सर्वोच्च न्यायालयात चार नवे न्यायाधिश
- सर्वोच्च न्यायालयात चार नवीन न्यायाधिश नियुक्त करण्यात आले असून या चारही न्यायाधिशांनी आज आपल्या पदांची सुत्रे स्वीकारली.
- सरन्यायाधिश रंजन गोगोई यांनी त्यांना अधिकार पदाची शपथ दिली. त्यांच्या नियुक्त्यांमुळे सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधिशांची संख्या आता 31 झाली आहे. न्या बी.आर. गवई, सुर्यकांत, अनिरूद्ध बोस, आणि एस. ए. बोपण्णा अशी या नवनियुक्ती न्यायाधिशांची नावे आहेत.
- न्यायालयाच्या कॉलेजियमने या चार जणांची नावे केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठवली होती. तथापी त्यातील दोन नावांना केंद्र सरकारचा आक्षेप होता व ती नावे त्यांनी कॉलेजियमकडे परत पाठवली होती. पण कॉलेजियने पुन्हा त्याच नावांचा आग्रह धरल्याने ती सरकारला स्वीकारावी लागली. सेवा ज्येष्ठता आणि प्रादेशिक प्रतिनिधीत्व या कारणांने सरकारने त्यांच्या नावांना विरोध दर्शवला होता.
आखातातील तणाव भारतासाठी चिंताजनक
- इराण आणि अमेरीका यांच्यातील आखातातील तणाव सध्या युद्धजन्य स्थितीत पोहचला आहे. तथापी भारत हा आखाती देशांतून आयात केल्या जाणाऱ्या तेलावरच पुर्णपणे निर्भर असल्याने भारताची या तणावामुळे चिंता वाढली आहे. हा तणाव वाढू नये अशीच भारताची अपेक्षा आहे असे मत अमेरिकेतील भारताचे प्रतिनिधी हर्षवर्धन श्रृंगला यांनी व्यक्त केले आहे.
- अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यपुर्वेत आणखी जादा लष्कर पाठवण्याचा इशारा दिला आहे त्या पार्श्वभूमीवर श्रृंगला यांनी हे मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले की अमेरिकेने केलेल्या सुचनेनुसार भारताने इराणमधून तेल आयात करणे थांबवले आहे. भारत इराणकडून 2.5 अब्ज टन तेल आयात करीत होता. इराणबरोबरच व्हेनेझुएला मधूनही भारताने तेलाची आयात थांबवली आहे.
ब्रिटीश पंतप्रधान थेरेसा मे यांची राजीनाम्याची घोषणा
- ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी आपण राजीनामा देत असल्याची घोषणा केली आहे. येत्या 7 जून रोजी आपण पंतप्रधानपदाचा राजीनामा देत असून त्यानंतर पक्षाला आपल्या जागी दुसरा पंतप्रधान नेमता येईल असे त्यांनी म्हटले आहे.
- युरोपियन समुदायातून ब्रिटनने बाहेर पडावे या मागणीसाठी आग्रही असलेल्या थेरेसा मे या सन 2016 साली याच मुद्द्यावर देशाच्या पंतप्रधान झाल्या होत्या. पण त्यांना ही मागणी पुर्ण करण्यात अपयश आल्यामुळे त्यांनी आपल्या पदाच्या राजीनाम्याची घोषणा साश्रुनयनांनी केली.
आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचा राजीनामा
- आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत सत्तारूढ तेलगू देसम पक्षाचा (टीडीपी) नामुष्कीजनक पराभव झाल्याच्या पार्श्वभूमीवर एन.चंद्राबाबू नायडू यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. चंद्राबाबूंनी राज्यपाल ई.एस.एल.नरसिंहन यांच्याकडे राजीनामा सादर केला. राज्यपालांनी तो स्वीकारला असून वायएसआर कॉंग्रेसचे सरकार स्थापन होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
- राष्ट्रीय पातळीवर विरोधकांना एकत्र करण्यासाठी मागील काही दिवसांपासून सक्रिय असणाऱ्या चंद्राबाबूंसाठी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे निकाल दुहेरी हादरा ठरले आहेत.
मेघालय उच्च न्यायालयाचे हिंदू राष्ट्राबाबतचे निरीक्षण रद्द
- पाकिस्तानने स्वत:ला इस्लामिक राष्ट्र म्हणून घोषित केले तसे भारतानेही स्वत:ला हिंदू राष्ट्र म्हणून घोषित करावयास हवे होते, मात्र भारत धर्मनिरपेक्ष राष्ट्रच राहिले, असे निरीक्षण डिसेंबर २०१८ मध्ये मेघालय उच्च न्यायालयाचे न्यायाधीश एस. आर. सेन यांच्या एकसदस्यीय पीठाने नोंदविले होते, ते मेघालयचे मुख्य न्यायाधीश मोहम्मद याकूब मिर आणि न्या. एच. एस. थंगखिइव यांच्या खंडपीठाने अमान्य केले.
- न्या. सेन यांनी मेघालयचे राज्यपाल तथागत रॉय यांच्या ‘माय पीपल अपरुटेड : दी एक्सोड्स ऑफ हिंदूज फ्रॉम इस्ट पाकिस्तान अॅण्ड बांगलादेश’ या पुस्तकाचा हवालाही दिला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकारच केवळ याचे महत्त्व ओळखून त्यानुसार निर्णय घेईल याची आपल्याला खात्री आहे, असेही न्या. सेन यांनी म्हटले होते.