Current Affairs 25 January 2020
ऑक्सफर्ड शब्दकोशात ‘चाळ’ आणि ‘डब्या’चा समावेश
इंग्रजी संभाषणातील वापर आणि प्रचलित शब्द या निकषांवर जगभरातील नव्या अर्थपूर्ण शब्दांना सामावून घेणाऱ्या ‘ऑक्सफर्ड लर्नर्स डिक्शनरी’मध्ये आता भारतात बोलल्या जाणाऱ्या आणखी २६ शब्दांना स्थान देण्यात आले आहे.
विशेष म्हणजे यात मराठमोळे डब्बा (जेवणाचा), चाळ (वसती) हे शब्द आणि शादी, हरताळ, आधार (आधार कार्ड) यांचा समावेश आहे.
ऑक्सफर्ड शब्दकोशाची ही अद्यायावत दहावी आवृत्ती शुक्रवारी प्रकाशित करण्यात आली. या आवृत्तीत ३८४ भारतीय (भारतीय इंग्रजी) शब्दांचा समावेश आहे. यावेळी एकूण एक हजार नव्या शब्दांना या कोशाने सामावून घेतले आहे. त्यात चॅटबॉट, फेक न्यूज आणि मायक्रोप्लास्टीक या शब्दांचा समावेश आहे.
नव्या ऑनलाईन आवृत्तीमध्ये अंतर्भूत केलेल्या २६ नव्या भारतीय शब्दांपैकी २२ शब्दांना मुद्रित आवृत्तीमध्ये स्थान दिले आहे,
या शब्दकोशातील अन्य भारतीय शब्दांत, आंटि (एयूएनटीआयइ) (आन्टी- एयूएनटीवाय या इंग्रजी शब्दाचे भारतीय रूप), बस स्टॅन्ड, टय़ूब लाइट, व्हेज आणि व्हिडिओग्राफ यांचा समावेश आहे.
ऑक्सफर्ड शब्दकोशाला ७७ वर्षे होत असून त्याचा श्रीगणेशा १९४२ मध्ये जपानमध्ये झाला. या कोशाचे कर्ते अल्बर्ट सिडने यांचा उद्देश हा जगभरातील भाषा अभ्यासकांना इंग्रजी वापरातील शब्दांचा अर्थ समजावा हा होता.
भारतात फेसबुक मार्केटिंग प्रमुखपदी अविनाश पंत यांची नियुक्ती
फेसबुक कंपनीने अविनाश पंत यांची फेसबुक इंडियाचे मार्केटिंग प्रमुख (विपणन संचालक) म्हणून नियुक्ती केली आहे. शुक्रवारी याबाबत कंपनीकडून माहिती देण्यात आली आहे. विपणन संचालक हे नवं पद असेल आणि फेसबुक, इंस्टाग्राम व व्हॉट्सअॅपसह फेसबुकच्या मालकिच्या सर्व अॅप्सवरील मार्केटिंगच्या प्रयत्नांवर देखरेख ठेवण्याची मुख्य जबाबदारी त्यांच्यावर असेल. पंत यांच्याकडे २२ वर्षांचा अनुभव असल्याची माहिती फेसबुकने दिली. पंत यांच्याकडे यापूर्वी नाइकी, कोकाकोला, दी वॉल्ट डिज्नी कंपनी आणि रेडबुल यांसारख्या कंपन्यांसोबत काम करण्याचा मोठा अनुभव आहे.
रेडबुलचे भारतातील मार्केटिंग प्रमुख म्हणून त्यांनी अखेरची जबाबदारी सांभाळली होती. ब्रँड म्हणून रेडबुलची ओळख निर्माण करण्याची त्यांच्यावर मुख्य जबाबदारी होती.
आयआयएम अहमदाबाद येथून उत्तीर्ण झालेले पंत हे फेसबुकचे व्यवस्थापकीय संचालक आणि उपाध्यक्ष अजित मोहन यांना कामासंबंधीचा अहवाल सादर करतील.
