जलशक्ती मंत्रालयाची 100 दिवसांची ‘सुजलाम’ मोहिम
पार्श्वभूमी : “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ सोहळ्याचा एक भाग म्हणून, केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने 25 ऑगस्ट 2021 रोजी 100 दिवस चालणाऱ्या ‘सुजलाम’ मोहिमेला प्रारंभ केला. देशभरातील गावांना अल्पावधीत वेगाने ‘ODF प्लस’ दर्जा प्राप्त करण्याच्या दिशेने वाटचाल सुरु करून देण्याचा या मोहिमेचा प्रयत्न आहे.
ठळक मुद्दे :
– गाव पातळीवर सांडपाणी व्यवस्थापन उपक्रम राबवून अधिकाधिक गावे “हागणदारी मुक्त (ODF) प्लस” करण्यासाठी ही मोहीम राबवली जाणार आहे.
– मोहिमेच्या अंतर्गत गाव पातळीवर सांडपाणी व्यवस्थापन करून विशेषतः एक लक्ष शोषखड्ड्यांची निर्मिती आणि सांडपाण्याचा पुनर्वापर करण्याच्या दृष्टीने पुनर्वापरास-योग्य सांडपाण्याचे व्यवस्थापन करून अधिकाधिक ‘ODF प्लस’ गावे तयार करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
या मोहिमेच्या अंतर्गत गावांमध्ये पुनर्वापरासाठी योग्य सांडपाण्याच्या व्यवस्थापनासाठी शोषखड्डे यांसारख्या आवश्यक पायाभूत सुविधा तयार करण्यासह पाणवठ्यांच्या शाश्वत व्यवस्थापनासाठी देखील साहाय्य केले जाईल.
– सांडपाण्याची विल्हेवाट लावणे आणि गावांमध्ये किंवा गावांच्या बाहेरील भागात पाण्याची साठवणूक ही एक प्रमुख समस्या आहे. या मोहिमेमुळे सांडपाणी व्यवस्थापनाला मदत होईल आणि पर्यायाने पाणवठे पुनरुज्जीवित होण्यास मदत होईल.
– याशिवाय, या मोहिमेमुळे सामुदायिक सहभागातून स्वच्छ भारत अभियान ग्रामीणच्या दुसऱ्या टप्प्यातील उपक्रमांची गती वाढेल आणि त्यातून ODF प्लस उपक्रमांविषयी जागरूकता वाढेल.
२०३२ च्या ऑलिम्पिकपर्यंत उत्तर प्रदेश सरकार कुस्तीचे पुरस्कर्ते
उत्तर प्रदेश सरकारकडून २०३२च्या ऑलिम्पिकपर्यंत कुस्ती क्रीडा प्रकाराला पुरस्कृत करण्याचा निर्णय घेतला आहे. पायाभूत सुविधा आणि कुस्तीपटूंना पाठबळ देण्यासाठी १७० कोटी रुपये गुंतवणूक अपेक्षित आहे, अशी माहिती भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांनी गुरुवारी दिली.
ओदिशा सरकारने हॉकीला पुरस्कृत केले आहे. यातून प्रेरणा घेत संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी उत्तर प्रदेश सरकारकडे साहाय्याचा प्रस्ताव ठेवला होता. तो मुख्यमंत्री योग आदित्यनाथ यांनी त्वरित स्वीकारला, असे ब्रिजभूषण यांनी सांगितले.
२०२४च्या ऑलिम्पिकपर्यंत प्रत्येक वर्षाला १० कोटी रुपये, २०२८च्या ऑलिम्पिकपर्यंत प्रत्येक वर्षाला १५ कोटी रुपये आणि २०३२च्या ऑलिम्पिकपर्यंत प्रत्येक वर्षाला २० कोटी रुपये निधीविषयी या प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. पुरस्कर्त्यांची रक्कम फक्त नामांकित कुस्तीपटूंपुरती मर्यादित नसेल, तर कनिष्ठ गटातील कुस्तीपटूंनाही त्याचा फायदा होईल,’’ असे ब्रिजभूषण यांनी म्हटले आहे.
याआधी २०१८मध्ये टाटा मोटर्स हे भारतीय कुस्ती संघ्ज्ञाचे मुख्य पुरस्कर्ते होते.
EASE 4.0: सार्वजनिक क्षेत्र बँक सुधारणा कार्यक्रमाची चौथी आवृत्ती
पार्श्वभूमी : तंत्रज्ञान आधारित, सुलभ आणि सहकार्यात्मक बँक व्यवसायासाठी, केंद्रीय वित्त आणि कंपनी कार्ये मंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते 25 ऑगस्ट 2021 रोजी “सार्वजनिक क्षेत्र बँक सुधारणा कार्यक्रम 2021-22” यासाठी चौथी आवृत्ती म्हणजेच “EASE 4.0” (एनहान्स्ड अॅक्सेस अँड सर्व्हिस एक्सलेन्स रिफॉर्म अजेंडा) कार्यक्रमाचा प्रारंभ केला.
उद्देश : EASE 4.0 सुधारणा कार्यक्रम सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या तंत्रज्ञान-सक्षम बँक व्यवसाय, सोपे आणि सहकार्यात्मक बँक व्यवसायसाठी वचनबद्ध आहे. EASE 4.0 याचा उद्देश ग्राहक-केंद्री डिजिटल परिवर्तनाचा कार्यक्रम पुढे नेणे आणि सार्वजनिक बँकांच्या कार्यपद्धतीमध्ये डिजिटल वापर आणि डेटा खोलवर रुजवणे हा आहे.
EASE 4.0 अंतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील बँका पुढील सेवा-सुविधा देवू करीत आहेत :
– अखंडीत बँक सेवा देण्यासाठी, सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकामधली तंत्रज्ञान प्रणाली आणि अंतर्गत प्रक्रिया दृढ करत नव्या आणि अद्ययावत लवचिक तंत्रज्ञानासह 24×7 बँक व्यवसाय सेवा.
– एसएमएस, मिस्ड कॉल, कॉल सेंटर, इंटरनेट आणि मोबाईल बँक व्यवसाय यासारख्या डिजिटल माध्यमातून कृषी कर्ज, तिसऱ्या पक्ष समवेत भागीदारी,पर्यायी डाटा देवाण-घेवाण करण्यासाठी कृषी तंत्रज्ञान, सर्व प्रक्रिया डिजिटल आणि कृषी कर्ज मंजुरी यासारख्या उपाययोजनेतून डिजिटल आणि डाटा आधारित कृषी वित्त पुरवठा.
– सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांनी सुरु केलेल्या डोअरस्टेप बँक व्यवसाय सेवा व्यापक करण्यासाठी अशा सेवाचा वापर आणि जागृतीसाठी प्रोत्साहन आणि सेवा प्रदान करण्यासाठी कालबद्ध कृती.
– एनएफसी, भारत क्यूआर आधारीत पेमेंट यांचा अंगीकार करत अर्ध नागरी आणि ग्रामीण क्षेत्रात डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन
किरकोळ आणि एमएसएमई ग्राहकांसाठी विश्लेषण आधारित पत आणि बिगर पत उत्पादने.
– मोबाईल आणि नंतर इंटरनेट बँक व्यवसाय अधिक खोलवर पोहोचावे यासाठी प्रादेशिक भाषात उपलब्धता
सार्वजनिक क्षेतार्तल्या बँकांमध्येसहयोग करत सहकार्यात्मक बँक व्यवसाय.