Current Affairs : 26 September 2020
‘संडे टाइम्स’चे माजी संपादक हॅरॉल्ड इव्हान्स यांचे निधन

संडे टाइम्सचे माजी संपादक, प्रसिद्ध लेखक, स्तंभलेखक आणि शोधपत्रकार सर हॅरॉल्ड इव्हान्स यांचे न्यूयॉर्क येथे निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते.
ब्रिटिश अमेरिकी पत्रकार असलेल्या इव्हान्स यांनी थॅलिडोमाइड या औषधाच्या दुष्परिणामांवर वृत्तमालिका चालविली होती.
नियतकालिकाचे संस्थापक, पुस्तक प्रकाशक, लेखक व अगदी शेवटी रॉयटर्सचे मानद संपादक अशा बहुविध भूमिकांतून त्यांनी काम केले होते. ते १४ वर्षे संडे टाईम्सचे संपादक होते.
२००३ मध्ये त्यांना ‘नाइटहूड’ म्हणजे ‘सर’ हा किताब पत्रकारितेतील सेवेसाठी देण्यात आला होता. काही काळ ते काँड नॅस्ट ट्रॅव्हलर नियतकालिकाचे संपादक होते. नंतर रँडम हाऊस या प्रकाशन कंपनीचे अध्यक्ष बनले.
प्रेस गॅझेट व ब्रिटिश जर्नालिझम रिव्ह्य़ू यांच्या जनमत चाचणीत ते सर्वात महान पत्रकार ठरले होते.
यूएफा सुपर चषक फुटबॉल : बायर्न म्युनिकला जेतेपद

जावी मार्टिनेझच्या निर्णायक गोलमुळे बायर्न म्युनिकने सेव्हियाचा २-१ असा पराभव करत यूएफा सुपर चषक फुटबॉल स्पर्धेचे जेतेपद पटकावले.
मोजक्या प्रेक्षकांसह रंगलेल्या या लढतीत बायर्न म्युनिकने अतिरिक्त वेळेत जेतेपद संपादन केले.
तब्बल सात वर्षांनंतर बायर्नने सुपर चषकाचे जेतेपद पटकावले.
इंडो-अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्सकडून मुंबईतील पालिका आयुक्त चहल यांचा गौरव
मुंबईतील करोना विषाणू संसर्ग नियंत्रणात आणल्याबद्दल महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांचा इंडो-अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्स यांच्याकडून ‘आयएसीसी कोविड क्रुसेडर्स २०२०’ पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत दृक्श्राव्य माध्यमातून झालेल्या या पुरस्कार सोहळ्यात चहल यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
इंडो-अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्स आणि मुंबईतील अमेरिकन दुतावास यांच्याद्वारे संयुक्तपणे हा पुरस्कार देण्यात आला.
भारतात तसेच अमेरिकेत कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी प्रयत्न केलेल्या विविध व्यक्ती, संस्था यांना गौरवण्यासाठी या पुरस्कारांचे आयोजन करण्यात आले.
भारतातील प्रशासकीय अधिकारी संवर्गातून इकबाल सिंह चहल हे विजेते ठरले आहेत. या संवर्गासाठी ४१ जणांची नावे नामांकन म्हणून निश्चित करण्यात आली होती.
ख्यातनाम गायक एस.पी. बालसुब्रमण्यम याचं निधन

प्रख्यात गायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांचं वयाच्या ७४ वर्षी निधन झालं आहे.
एस. पी. बालसुब्रमण्यम यांना आवाजाचा जादूगार म्हटलं जायचं. तेलुगु, तामिळ, हिंदी आणि इतर भाषांतील गाणी एस.पी. बालसुब्रमण्यम यांनी गायिली आहेत. त्यांनी जवळपास ४० हजार गाण्यांना आपला आवाज दिला आहे.
केवळ संख्या म्हणून नव्हे, तर एका दिवसांत सर्वाधिक गाणी गाण्याचा विक्रमही त्यांनी केला होता. त्यांनी सकाळी 9 ते रात्री 9 या 12 तासांत तब्बल 21 गाणी रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केला.
तर अशा प्रकारे हिंदीत त्यांनी 16 गाणी रेकॉर्ड केली होती. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना पद्मश्री आणि पद्मभूषण या किताबांनी गौरवण्यात आलं आहे.