देश-विदेश
प्रसिद्ध सर्च इंजिन असलेल्या YAHOO ची होणार विक्री!
# जगातील मोठ्या सर्च इंजिन्सपैकी एक असलेल्या ‘याहू’ ची विक्री होणार आहे. याहूचा व्यवसाय ३३ हजार ५०० कोटी रूपयांना व्हेरिझॉन कम्युनिकेशन्स विकत घेणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ‘याहू’ ला गुगल आणि फेसबुककडून कडवी झुंज मिळत आहे. या कंपन्यांमुळे ‘याहू’च्या नफ्यात देखील गेल्या अनेक वर्षांपासून घट होत आहे. ‘याहू’सोबत झालेल्य या करारामुळे व्हेरिझॉनच्या ‘एओएल इंटरनेट’ व्यवसायाला तेजी मिळेल. व्हेरिझॉनने गेल्याच वर्षी एओएलला ४.४ अरब डॉलमध्ये विकत घेतले होते. या विक्रीनंतर याहूचा ऑपरेटिंग कंपनी म्हणून असलेला प्रवासदेखील संपुष्टात येईल. तसेच, यानंतर ‘याहू’ची केवळ ‘याहू जापान’मध्ये ३५.५ टक्के आणि चीनच्या ई-कॉमर्स कंपनी ‘अलीबाबा ग्रुप होल्डिंग’मध्ये १५ टक्के हिस्सेदारी राहिल.
नेपाळचे पंतप्रधान ओली यांचा राजीनामा
# नेपाळचे पंतप्रधान के. पी. ओली यांनी अखेर राजीनामा दिला आहे. संसदेमध्ये अविश्वास प्रस्तावावर उत्तर देण्यापूर्वीच त्यांनी आपले पद सोडले आहे. ओली यांनी आपला राजीनामा राष्ट्रपती बिंदिया देवी भंडारी यांच्याकडे सादर केला आहे. संसदेमध्ये मागील तीन दिवसांमध्ये अविश्वास प्रस्तावावर जोरदार चर्चा सुरू होती. आणि रविवारी ओली यांना त्यावर उत्तर द्यावे लागणार होते. सरकारसोबत युती केलेल्या माओवादी सह अनेक पक्षांनी सरकारलासंसदेमध्ये मागील तीन दिवसांमध्ये अविश्वास प्रस्तावावर जोरदार चर्चा सुरू होती. दिलेले समर्थन यापूर्वीच मागे घेतले आहे. या पक्षांनी अविश्वासच्या बाजुने मतदान करण्याचा निर्णय घेतल्यानंतर ओली यांनी राजीनामा दिला आहे. ओली यांनी याच्यापूर्वी राजीनामा देण्यास नकार दिल्यानंतर नेपाळी कॉंग्रेस आणि सीपीएन (एम) यांच्याकडून अविश्वास प्रस्तावाची मागणी करण्यात आली होती.
सुप्रीम कोर्टाकडून अपवादात्मक परिस्थितीत गर्भपाताला मान्यता
# सर्वोच्च न्यायालयाकडून सोमवारी अपवादात्मक परिस्थितीत गर्भपात करण्याला मान्यता देण्यात आली. तपासणीवेळी गर्भात दोष आढळल्यास किंवा मातेचा जीव धोक्यात असल्यास गर्भपात करता येईल, असे न्यायालयाने निकालात सांगितले. यापूर्वीच्या कायद्यानुसार २० आठवड्यांनंतर गर्भपात करता येत नव्हता. मात्र, न्यायालयाच्या आजच्या निर्णयामुळे २४ आठवड्यांपर्यंत गर्भपात करण्याला परवानगी मिळाली आहे. ‘मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी अॅक्ट १९७१’ कायद्यानुसार २० आठवड्यानंतर गर्भपात करता येत नाही. या नियमामुळे एका बलात्कार पीडितेचा गर्भपात करण्यामध्ये कायद्याचा अडथळा निर्माण झाला आहे. पीडित महिला कायद्याच्या नियमानुसार डॉक्टरांकडे गेली होती. मात्र, त्यावेळी गर्भपात करणे टाळण्याचा सल्ला तिला डॉक्टरांनी दिला होता. पुन्हा ती ज्यावेळी रुग्णालयात दाखल झाली. यावेळी गर्भधारणा होऊन २८ आठवडे उलटून गेल्याचे सांगत १९७१ च्या कायद्याचा दाखला देत डॉक्टरांनी तिला गर्भपात करता येणार नसल्याचे सांगितले. पीडित महिलेने १९७१ च्या कायद्यातील नियम चुकीचा असल्याचा दावा केला होता. आता वेळ-काळ बदलला आहे. या नियमामुळे माझे व्यक्तिगत आणि सामाजिक आयुष्यही प्रभावित झाल्याचे महिलेने न्यायालयात धाव घेतली.
काळवीट शिकार प्रकरणी सलमान खानची निर्दोष मुक्तता
# राजस्थान उच्च न्यायालयाने सोमवारी १९९८ सालच्या काळवीट शिकार प्रकरणात बॉलीवूड अभिनेता सलमान खान याची निर्दोष मुक्तता केली. सलमान खान आणि अन्य सात जणांविरुद्ध काळवीट आणि चिंकाराची शिकार केल्याचे दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले होते. १९९८ मध्ये ‘हम साथ साथ है’ चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान कंकणीजवळ सलमान व त्याच्या सहकाऱ्यांनी चिंकारा काळविटाची शिकार केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. बिष्णोई समाजाच्या तक्रारीनंतर २ ऑक्टोबर १९९८ रोजी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
क्रीडा
ऑलिम्पिकमध्ये रशियावर सरसकट बंदी नाही
# सरकार पुरस्कृत उत्तेजक सेवनप्रकरणी रशियाच्या चमूवर रिओ ऑलिम्पिकमध्ये सरसकट बंदी न घालण्याचा निर्णय आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने घेतला. रिओ ऑलिम्पिकमध्ये रशियाच्या खेळाडूंना सहभागी होऊ देण्याचा निर्णय समितीने प्रत्येक खेळाच्या संघटनेवर सोपवला आहे. रिओमध्ये सहभागासाठी इच्छुक रशियाच्या क्रीडापटूंना आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या उत्तेजकांसंदर्भातील सक्त निकषांचे पालन करावे लागेल. ५ ऑगस्टपासून ऑलिम्पिक स्पर्धा सुरू होत आहे. दरम्यान उत्तेजक सेवनप्रकरणी याआधी दोषी आढळलेल्या आणि शिक्षा झालेल्या रशियाच्या क्रीडापटूंना रिओ ऑलिम्पिकमध्ये सहभागी होता येणार नाही. रशियाच्या ट्रॅक अँड फिल्ड अर्थात मैदानी खेळात सहभागी होणाऱ्या क्रीडापटूंवर बंदी घालण्यात आली आहे.