देशातील पहिलं ‘पॉड’ हॉटेल मुंबई सेंट्रल स्थानकावर !
- मुंबई लोकलच्या पश्चिम मार्गावरील मुंबई सेंट्रल स्थानकावर देशातील पहिल्या ‘पॉड’ हॉटेलची निर्मीती केली जाणार आहे. रेल्वे स्थानकावरील हे पहिले ‘पॉड’ हॉटेल मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर बनविण्यात येणार आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी ट्विटरद्वारे याबाबत माहिती दिली आहे.
- लांब पल्ल्यांच्या गाड्यांतून प्रवास करून आलेल्या किंवा उपनगरीय रेल्वे प्रवास करण्याऱ्या प्रवाशांना तात्पुरत्या निवासासाठी ‘पॉड’ हॉटेलची निर्मिती करण्यात येणार आहे. अत्याधुनिक, आरामदायी, आलिशान अशा लहान आकाराच्या पॉड खोल्यांची उभारणी करण्यात येणार आहे.
- यामध्ये वाय-फाय, यूएसबी पोर्ट, टीव्ही, वातानुकूलित रूम, विश्रांतीसाठी आरामदायी व्यवस्था विद्युत दिवे (याचा प्रकाश कमी-जास्त करण्याची व्यवस्था) असतील. हवेशीर जागा, सरकते दरवाजे, स्मोक डिटेक्टर अशा विशेष सुविधांचा लाभ प्रवाशांना घेता येईल.
राष्ट्रीय युद्ध स्मारकाचे लोकार्पण
- देशासाठी शहीद झालेल्या जवानांप्रती कृतज्ञता दर्शवण्यासाठी नवी दिल्लीत उभारण्यात आलेल्या राष्ट्रीय युद्ध स्मारकाचे उद्धाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले.
- 2009 मध्ये 1 लाख 86 हजार बुलेटप्रूफ जॅकेटची मागणी केली होती. मात्र 2009 ते 2014 पर्यंत एकही बुलेटप्रूफ जॅकेट खरेदी करण्यात आले नाही. मात्र, गेल्या चार वर्षात या आमच्या सरकारने सैनिकांसाठी 2 लाख 30 हजार पेक्षा जास्त बुलेट प्रूफ जॅकेट्स खरेदी केली, असे नरेंद्र मोदी म्हणाले.
भारताचा पाकवर एअर स्ट्राइक
- पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर मोठी लष्करी कारवाई करत भारताने पाकिस्तानमधील बालाकोट भागात थेट हल्ला केला असून या हवाई हल्ल्याद्वारे तेथील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले आहेत.
- भारतीय वायूसेनेच्या मिराज २००० या लढाऊ विमानांनी पहाटे साडेतीनच्या सुमारास पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळावर १००० किलोग्रॅम वजनाचा बॉम्ब फेकल्याचे वृत्त आहे.
- तब्बल २१ मिनिटे वायू दलाचे विमान पाकमध्ये होते. एका विमानात ४८ बॉम्ब होते, असे सांगण्यात येते.
नाशिक पोलिस आयुक्तपदी विश्वास नांगरे-पाटील
- नाशिक शहराचे पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्यासह नाशिक ग्रामीण पोलिस दलाचे अधीक्षक संजय दराडे आणि अँटिकरप्शन ब्युरोचे अधीक्षक पंजाबराव उगले यांची बदली करण्यात आली. दराडे यांची बदली पदोन्नतीनुसार झाली. सिंगल यांच्या जागी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांची नियुक्ती करण्यात आली.
अभिजित गुप्ताला विजेतेपद
- ग्रँडमास्टर अभिजित गुप्ता याने नवव्या आणि अखेरच्या फेरीत इटलीच्या लुईगी बास्सो याच्याविरुद्धचा डाव सहजपणे बरोबरीत सोडवत कान आंतरराष्ट्रीय खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
- अभिजितने ७.५ गुण पटकावून बेलारूसचा निकिता मायोरोव्ह, पोलंडचा नासूता ग्रेगोर्झ आणि युक्रेनचा युरी सोलोडोनिचेको या अव्वल प्रतिस्पध्र्याना मागे टाकून विजेतेपदाला गवसणी घातली. अभिजितने पहिले चार डाव जिंकून या स्पर्धेत धडाक्यात सुरुवात केली होती. त्यानंतर तीन बरोबरी आणि दोन विजय मिळवत अभिजितने विजेतेपदावर नाव कोरले. या विजेतेपदामुळे रेटिंग गुणांची कमाई करत अभिजितने २६०० रेटिंग गुण असलेल्या खेळाडूंच्या पंक्तीत स्थान मिळवले.
- या वर्षी अभिजितने दिल्ली आंतरराष्ट्रीय स्पर्धेत जेतेपद पटकावले होते.
लीग चषक फुटबॉल स्पर्धा : मँचेस्टर सिटीला लीग चषकाचे जेतेपद
- मँचेस्टर सिटीने चेल्सीचा पेनल्टी-शूटआऊटमध्ये ४-३ असा पराभव करत लीग चषक फुटबॉल स्पर्धेचे जेतेपद आपल्याकडेच कायम राखले. मात्र या सामन्याला चेल्सीचे प्रशिक्षक मॉरिझियो सारी आणि गोलरक्षक केपा अरिझाबालागा यांच्यातील वादाचे गालबोट लागले.
- दोन आठवडय़ांपूर्वी चेल्सीला इंग्लिश प्रीमिअर लीगमध्ये मँचेस्टर सिटीकडूनच ०-६ अशा दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते. १९९१ नंतरचा चेल्सीचा हा सर्वात मानहानीकारक पराभव ठरला होता.