देश-विदेश
चित्रपटापूर्वी सरकारी लघुपट दाखवण्याची मंत्रिगटाची शिफारस
केंद्राच्या सरकारी योजनांच्या नावाच्या आधी प्रधानमंत्री, पंतप्रधान व पीएम (भाषेनुसार) किंवा राष्ट्रीय नेत्यांची नावे लावली जाणार असून प्रत्येक चित्रपटगृहात चित्रपटापूर्वी मोदी सरकारच्या कामगिरीवरील लघुपट दाखवणे अनिवार्य करण्यात येणार आहे. मंत्रिगटाने या शिफारशी केल्या असून त्यात केंद्र सरकारच्या योजना तसेच राज्यातील व जिल्ह्य़ातील कामगिरी लोकांच्या नजरेत भरण्यासाठी त्याबाबतचे लघुपट चित्रपटगृहात दाखवावेत असे म्हटले आहे. संसदीय कामकाज मंत्री एम. व्यंकय्या नायडू यांच्या नेतृत्वाखालील बैठकीत विचारानंतर या शिफारशींची एक टिप्पणी जारी करण्यात आली आहे.
महाराष्ट्र
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस महासंचालकपदी सतीशचंद्र माथूर
पुण्याचे माजी पोलीस आयुक्त सतीशचंद्र माथूर यांची राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक (एसीबी) विभागाच्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सोमवारी राज्याच्या गृह विभागाकडून या संबंधीचे आदेश जारी करण्यात आले. सतीशचंद्र माथूर यांची पुण्यातून बदली करताना त्यांच्याकडे राज्य पोलीस गृहनिर्माण महामंडळाचे महासंचालकपद देण्यात आले होते. त्यावेळीच विजय कांबळे यांच्याकडे यांच्याकडे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालकपद देण्यात आले होते. कांबळे यांच्या निवृत्तीनंतर या पदावर सतीशचंद्र माथूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सराफ व्यावसायिकांचा आजपासून तीन दिवस संप
महाराष्ट्र सराफ सुवर्णकार फेडरेशनच्या नगरमध्ये झालेल्या राज्यस्तरिय बैठकीत, केंद्र सरकारने अबकारी कायद्यात कोणतीही तडजोड केली नसल्याने सोमवारपासून पुन्हा तीन दिवसांचा राष्ट्रीय बंद पुकारण्याचा तसेच उद्याच दिल्लीत संसदेवर मोर्चा काढण्याचा निर्णय संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष फत्तेचंद राका यांनी जाहीर केला.
क्रीडा
कुस्तीपटू संदीप तोमर ऑलिम्पिकसाठी पात्र
भारताचा कुस्तीपटू संदीप तोमरने पहिल्या जागतिक ऑलिम्पिक पात्रता स्पध्रेत पुरुषांच्या ५७ किलो फ्री स्टाईल प्रकारात कांस्यपदकाची कमाई करून रिओ ऑलिम्पिक पात्रता निश्चित केली आहे. २५ वर्षीय संदीप हा रिओवारी पक्की करणारा चौथा भारतीय कुस्तीपटू ठरला आहे. याआधी योगेश्वर दत्त (६५ किलो फ्री स्टाईल), नरसिंग यादव (७४ किलो फ्री स्टाईल) आणि हरदीप सिंग (ग्रिको-रोमन ९८ किलो) यांनी गतवर्षी ऑलिम्पिक प्रवेश निश्चित केला होता. कांस्यपदक पटकावल्यानंतर संदीपने तिसऱ्या क्रमांकासाठीच्या लढतीत विजय मिळवत ही किमया साधली.
भारताच्या मेराज खानला नेमबाजीत रौप्यपदक
रिओ दि जानेरो- नेमबाजी विश्वकरंडक स्पर्धेत भारताचा आघाडीचा नेमबाज मेराज अहमद खान याने यशस्वी सलामी देत पुरुषांच्या स्कीट प्रकारात रौप्यपदक पटकावले. मेराजच्या विजयाच्या रुपाने भारताला विश्वकरंडक स्पर्धेत ‘स्कीट‘मधील पहिलेवहिले पदक प्राप्त झाले आहे. आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा संघटनेच्या (ISSF) वतीने आयोजित विश्वकरंडक स्पर्धा रिओ दि जानेरो येथे पार पडत आहे.
दत्तू भोकनळला ऑलिंपिकचे तिकीट
नाशिक – भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेला दत्तू बबन भोकनळ याने रिओ (ब्राझील) ऑलिंपिकसाठी नौकानयन (रोइंग) क्रीडा प्रकारात पात्रता मिळविली आहे. कोरिया येथे झालेल्या पात्रता स्पर्धेमध्ये एकेरी पुरुष (सिंगल स्कल) प्रकारात हे यश मिळविले. यापूर्वी नाशिक जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत आँलिपिकसाठी पात्र ठरली आहे.