राणी बागेत देशातील पहिले 5 मजली उंचीचे मुक्त पक्षी विहार
भायखळा येथील राणी बागेत पहिल्यांदाच देशातील पाच मजली उंचीचे मुक्त पक्षी विहार आणि प्राण्यांसाठी सहा दालने तयार केली आहेत. यात शंभर प्रजातींचे पक्षी आणि बिबट्या, अस्वल, तरस, कोल्हा हे प्राणी पर्यटकांना पाहता येणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या दालनांचे लोकार्पण करण्यात येणार आहे.
तीन वर्षांपूर्वी मार्च 2017 मध्ये ‘पेंग्विन’चे आगमन झाले आणि बागेत येणा-या मुंबईकरांच्या व पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली. आता पेंग्विनच्या पाठोपाठ देश विदेशातील 100 प्रजातींच्या पक्ष्यांसाठी पाच मजली उंचीचे वैशिष्ट्यपूर्ण ’मुक्त विहार’ दालन उभारले आहे. या मुक्त विहारात भ्रमंती करणार्या पक्ष्यांना जवळून न्याहाळता येईल. तसेच नव्यानेच आगमन झालेल्या बिबट्या, अस्वल, तरस, कोल्हा, कासव यांना जवळून पाहण्यासाठी दालनांच्या दर्शनी भागात वैशिष्ट्पूर्ण काच बसवली आहे.
मुक्त पक्षी विहार दालन हे 44 फूट उंचीचे म्हणजेच सुमारे पाच मजली इमारतीच्या उंचीचे आहे. 18 हजार 234 चौरस फूट क्षेत्रफळात हे विहार तयार करण्यात आले आहे. यामध्ये पाणथळ जागांच्या जवळ राहणार्या छोट्या-मोठ्या पक्षांचा समावेश असेल. यामध्ये बजरीगर, क्रौंच, हॅरॉननाईट, पेलीकन, करकोचा (स्टॉर्क), सारस, मकाव यासारख्या विविध पक्ष्यांचा समावेश आहे.
राष्ट्रीय बाल पुरस्कार 2020 विजेत्यांशी पंतप्रधानांनी साधला संवाद
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्यांशी संवाद साधला. राष्ट्रपतींनी 22 जानेवारी 2020 रोजी 49 मुलांना प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान केले होते. हे पुरस्कार विजेते प्रजासत्ताक दिन संचलनातही सहभागी होणार आहेत. विविध राज्यांमधील या 49 विजेत्यांमध्ये जम्मू आणि काश्मीर, मणीपूर आणि अरुणाचल प्रदेशाच्या प्रत्येकी एका मुलाचा समावेश आहे.
ही मुले कला आणि संस्कृती, नाविन्यपूर्ण संशोधन, शैक्षणिक, सामाजिक सेवा, क्रीडा आणि शौर्य या क्षेत्रातील विजेते आहेत. केंद्र सरकार मुलांकडे राष्ट्र निर्मितीतील महत्वाचे भागीदार म्हणून पाहते. या पार्श्वभूमीवर नाविन्यपूर्ण संशोधन, शैक्षणिक गुणवत्ता, समाजसेवा, कला आणि संस्कृती, क्रीडा आणि शौर्य या सारख्या क्षेत्रात अद्वितीय कामगिरी करणाऱ्यांना सरकार दरवर्षी हे पुरस्कार देते.
एकातेरिनी ग्रीसच्या पहिल्या महिला राष्ट्रपती
ग्रीसच्या संसदेने बुधवारी देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्रपतिपदी महिलेची निवड केली आहे. 63 वर्षीय एकातेरिनी केल्लापोउलो यांच्या बाजूने 261 खासदारांनी मतदान करत रिपब्लिक ग्रीसचा राष्ट्रपती निवडल्याचे उद्गार संसदेचे अध्यक्ष कोस्टास सॉलस यांनी काढले आहेत.
केल्लापोएलो या सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीशांच्या कन्या असून त्यांनी पॅरिसच्या सोरबोन विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केले आहे. कौन्सिल ऑफ स्टेट ऑफ ग्रीसच्या त्या पहिल्या प्रमुख असतील. तर ग्रीसच्या राष्ट्रपतीसह त्या कमांडर इन चीफही असणार आहेत.