शक्तीशाली चिनुक हेलिकॉप्टर्स आजपासून देशसेवेत दाखल
- अमेरिकन बनावटीचे CH-47F (I) चिनुक ही लढाऊ हेलिकॉप्टर्स आज देशसेवेत दाखल होणार आहेत. चंदिगडच्या एअऱ फोर्स स्टेशनवरील बेस रिपेअर डिपोट (3-BRD) येथे एका कार्यक्रमाद्वारे या हेलिकॉप्टर्सचे राष्ट्रार्पण होणार आहे. या हेलिकॉप्टर्समुळे भारतीय हवाई दलाची क्षमता आणखी वाढणार आहे.
- चिनुकच्या या राष्ट्रार्पण कार्यक्रमासाठी हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल बी. एस. धनोआ, वेस्टर्न एअर कमांडचे एअर ऑफिसर कमांडिंग इन चीफ (एओसी-इन-सी) एअर मार्शल आर. नांबियार हे हजेरी लावणार आहेत.
- पहिल्या खेपेतील चार चिनुक हेलिकॉप्टर्सचे आज राष्ट्रर्पण होणार आहे. ही चार अॅडव्हान्स डबल रोटर हेलिकॉप्टर्स भारतीय सैन्याला प्रत्यक्ष लढाईच्या वेळी आणि इतर वेळी सैन्याच्या पथकांना एका जागेवरुन दुसऱ्या जागी वाहून नेण्यासाठी उपयोगात येणार आहे. या विमानांची पहिली खेप चंदीगडच्या 3-BRD येथे जोडणीसाठी दाखल झाली आहे. अमेरिकेशी झालेल्या करारानुसार हवाई दलाला अशी १५ हेलिकॉपटर्स मिळणार आहेत.
राष्ट्रवाद म्हणजे ‘भारत माता की जय’ नव्हे: उपराष्ट्रपती
- राष्ट्रवादाचा अर्थ ‘भारत माता की जय’ म्हणणं नाही. सर्वांसाठी ‘जय हो’ हीच राष्ट्रभक्ती आहे. धर्म, जातीयवाद आणि शहरी-ग्रामीण असा भेदभाव करणे आदी गोष्टींपासून दूर राहा, असा सल्ला उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी विद्यार्थ्यांना दिला.
- भ्रष्टाचार, निरक्षरता, भीती, भूक आणि जातीवादापासून मुक्त असलेल्या ‘न्यू इंडिया’वर देशातील युवकांनी लक्ष केंद्रीत करायला हवं, असं नायडू यांनी विद्यार्थ्यांना सांगितलं.
- राष्ट्रवाद म्हणजे भारत माता की जय म्हणणे नव्हे. जय हो म्हणणे हीच खरी राष्ट्रभक्ती आहे. जर धर्म, जाती आणि शहरी-ग्रामीण विभाजनाच्या आधारे लोकांशी भेदभाव करत असाल तर तुम्ही ‘भारत माता की जय हो’ म्हणू शकत नाहीत, असंही नायडू म्हणाले.
- गेल्या काही वर्षांपासून सातत्यानं भारताचा विकासदर ७ टक्क्यांहून अधिक आहे. आगामी १०-१५ वर्षांत भारतीय अर्थव्यवस्था जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होईल, असा अंदाज आहे. समृद्ध भारतासाठी आणि रामराज्याची सुरुवात करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असंही ते म्हणाले.
दृष्टिहीनांसाठी नोटा ओळखणारे ‘मोबाइल अॅप’ लवकरच!
- दृष्टिहीनांना विविध मूल्यांच्या नव्या नोटा आणि नाणी ओळखण्यास मदत करू शकेल असे ‘मोबाइल अॅप’ विकसित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती रिझव्र्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय)उच्च न्यायालयात दिली.
- १०० आणि त्यावरील मूल्यांच्या नोटांचे स्वरूप हे असे आहे की त्या नोटांचे मूल्य स्पर्शाने दृष्टिहीनांना सहजपणे ओळखता येईल, असेही रिझव्र्ह बँकेतर्फे न्यायालयाला सांगण्यात आले. सततच्या वापरामुळे नोटांवरील चिन्ह हे बऱ्याचदा धूसर होत जाते, परंतु नव्या अॅपमुळे दृष्टिहीनांना अशा नोटा वा चलनेही ओळखता येणार आहे.
- हे अॅप प्रत्येक मोबाइलवर विनाशुल्क उपलब्ध करण्यात येणार आहे, अशी माहितीही बँकेच्या वतीने मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती नितीन जामदार यांच्या खंडपीठाला देण्यात आली.
हिंदुजा ब्रिटनमधील श्रीमंत आशियाई
- ब्रिटनमधील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या सूचीतील अव्वल स्थान हिंदुजा परिवाराने कायम राखले आहे. येथे आयोजित करण्यात आलेल्या एशियन बिझनेस पुरस्कारांदरम्यान श्रीमंत आशियाई व्यक्तींची सूची प्रसिद्ध करण्यात आली. ब्रिटनमध्ये २५.२ अब्ज पौंड्सची संपत्ती निर्माण करणाऱ्या हिंदुजा परिवाराने या सूचीत प्रथम स्थान मिळवले.
- गेल्या वर्षभरात त्यांच्या संपत्तीत ३ अब्ज पौंड्सची भर पडली आहे. हा परिवार गेल्या सहा वर्षांपासून या सूचीत अव्वल स्थानी आहे. मित्तल समूहाचे लक्ष्मी मित्तल व त्यांचा मुलगा आदित्य मित्तल हे या सूचीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहेत.