Current Affairs 27 October 2019
कर्नाटकने ‘विजय हजारे चषक २०१९-२०’ जिंकला
– अभिमन्यू मिथुनच्या शेवटच्या षटकातल्या हॅट्ट्रिकच्या बळावर यजमान कर्नाटकने विजय हजारे चषक स्पर्धा जिंकली. बेंगळूरू येथे ही स्पर्धा खेळवली गेली.
स्पर्धेविषयी
– विजय हजारे चषक या स्पर्धेला ‘रणजी एकदिवसीय करंडक’ म्हणून देखील ओळखले जाते. ही क्रिडास्पर्धा मर्यादित षटकांसह सन २००२-०३ पासून रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर खेळली जात आहे. या स्पर्धेचे नाव प्रसिद्ध भारतीय क्रिकेट विजय हजारे यांच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. यामध्ये २७ संघ खेळतात.
गांधीनगर हा गुजरातचा पहिला केरोसिनमुक्त जिल्हा
– गुजरातचा गांधीनगर जिल्हा हा राज्यातील पहिला केरोसीनमुक्त जिल्हा झाला आहे.
– गांधीनगर जिल्ह्यातील महिला लाभार्थ्यांना एक हजार एलपीजी कनेक्शनचे वाटप करण्यात आले. उज्ज्वला योजनेंतर्गत ग्रामीण महिलांना एलपीजी कनेक्शनचे वाटप करण्यात आले आहे.
– ओएनजीसीने ७५ हजाराहून अधिक लाभार्थींच्या समावेशाने ६.१३ कोटी रुपये खर्च करुन ही योजना पूर्ण केली आहे.
जीसी मुर्मू : गुजरात केडरचे अधिकारी जम्मू-काश्मीरचे नवे नायब राज्यपाल
– गिरीश चंद्र मुर्मू यांची जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राधा कृष्ण माथूर यांच्याकडे लडाखच्या नायब राज्यपालपदाची धुरा सोपवण्यात आली आहे.
– या सोबतच जम्मू-काश्मीर राज्याचे विद्यमान राज्यपाल सत्यपाल मलिक यांची गोव्याच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे, तर पी. एस. श्रीधरन यांना मिझोरामचं राज्यपालपद देण्यात आलं आहे.
– राज्यपाल हा राज्यांचा तर नायब राज्यपाल हा केंद्र शासित प्रदेशांचा सर्वोच्च प्रशासकीय अधिकारी असतो. राष्ट्रपती पाच वर्षांसाठी त्यांची नियुक्ती करतात.
गिरीश चंद्र मुर्मू कोण आहेत?
– गिरीश चंद्र मुर्मू भारतीय प्रशासकीय सेवेतील (IAS) १९८५ च्या बॅचचे गुजरात केडरचे अधिकारी आहेत.
– पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना गिरीश चंद्र मुर्मू राज्याचे मुख्य सचिव होते.
-५९ वर्षांचे मुर्मू केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयात व्यय सचिवपदीही होते. सोप्या शब्दात सांगायचं तर व्यय सचिव हा एकप्रकारे भारत सरकारच्या खजिन्याचा प्रभारी असतो.
– गुजरात सरकारच्या प्रशासकीय विभागाच्या वेबसाईटनुसार मुर्मू मूळचे ओडिशाच्या मयूरभंज जिल्ह्यातले आहेत. त्यांनी पॉलिटिकल सायन्समध्ये मास्टर्स आणि पब्लिक सर्व्हिसेसमध्ये एमबीएचं शिक्षण घेतलं आहे.
राधा कृष्ण माथूर कोण आहेत?
– राधा कृष्ण माथूर भारतीय प्रशासकीय सेवेतील (IAS) १९७७ च्या बॅचचे मणिपूर-त्रिपुरा केडरचे सेवानिवृत्त अधिकारी आहेत.
– राधा कृष्ण माथूर केंद्र सरकारच्या मुख्य माहिती अधिकारी पदावरून नोव्हेंबर २०१८ ला निवृत्त झाले होते.
– मे२०१३ ते मे २०१५ या काळात ते संरक्षण सचिव होते.
– त्यांनी २००३ साली त्रिपुराचे मुख्य सचिव म्हणूनही काम सांभाळलं आहे.
– त्यांनी आयआयटी कानपूरमधून मेकॅनिकल इंजीनिअरिंगमध्ये पदवी घेतली. त्यानंतर आयआयटी दिल्लीमधून त्यांनी इंजीनिअरिंगरमध्येच मास्टर्स केलं.
चालू घडामोडींच्या नियमित अपडेटसाठी तुम्ही Mission MPSC ला फेसबुक, टेलिग्राम आणि इंस्टाग्रामवर फॉलो करू शकता.