देश-विदेश
इरोम शर्मिला १५ वर्षांपासूनचे उपोषण सोडणार
# मणिपूरमधील सशस्त्र दल विशेषाधिकार कायदा (अफ्स्पा) हा कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी गेली तब्बल १५ वर्षे उपोषण करणाऱ्या मानवी हक्क कार्यकर्त्यां इरोम शर्मिला चानू यांनी मंगळवारी आपण उपोषण सोडणार असल्याचे जाहीर केले. सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्यामुळे मी उपोषण सोडत असल्याची माहिती त्यांनी प्रसारमाध्यमांना दिली. तसेच अफ्स्पाचा प्रश्न सोडविण्यासाठी आगामी मणिपूर विधानसभेची निवडणूक लढणार असल्याचेही शर्मिला इरोम यांनी सांगितले. पुढील वर्षी मणिपूरमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, इरोम शर्मिला येत्या ९ ऑगस्टला उपोषण सोडतील. त्या गेल्या १५ वर्षांपासून मणिपूरमधील अफ्स्पा कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी प्राणांतिक उपोषण करत आहेत. मात्र, या काळात त्यांना इम्फाळ येथील सरकारी रूग्णालयात जबरदस्तीने दाखल करून नाकातून नळीवाटे अन्न देण्यात येत होते. त्या आयर्न लेडी म्हणून प्रसिद्ध आहेत.
IRCTC वरील तिकीट बुकिंगवर १ रुपयात १० लाखांचा विमा
# आयआरसीटीसीने सोमवारी प्रवासी विमा आणि अनारक्षित तिकीटासह अनेक योजनांची घोषणा केली. आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावरून तिकीटाचे बुकिंग करताना केवळ एक रुपयाच्या प्रिमियममध्ये रेल्वे प्रवाशाचा १० लाखांचा विमा उतरविण्यात येईल. ही सुविधा ३१ ऑगस्टपासून सुरू करण्यात येईल. याविषयी अधिक माहिती देताना आयआरसीटीसीचे संचालक आणि महाव्यवस्थापक अरुण कुमार मनोचा म्हणाले की, लवकरच आम्ही प्रवासी विमा योजना सुरू करणार आहोत. यासाठीचा पत्रव्यवहार करण्यात आला असून, तीन कंपन्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विम्यासाठी प्रतियात्रा २ रुपयांपेक्षादेखील कमी खर्च येईल. ज्यात प्रवाशाचा १० लाखांचा विमा उतरविण्यात येईल. आयआरसीटीसीने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सहयोगाने एसबीआयच्या मोबाइल बडीच्या माध्यमातून डिजीटल पेमेंटसाठी करार केला आहे. रेल्वेचे तिकीट प्राप्त करण्यासाठीच्या अन्य प्रकारांवरदेखील काम करत असल्याची माहिती मनोचा यांनी दिली.
शतकोत्तरी ‘शकुंतला’च्या ब्रॉडगेजसाठी १५०० कोटी मंजूर
# शंभरी पार केलेल्या आणि आजही ‘क्लिक निक्सन’ या ब्रिटीश कंपनीच्या ताब्यात असलेल्या यवतमाळ-मूर्तीजापूर या ‘शकुंतला’ नावाने परिचित नॅरोगेज रेल्वेचे अखेर ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्यासाठी केंद्र सरकारने १५०० कोटी रुपये मंजूर केल्याची माहिती सेना नेत्या खासदार भावना गवळी यांनी दिली. उल्लेखनीय म्हणजे, संपूर्ण देशात यवतमाळ-मूर्तीजापूर-अचलपूर व पुलगाव-आर्वी या फक्त विदर्भातच असलेल्या तीनही रेल्वेमार्गांपकी आर्वी-पुलगाव रेल्वे केव्हाचीच बंद होऊन भंगारातही गेली आहे. उर्वरित २ नॅरोगेज रेल्वेमार्गाचे ब्रॉडग्रेजमध्ये रूपांतर करण्यास भगिरथ प्रयत्नानंतर केंद्र सरकारने मान्यता दिल्याची आनंददायी वार्ता यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघाच्या सेना खासदार भावना गवळी यांनी दिली. गेल्या १९१६ मध्ये क्लिक निक्सन या ब्रिटिश कंपनीने या तीन नॅरोगेज रेल्वे सुरू केल्या होत्या. आश्चर्य म्हणजे, देश ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त झाल्यावरही या तीन रेल्वे गाडय़ा आजही क्लिक निक्सन कंपनीच्याच ताब्यात आहेत. त्या ‘शकुंतला’ नावाने ओळखल्या जातात.
