला.
मध्य प्रदेश : शिवराजसिंह चौहान चौथ्यांदा मुख्यमंत्रीपदी विराजमान
मध्य प्रदेशात अनेक नाट्यमय घडामोडींनंतर भाजपानं अखेर आपलं सरकार स्थापन केलं आहे. भाजपाचे राज्यातील वरिष्ठ नेते शिवराज सिंह चौहान यांनी सोमवारी रात्री नऊ वाजता राजभवन येथे राज्यपालांच्या हस्ते मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अवघ्या १८ महिन्यात ते पुन्हा मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले आहेत. शिवराजसिंह चौहान चौथ्यांदा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून कारभार पाहणार आहेत.
तत्पूर्वी, शिवराजसिंह चौहान यांना सोमवारी भाजपाच्या विधीमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली.
१६७ वर्षांच्या इतिहासात दुसऱ्यांदा रेल्वेची धडधड थांबली
भारताची जीवनवाहिनी म्हणून ओळख असलेल्या भारतीय रेल्वेची प्रवासी सेवा कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २२ मार्चपासून पूर्णपणे थांबवण्यात आलेली आहे.
१९७४ च्या कर्मचारी संपानंतर रेल्वे सेवा पूर्णपणे ठप्प होण्याची ही दुसरी वेळ. १६७ वर्षाचा इतिहास असलेल्या भारतीय रेल्वेत संपाचा अपवाद वगळता असे प्रथमच घडत आहे. ३१ मार्चपर्यंत अर्थात तब्बल ११ दिवस रेल्वे सेवा बंद राहील.
१६ एप्रिल १८५३ मध्ये मुंबई ते ठाणे दरम्यान भारतात पहिली रेल्वे धावली. तेव्हापासून भारतीय लोकांच्या जीवनातील अविभाज्य भाग असलेली रेल्वे अनेक संकटावर मात करत अखंडितपणे धावत आहे. इतिहासावर नजर टाकल्यास ७ ते २८ मे १९७४ मध्ये रेल्वे कर्मचाऱ्याच्या संपामुळे २० दिवस प्रथमच रेल्वे सेवा ठप्प होती. कामाचे तास कमी करा, बोनस वाढवा आदी मागण्यासाठी आॅल इंडिया रेल्वे मेन्स फेडरेशनचे तत्कालीन अध्यक्ष स्व. जॉर्ज फर्नांडिस यांच्या नेतृत्वाखाली पुकारण्यात आलेल्या संपामुळे संपूर्ण भारतातील रेल्वे सेवा प्रथमच जवळजवळ ठप्प झाली हाेती. त्यानंतर ४६ वर्षांनी दुसऱ्यांदा गाड्यांची धडधड पूर्णपणे ठप्प झाली आहे.