Current Affairs 26 – 27 January 2018
1) भारतीयांच्या ‘गुड मॉर्निंग’ मेसेजेसमुळे व्हॉट्सअप हैराण
सकाळपासून अनेकांच्या व्हाटसअॅपवर आणि अन्य अॅपवर गुड मॉर्निंगचे मेसेज यायला सुरुवात होते. भारतात हे प्रमाण इतके आहे की, दररोज एक तृतियांश स्मार्टफोनची मेमरी या मेसेजेसमुळे आणि त्यासोबत येणाऱ्या फोटोंमुळे फुल होऊ लागली आहे. वेस्टर्न डिजिटल कॉर्प कंपनीच्या आकडेवारीनुसार, भारतात प्रत्येक तीन स्मार्टफोनपैकी एक स्मार्टफोन दररोज ‘आऊट आॅफ मेमरी’ होतो. हीच संख्या अमेरिकेत दहापैकी एक आहे. म्हणजेच अमेरिकेत गुडमॉर्निंग मेसेजेसच्या भानगडीत कोणी पडत नसावे. आता गुगलने यावर उपाय शोधला असून ‘फाइल्स गो’नावाने एक अॅप तयार केले आहे. यामुळे दरदिवशी १ जीबी डेटा डिलिट करता येणार आहे. या अॅपच्या माध्यमातून आपण आता गुड मॉर्निंगचे मेसेज डिलिट करू शकतात. भारतात व्हॉट्सअपचे युजर्स कोट्यवधी आहेत. दर महिन्याला अॅक्टिव्ह असणारे २० कोटी युजर्स आहेत. मात्र, नवीन वर्षाच्या शुभेच्छा देणारे मेसेजेस मात्र एकाच दिवसात २० अब्ज एवढे होते.
२) आरएफआयडीने उपग्रहाद्वारे होणार ई-वे बिलाची निगराणी
केंद्र सरकारने १ फेब्रुवारीपासून आंतरराष्ट्रीय माल वाहतुकीसाठी जीएसटीचे ई-वे बिल बंधनकारक केले आहे. भविष्यात या ई-वे बिलाची निगराणी उपग्रहाद्वारे होऊन माल वाहतूकदारांना दिलासा मिळणार आहे. आरएफआयडी काय आहे? रेडिओ फ्रीक्वेन्सी आयडेन्टीफिकेशन डिव्हाईस (आरएफआयडी) ही एक डिजिटल चिप राहणार असून, ती ई-वे बिलासोबत आॅनलाईन मिळणार आहे व हे ई-वे बिल माल वाहतूक करणाºया ट्रकसोबत राहणार आहे. या ट्रकवर जीएसटी प्रशासन उपग्रहाद्वारे नियंत्रण ठेवणार आहे. ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम(जीपीएस)द्वारे हे होणार आहे. ई-वे बिलावर लागलेली डिजिटल चीप जीएसटी अधिकारी जीपीएसद्वारे वाचू शकतील व ट्रक नेमका कुठे उभा आहे, याची माहिती कार्यालयात बसून जीएसटी अधिकाºयांना मिळणार आहे, अशी माहिती जीएसटीचे अभ्यासक व नाग विदर्भ चेंबर आॅफ कॉमर्सचे महासचिव संजय अग्रवाल यांनी दिली. आरएफआयडी चिपमुळे कुठला ट्रक कुठून निघाला व तो कुठे जाणार आहे, या माहितीसोबतच ट्रकमध्ये किती माल आहे, कोणत्या क्रमांकाचे ई-वे बिल आहे, हे जीएसटी अधिका-यांना कळणार आहे. त्यामुळे तपासणीसाठी ट्रक थांबविण्याची आवश्यकता राहणार नाही. त्यामुळे वेळ आणि डिझेलची बचत होईल व माल वाहतूक अधिक वेगाने होईल. याचा फायदा माल वाहतूकदार व व्यापारी दोघांनाही होईल. सध्या प्रायोगिक तत्त्वावर आरएफआयडी चिप असलेले ई-वे बिल राजस्थानात सुरू आहे. भविष्यात ही प्रणाली देशभर लागू होणार आहे, अशी माहितीही अग्रवाल यांनी दिली.
