भारताचा अंतराळात ‘शक्ती’मार्ग!
- हेरगिरी करणाऱ्या उपग्रहाचा नायनाट करणाऱ्या ‘ए-सॅट’ या उपग्रहनाशक क्षेपणास्त्राची भारताने बुधवारी यशस्वी चाचणी केली. ‘मिशन शक्ती’ या खास चाचणी मोहिमेद्वारे अवघ्या तीन मिनिटांत संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) यांच्या संशोधकांनी हे यश मिळवले, ही शुभवार्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खास संदेशाद्वारे देशवासीयांना दिली.
- असा पराक्रम करणारा भारत हा जगातील चौथा देश ठरला आहे. अमेरिका, रशिया आणि चीननंतर हे तंत्रज्ञान वापरणार भारत हा जगातील चौथा देश ठरला आहे. ‘मिशन शक्ती’ असं या मोहिमेला नाव देण्यात आले आहे.
- अंतराळातील शत्रुराष्ट्राचा उपग्रह पाडण्याचे तंत्रज्ञान रशियाने मिळवल्याची कुणकुण लागल्यानंतर अमेरिकेने मे १९५८ ते ऑक्टोबर १९५९ या कालावधीत ‘ए-सॅट’ मोहीम राबवली.
- मात्र अनेक चाचण्या अयशस्वी ठरल्यानंतर १९८०च्या दशकात ही मोहीम अमेरिकेच्या हवाई दलाने रद्द केली. त्यानंतर काही काळाने पुन्हा अमेरिकेने ही मोहीम सुरू केली आणि २० फेब्रुवारी २००८ला अमेरिकेला ‘ए-सॅट’ची यशस्वी चाचणी घेता आली.
- ११ जानेवारी २००७ रोजी चीनने आपला एक हवामानविषयक उपग्रह ‘ए-सॅट’द्वारे पाडून या मोहिमेत आघाडी घेतली होती. चीनने पाडलेला उपग्रह हा पृथ्वीच्या ध्रुवीय कक्षेत ८६५ किलोमीटरवर होता, तर भारताने पाडलेला उपग्रह हा ३०० किलोमीटरवर होता. चीनने या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी २००५ आणि २००६ मध्येही केली होती. रशियाने मात्र आपल्या ‘ए-सॅट’ क्षेपणास्त्राची पहिली अधिकृत चाचणी १८ नोव्हेंबर २०१५ मध्ये केली. मे २०१६ मध्ये त्यांची दुसरी चाचणीही यशस्वी झाली.
- आता या श्रेणीत भारताने स्थान मिळवले आहे.
विश्वविक्रमी कामगिरीसह मनू भाकेर-सौरभ चौधरी जोडीला सुवर्णपदक
- नवी दिल्लीत पार पडलेल्या नेमबाजी विश्वचषकानंतर सुवर्णपदकाची कमाई केलेल्या मनू भाकेर-सौरभ चौधरी जोडीने पुन्हा एकदा धडाकेबाज कामगिरीची नोंद केली आहे.
- चीन तैपेईत सुरु असलेल्या १२ व्या आशियाई एअरगन चॅम्पियनशीप स्पर्धेत मनू-सौरभ जोडीने सुवर्णपदक पटकावलं आहे. १० मी. एअर पिस्तुल प्रकारात विश्वविक्रमी कामगिरी करत दोन्ही खेळाडूंनी भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
- पात्रता फेरीत भारतीय जोडीने ७८४ गुणांची कमाई करत, रशियाच्या जोडीचा विक्रम मोडीत काढला. काही दिवसांपूर्वी झालेल्या युरोपियन चॅम्पियनशीप स्पर्धेत रशियाच्या व्हिटॅलीना आणि आर्टेम जोडीने ४८४.८ गुण कमावले होते. आजच्या स्पर्धेत कोरियन जोडीला रौप्य तर चीन तैपेई जोडीला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या हाती येणार स्मार्टफोन
- अंगणवाडीमधील कामकाज १ मेपासून पेपरलेस होणार असून येथे आता रजिस्टरऐवजी मोबाइल अॅपच्या वापर केला जाणार आहे. यासाठी या कर्मचाऱ्यांना स्मार्ट फोनही दिले जाणार आहे.
- त्यामध्येच लसीकरण व गृहभेटीच्या दैनंदिन नोंदी व बालकांच्या दैनंदिन नोंदी घेतल्या जाणार आहेत. त्यामुळे रजिस्टरवरील दैनंदिन नोंदीचे काम संपुष्टात येणार आहे.
- एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयाने विकसित केलेल्या मोबाइल ॲपचा त्यासाठी वापर केला जाणार आहे.