अर्थव्यवस्था
फ्लिपकार्टच्या ‘मिंत्रा’कडून जबाँगची खरेदी
# फ्लिपकार्टचा मालकी हक्क असलेल्या मिंत्रा कंपनीने ऑनलाइन फॅशन संकेतस्थळ जबाँगचे अधिग्रहण केले असून यासाठी किती रक्कम खर्ची घातली जाईल याचा अद्याप खुलासा करण्यात आलेला नाही. २०१४ मध्ये फ्लिपकार्टने जवळजवळ २००० कोटी रुपयांत मिंत्राची खरेदी केली होती. जबाँगच्या अधिग्रहणाने भारतातील फॅशन आणि लाइफस्टाइल क्षेत्रात फ्लिपकार्ट ग्रुप निर्विवादपणे अग्रणी राहाणार आहे. भारतातील फॅशन मल्टिब्रॅण्डपैकी जबाँग एक आहे. यात १५०० हून अधिक आंतरराष्ट्रीय ब्रॅण्ड, स्पोर्ट्स लेबल, भारतीय एथनिक आणि डिझायनर लेबलचा समावेश असून, दीड लाखांहून अधिक स्टाइल्स असल्याचे मिंत्राने आपल्या निवेदनात म्हटले आहे. जबाँगकडून अद्याप याबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. मिंत्रा आणि जबाँगचे मिळून जवळजवळ दीड कोटी युजर्स आहेत.
बँक ऑफ बडोदा, एचडीएफसी बँकेला दंड
# ‘तुमचा ग्राहक जाणून घ्या’ अंतर्गत कायदेशीर बाबींची पूर्तता न केले प्रकरणात रिझव्र्ह बँकेने देशातील आघाडीच्या एचडीएफसी बँकेला २ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. तर गेल्या वर्षांतील ६,१०० कोटी रुपयांच्या गैर व्यवहार प्रकरणात सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ बडोदाला ५ कोटी रुपयांचा दंड जाहीर झाला आहे. प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या ऑक्टोबर २०१५ च्या वृत्ताच्या अहवाल आधारावर एचएडएफसी बँकेवर यंदा कारवाई करण्यात आली आहे. यासाठी बँकेचे ‘तुमचा ग्राहक जाणून घ्या’ (केवायसी) योग्यरितीने होत आहे की नाही हे तपासल्यानंतर मध्यवर्ती बँकेने ही कारवाई केली. याबाबत बँकेला रिझव्र्ह बँकेने नोटिस पाठविली असून त्यावर उत्तर देण्यास बजाविण्यात आले आहे. बँकेने अंतर्गत व्यवहार अधिक सुयोग्य करण्यासाठी पावले उचलली असून असे प्रकार पुन्हा घडणार नाही, याबाबत काळजी घेतली जाईल, असे स्पष्ट केले आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ बडोदातील ६,१०० कोटी रुपयांचा गैरव्यवहार उघड झाल्यानंतर बँकेच्या ताळेबंदाचा हिशेब केल्यानंतर बँकेवरील ५ कोटी रुपयांच्या कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे. बँक व्यवस्थापनादेखील याबाबत सावधगिरीचे आश्वासन रिझव्र्ह बँकेला दिले आहे.
क्रीडा
गोळाफेकपटू इंद्रजित सिंह उत्तेजक चाचणीत दोषी
# भारताच्या रिओ ऑलिम्पिक मोहिमेला जबरदस्त धक्का देणारा आणखी एक प्रकार समोर आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार कुस्तीपटू नरसिंग यादव याच्यापाठोपाठ भारताचा गोळाफेकपटू इंद्रजित सिंह हादेखील उत्तेजक चाचणीत दोषी आढळला आहे. राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संस्थेकडून (नाडा) करण्यात आलेल्या उत्तेजक चाचणीदरम्यान हरयाणाच्या २८ वर्षीय इंद्रजित सिंह याच्या नमुन्यांमध्ये प्रतिबंधित घटक आढळून आले. ‘नाडा’कडून इंद्रजित सिंह आणि अॅथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाला याबाबत कळविण्यात आले आहे. आता इंद्रजितकडे ‘एनएडीए’कडे फेरचाचणीची मागणी करण्यासाठी एका आठवड्याचा अवधी आहे. ‘नाडा’कडून २४ जुलै रोजी इंद्रजित सिंहचे नमुने तपासणीसाठी गोळा करण्यात आले होते. इंद्रजित सिंह याने गेल्यावर्षीच्या आशियाई स्पर्धा, एशियन ग्रँड पिक्स, वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्समध्ये गोळाफेकीसाठी सुवर्णपदक मिळवले होते. रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेला तो पहिला भारतीय अॅथलिट आहे.