1. तोट्यातील ३५ महामंडळे बंद करण्याच्या हालचाली
* राज्य सरकारने विविध विभागांचा विकास व्हावा या उदात्त हेतूने राज्यात ५५ महामंडळांची स्थापना काँग्रेस आणि आघाडी सरकारच्या विविध काळात झाली. परंतु ही महामंडळे राज्य सरकारसाठी पांढरा हत्ती पोसण्यासारखे होत असल्याने २०१५ मध्ये सात महामंडळे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस यांनी आता तोट्यातील तब्बल ३५ महामंडळे बंद करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली अाहे. ही समिती महामंडळांचा आढावा घेऊन अहवाल सादर करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
* २०१५ मध्ये मुख्यमंत्र्यांनी मॅफ्को, मेल्ट्रॉन, कोकण विकास महामंडळ, विदर्भ विकास महामंडळ, मराठवाडा विकास महामंडळ, भूविकास महामंडळ, महाराष्ट्र विकास महामंडळ बंद करण्याचा निर्णय घेतला होता. ४ कोटींची उलाढाल असलेल्या भूविकास महामंडळाचा ५० कोटी रुपयांचा तोटा नोंदवण्यात आला होता. या महामंडळांची मालमत्ता विकून कर्ज फेडले जाईल.
* २००५ पासूनच तोट्यातील महामंडळे बंद करण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. तत्कालीन अर्थमंत्री जयंत पाटील यांनीही महामंडळे बंद करण्याचे सूतोवाच विधिमंडळात एका प्रश्नाला उत्तर देताना केले होते. मात्र त्यावर अंमल झाला नाही. त्यानंतर २००७ मध्ये उपासनी समितीनेही ११ महामंडळे बंद करण्याचा अहवाल दिला होता.
घोटाळ्यांचे महामंडळ
> १. अण्णाभाऊ साठे महामंडळ: ४०० कोटींच्या घोटाळ्यात राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम तुरुंगात आहेत.
> २. महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ : ३४८ कोटींच्या घोटाळ्यात बबनराव घोलपांना झाली होती अटक.
> ३. संत रोहिदास चर्मोद्योग महामंडळ : ४३९ कोटींचा घोटाळा झाला.
> ४. वसंतराव नाईक भटक्या विमुक्त विकास महामंडळ : निधीचा अपहार, रक्कम कित्येक कोटींमध्ये.
> ५. आदिवासी विकास महामंडळ : वस्तू जास्त दराने खरेदी घोटाळा, रक्कम अनेक कोटी रुपयांत.
2. लालू प्रसाद यादव यांना तुरुंगात दर आठवड्याला फक्त तीन जणांना भेटता येणार
चारा घोटाळ्यात दोषी आढळलेले बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांना तुरुंगात दर आठवड्याला फक्त तीन जणांना भेटता येणार आहे. सोमवारी बिहारहून आलेल्या 5 RJD नेत्यांनी लालुंना भेटल्यानंतर ही माहिती दिली. तुरुंग अधीक्षकांनीही याला दुजोरा दिला आहे. लालू रांचीच्या होटवार तुरुंगात कैद आहेत. त्यांना चारा घोटाळ्यातील एका प्रकरणात दोषी ठरवण्यात आले आहे. शिक्षेची सुनावणी 3 जानेवारीला होईल.
3. दिनाकरन समर्थक सहा सदस्यांची हकालपट्टी
अण्णाद्रमुकमधून काढून टाकलेले टी.टी. व्ही. दिनाकरन यांना जयललितांच्या आर.के. नगर मतदारसंघातील पोटनिवडणुकीत घवघवीत यश मिळाले असून ४० हजार मतांनी ते निवडून आले. जे. जयललितांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती. त्यांना समर्थन देणाऱ्या ६ पक्ष सदस्यांना काढून टाकण्याचा निर्णय अण्णाद्रमुकने घेतला आहे. अण्णाद्रमुकचे समन्वयक आे. पन्नीरसेल्वम आणि के. पलानीस्वामी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. दिनाकरन यांना पी. वेत्रिवेल, थांगतामीलसेल्वन (चेन्नई जिल्हा सचिव) यांनी समर्थन दिले होते. पक्षातून या दोघांनाही काढून टाकण्याचा निर्णय वरिष्ठ नेतृत्वाने घेतला आहे.
4. गुजरात – रुपाणींनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ
गुजरातमध्ये भाजप सलग सहाव्यांदा सरकार स्थापन करत आहे. विजय रुपाणी यांनी सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. गुजरातचे ते 17 वे मुख्यमंत्री ठरले आहेत. या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी ही उपस्थित आहेत. तसेच भाजपशासीत 18 राज्यांचे मुख्यमंत्रीही उपस्थित आहेत. रुपाणी यांनी त्यांच्याच पक्षातील मुहूर्ताच्या परंपरेलाही यावेळी छेद दिला. यावेळी दुपारी 12.39 ऐवजी सकाळी 11.20 वाजता शपथविधी सुरू झाला.
5. कुलभूषण जाधव यांची आई, पत्नीशी 21 महिन्यांनी भेट
हेरगिरीच्या आरोपात पाकिस्तानात फाशीची शिक्षा सुनावलेल्या भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना पत्नी आणि आईला भेटण्याची परवानगी दिली, मात्र मध्ये काचेची जाड भिंत उभी केली. २१ महिन्यांनी आपल्या पुत्र व पतीला पाहणाऱ्या या सासू-सुनेला पाकने साधा मायेचा हात फिरवू दिला नाही की, गळाभेटही घेऊ दिली नाही. बोलणेही झाले ते इंटरकॉमवरूनच. तेही फक्त इंग्रजीतच. पाकच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या इमारतीत ही भेट सुमारे ४५ मिनिटे चालली. या काळात इमारत पूर्णपणे बंद करण्यात आली होती.
6. जगातील सर्वात मोठ्या विमानाची चीनमध्ये झाली यशस्वी चाचणी
चीनने रविवारी जगातील सर्वात मोठ्या विमानाची यशस्वी चाचणी घेतली. हवा आणि पाण्यातूनही या विमानाचा वापर करणे शक्य आहे. झुहाई शहरातील हवाई तळावरून विमानाने उड्डाण केले. दुहेरी वापर करता येण्याजोगे हे जगातील सर्वात मोठे विमान असल्याचा दावा चीनच्या सरकारी विमान निर्मिती कंपनीने केला आहे. एजी ६०० -‘कुनलाँग’ असे या विमानाचे नाव. त्याचा आणीबाणीच्या परिस्थितीत मदतकार्य व लष्करी मोहिमांसाठी वापर केला जाईल. १७ डिसेंबर रोजीदेखील चीनने जेट सी ही प्रवासी विमान सेवा सुरू केली होती.
– ३९.६ मीटर विमानाची लांबी
– ३८.८ मीटरचे पंखे