Current Affairs 28 May 2020
तेजस लढाऊ विमान हवाई दलाच्या स्क्वाड्रन क्रमांक १८ मध्ये सामील
तमिळनाडूतील कोइम्बतूर शहराच्या सीमेवरील सुलुर येथील हवाई दल स्थानकावर बुधवारी झालेल्या एका कार्यक्रमात भारतीय हवाई दलाने ‘तेजस’ हे पहिले हलके लढाऊ विमान ‘फ्लाइंग बुलेट्स’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या १८ क्रमांकाच्या स्क्वाड्रनमध्ये सामील केले.
बंगळूरु येथील हिंदुस्तान एअरॉनॉटिकल लि. (एचएएल) ने तेजस एमके-१ हे विमान तयार केले आहे.
भदौरिया यांनी पहिल्या तेजस एमके-१ लढाऊ विमानाची प्रतीकात्मक चावी १८ स्क्वाड्रनचे कमांडिंग ऑफिसर ग्रुप कॅप्टन मनीष तोलानी यांना सोपवली. यापूर्वी भदौरिया यांनी या एक सीटर विमानाचे उड्डाण केले.
तेजस हे स्वदेशात निर्मित चौथ्या पिढीचे विना शेपटीचे डेल्टा विंग विमान आहे. यापूर्वी सुलुर येथीलच ४५ स्क्वाड्रनला सोपवण्यात आल्यानंतर, हे विमान मिळणारे क्र. १८ स्क्वाड्रन हे दुसरे ठरले आहे.
हे विमान फ्लाय-बाय-वायर फ्लाइट कंट्रोल सिस्टीम, इंटिग्रेटेड डिजिटल अॅव्हिऑनिक्स आणि मल्टी-मोड रडार यांनी सज्ज आहे. चौथ्या पिढीच्या ध्वनीतीत लढाऊ विमानांच्या गटातील हे सर्वात कमी वजनाचे आणि लहान विमान आहे.
१९६५ साली स्थापन झालेली १८ क्रमांकाची स्क्वाड्रन यापूर्वी मिग-२७ विमानांचे उड्डाण करीत असे. पाकिस्तानशी झालेल्या १९७१च्या युद्धात सक्रिय भाग घेऊन तिने ‘काश्मीर खोऱ्याचे संरक्षक’ असे बिरुद मिळवले होते. या वर्षी १ एप्रिलला सुलुर येथे तिचे पुनरुज्जीवन करण्यात आले होते.
स्टेट बँकेने घटवले ठेवींवरील व्याजदर
देशातील सर्वांत मोठी सरकारी बँक असणाऱ्या स्टेट बँकेने ठेवीदरांत ०.४० टक्के कपात केली आहे. व्याजदरकपातीनंतर स्टेट बँकेच्या एक वर्ष ते दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या ठेवींवर ५.१ टक्के, तीन वर्षे ते पाच वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या ठेवींसाठी ५.३ टक्के व्याज तसेच, पाच वर्षे ते १० वर्षे मुदतीच्या ठेवींवर ५.४ टक्के व्याज मिळेल. याआधी स्टेट बँकेने चालू महिन्यांतच मुदतठेवींवरील व्याजदरात ०.२० टक्के कपात केली होती. ही कपात तीन वर्षे मुदतीपर्यंतच्या ठेवींवर १२ मेपासून लागू करण्यात आली होती.
मुदतठेवींवरील व्याज सरसकट कमी करतानाच बँकेने ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष मुदतठेव आणली आहे. एसबीआय वुई केअर डिपॉझिट असे या सुविधेचे नाव आहे. ही योजना ३० सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. याअंतर्गत एसबीआयकडे पाच वर्षांसाठी किंवा त्यापेक्षा अधिक काळासाठी ठेव ठेवण्याऱ्या ज्येष्ठ नागरिक ठेवीदारांना ०.३० टक्के अतिरिक्त व्याज दिले जाणार आहे.
असा झाला ठेवीदरांत बदल (टक्के)
कालावधी सध्याचा दर नवा दर ज्येष्ठांचा नवा दर
७ ते ४५ दिवस ३.३ २.९ ३.४
४६ ते १७९ दिवस ४.३ ३.९ ४.४
१८० ते २१० दिवस ४.८ ४.४ ४.९
२११ दिवस ते १वर्षापेक्षा कमी ४.८ ४.४ ४.९
१ वर्ष ते २ वर्षांपेक्षा कमी ५.५ ५.१ ५.६
२ वर्षे ते ३ वर्षांपेक्षा कमी ५.५ ५.१ ५.६
३ वर्षे ते ५ वर्षांपेक्षा कमी ५.७ ५.३ ५.८
५ वर्षे ते १० वर्षे ५.७ ५.४ ६.२
चीनने एव्हरेस्ट मोजले; म्हणे, उंची ४ मी. कमी
चीनने दावा केला आहे की, जगातील सर्वात उंच शिखर असलेल्या माउंट एव्हरेस्टची उंची ८८४४.४३ मीटर आहे. नेपाळने मोजलेल्या ८८४८.१३ मीटर उंचीपेक्षा ही उंची ४ मीटर कमी आहे. बुधवारी उंची मोजण्यासाठी गेलेले चिनी पथक १ मे रोजी शिखरावर होते.
शांतीसेनेतील पाच शहिदांचा होणार सन्मान
संयुक्तराष्ट्रे: संयुक्तराष्ट्राच्या शांतीसेनेत काम करताना जीवाची बाजी लाऊन बलिदान देणाऱ्या पाच भारतीय जवानांचा मृत्यूपश्चात संयुक्तराष्ट्रांकडून सन्मान केला जाणार आहे. संयुक्तराष्ट्रांतर्फे एकूण 83 जणांना लष्करी, पोलीस व सिव्हीलियन पुरस्कार देऊन गौरव केला जाणार आहे. त्यात या पाच भारतीय शहिदांचाही मरणोत्तर सन्मान केला जाणार आहे.
दक्षिण सुदानमधील शांतीसेनेत काम करताना प्राणांचे बलिदान देणारे मेजर रवि इंदर सिंग संधू आणि सार्जंट लाल तारसेम, सार्जंट रमेशसिंग, जॉनसन बेक, आणि एडवर्ड पिंटो, अशी या पाच जणांची नावे आहेत. येत्या 29 मे रोजी होंणाऱ्या कार्यक्रमात त्यांना मरणोत्तर हा सन्मान दिला जाणार आहे.