३) २० सरकारी बँकांना मिळणार ८८,००० कोटी भांडवल
वाढत्या बुडीत कर्जामुळे संकटात सापडलेल्या २० सरकारी बँकांना यावर्षी ८८,००० कोटी रुपये भांडवल नव्याने देण्याची योजना वित्त मंत्रालयाने आखली आहे. या रकमेपैकी ८०००० कोटी केंद्र सरकार रिकॅपिटलायझेशन बाँडमार्फत खुल्या बाजारातून कर्जरूपाने उभे करणार आहे तर ८१३९ कोटी रुपये येत्या अर्थसंकल्पातून अनुदान रूपात उपलब्ध करणार आहे. याच बरोबर या सर्व बँकांना स्वत:च्या हिमतीवर १०,३१२ कोटी रुपये बाजारातून कर्जरूपाने उभारण्याची मुभा राहणार आहे. या २० पैकी ११ बँकांवर रिझर्व्ह बँकेने प्रॉम्ट करेक्टिव्ह अॅक्शन (पीसीए) व्यवसाय वाढीसाठी निर्बंध घातले आहेत. त्याअंतर्गत या बँकांना बुडीत कर्जवसुली झाल्याशिवाय नव्या शाखा उघडता येणार नाहीत अथवा मोठ्या रकमेची कर्जेसुद्धा देता येणार नाहीत. या ११ बँकांना तरलता निधी व इतर वैधानिक निधी पूर्ततेसाठी वित्त मंत्रालय ५२,३११ कोटी रुपये तर उरलेल्या नऊ बँकांना ३५,८२८ कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य सुद्धा देणार आहे.या २० बँकांपैकी आयडीबीआय बँँकेची स्थिती सर्वात नाजूक आहे. या बँकेला निधी पूर्ततेसाठी १०,६१० कोटी रुपये तर बँक आॅफ इंडियाला ९२३२ कोटी रुपये अर्थसाहाय्य मिळणार आहे. गेल्या आॅक्टोबर महिन्यात २० सरकारी बँकांना २.११ लाख कोटी अर्थसाहाय्य देण्याची घोषणा सरकारने केली होती. त्यापैकी १.३५ लाख कोटी रिकॅपिटलायझेशन बाँडमार्फत येणार आहेत व उरलेले अर्थसंकल्पीय अनुदान असेल. त्याच योजनेचा भाग म्हणून ही भांडवली मदत २०१८-१९ या आर्थिक वर्षात होणार आहे.
४) महाराष्ट्रातील ११ मान्यवरांना पद्म सन्मान
भारत सरकारकडून गुरुवारी पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यात संगीतकार इलैयाराजा, प्रख्यात शास्त्रीय गायक उस्ताद गुलाम मुस्तफा खान आणि केरळचे तत्त्वचिंतक परमेश्वरन परमेश्वरन यांना २०१८ सालचा पद्मविभूषण पुरस्कार घोषित झाला. ९ जणांना पद्मभूषण व ७३ मान्यवरांचा पद्मश्रीने सन्मान हाेईल. पद्मश्री मिळवणाऱ्यांत महाराष्ट्रातून ज्येष्ठ साहित्यिक डॉ. गंगाधर पानतावणे, प्रख्यात शास्त्रज्ञ अरविंद गुप्ता, उद्योजक रामेश्वरलाल काबरा, अभिनेते मनोज जोशी, दिग्दर्शक शिशिर पुरुषोत्तम मिश्रा आदींचा समावेश आहे.
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. गंगाधर पानतावणे : दलित चळवळीतील अस्मितादर्श या त्रैमासिकाचे पाच दशकांहून अधिक काळ संपादक. दलित वैचारिक वाङ्मय, अर्थ व अन्वयार्थ हे समीक्षात्मक ग्रंथ, लेणी, स्मृतिशेष ही व्यक्तिचित्रे, दुसऱ्या पिढीचे मनोगत, विद्रोहाचे पाणी पेटते आहे, वादळाचे वंशज आदी साहित्यसंपदा त्यांच्या नावावर आहे. २००९ मध्ये अमेरिकेच्या सॅन होजेतील पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.
डॉ. अभय व राणी बंग : ३० हून जास्त वर्षे गडचिरोलीतील ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा पुरवली. बालमृत्यू नियंत्रणावरील त्यांच्या संशोधनाची दखल जागतिक स्तरावर. ‘आशा’ कार्यक्रम राबवला.
अरविंद गुप्ता : टाकाऊतून खेळणी तयार करून वैज्ञानिक प्रयोग देशातील मुलांपर्यंत पोहोचवले. चार दशकांत ३ हजारांवर शाळांत भेटी दिल्या. १८ भाषांतील ६,२०० लघुपट त्यांनी तयार केले.
संपत रामटेके : १९९१ पासून सिकलसेल आजारावर जनजागृती. वैद्यकीय क्षेत्राची पार्श्वभूमी नसताना त्यांनी आजारावर अभ्यास करून जागरूकता निर्माण केली.. नोव्हेंबर २०१७ मध्ये निधन.
मुरलीकांत पेटकर : १९६५ मधील भारत-पााक युद्धात मणक्यात गोळी लागली, एक हातही गमावला.जर्मनीत १९७२ च्या पॅरालिम्पिकमध्ये विश्वविक्रमासह भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले
MSPC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी Mission MPSC ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्रामवर फॉलो करा.