Current Affairs 28 November 2019
दूरसंचार कंपन्यांना दरवाढीला मुभा
घोषित निर्णयाप्रमाणे तीन दिवसांनी होणाऱ्या दूरसंचार दरवाढीबाबत हस्तक्षेपास स्पष्टपणे नकार देत नियामक यंत्रणेने एकप्रकारे खासगी कंपन्यांना दरवाढीस मुभा दिली आहे. कंपन्यांना दर निश्चितीसाठी आपण काहीही सुचविणार नाही, असेही दूरसंचार प्राधिकरणाने बुधवारी स्पष्ट केले.
व्होडाफोन आयडिया, भारती एअरटेल यांनी गेल्याच आठवडय़ात येत्या १ डिसेंबरपासून त्यांच्या मोबाईलधारकांवर दरवाढ लादण्याचे जाहीर केले. पाठोपाठ रिलायन्स जिओनेही दरवाढीचा निर्णय घेतला. खासगी दूरसंचार कंपन्यांकडून प्रत्यक्षात किती दरवाढ होईल, हे येत्या तीन दिवसांतच स्पष्ट होईल.
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या सूत्रानुसार मात्र खासगी कंपन्यांच्या दरवाढीच्या निर्णयात हस्तक्षेप होणार नाही. तसेच या कंपन्यांना दरवाढीचा किमान स्तर निश्चित करण्याबाबतही मार्गदर्शन केले जाणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
ई-सिगारेटवर बंदी घालणारे विधेयक लोकसभेत मंजूर
लोकसभेमध्ये बुधवारी ई-सिगारेट म्हणजे इलेक्ट्रॉनिक सिगारेटवर बंदी घालणारे विधेयक आवाजी मतदानाने मंजूर झाले. या विधेयकाचे कायद्यामध्ये रुपांतर झाल्यानंतर ई-सिगारेटचे उत्पादन, आयात आणि विक्री गुन्हा ठरणार आहे. यावर्षी सप्टेंबर महिन्यात ई-सिगारेटवर बंदी घालणारा अध्यादेश काढण्यात आला होता.
आता ई-सिगारेटच्या उत्पादन, आयात, निर्यात, वाहतूक, विक्रीला मज्जाव करणारे नवीन विधेयक या अध्यादेशाची जागा घेईल. सर्वच पक्षाच्या बहुसंख्य खासदारांचा या विधेयकाला पाठिंबा होता.
ई-सिगारेट म्हणजे काय ?
जिचा सिगारेटसारखा धूर होत नाही, अशी सिगारेट म्हणजे ‘ई- सिगारेट’ किंवा ‘इलेक्ट्रॉनिक सिगरेट’. तंबाखूजन्य सिगरेट न ओढता तंबाखूमध्ये असलेलं निकोटिन हे द्रव्य शरीरात घेण्याचा एक मार्ग म्हणून ही सिगारेट वापरली जाते. ई-सिगारेट दिसतेही साध्या सिगारेटसारखीच. फरक असा, की ई-सिगारेटमध्ये तंबाखू नव्हे, तर थेट द्रवरूपातलं निकोटिन असतं.
ई -धूम्रपान म्हणजे?
द्रव्यरूपातील निकोटिनची विद्युत उपकरणाच्या माध्यमातून वाफ बनवली जाते आणि याचा धूम्रपानासाठी वापर केला जातो याला ई धूम्रपान असे म्हटले जाते. यामध्ये ई सिगारेट, फ्लेवर हुक्का, ई शिशा इत्यादी निकोटिनयुक्त उपकरणांचा समावेश आहे.
चॅम्पियन्स लीग फुटबॉल : लेवांडोव्हस्कीचा १५ मिनिटांत विक्रमी ‘गोलचौकार’
पोलंडचा नामांकित फुटबॉलपटू रॉबर्ट लेवांडोव्हस्कीने अवघ्या १५ मिनिटांतच झळकावलेल्या चार गोलच्या बळावर बायर्न म्युनिचने चॅम्पियन्स लीग फुटबॉलमध्ये रेड स्टार (सेव्र्हिना झ्वेझडा) संघाचा ६-० असा धुव्वा उडवला. स्पर्धेच्या इतिहासात सर्वात कमी अवधीत चार गोल साकारणारा तो पहिलाच खेळाडू ठरला आहे.
बेलग्रेड येथील रेड स्टार स्टेडियमवर झालेल्या ‘ब’ गटातील या लढतीत लेवांडोव्हस्कीने अनुक्रमे ५३, ६०, ६४ आणि ६७व्या मिनिटाला चार गोल नोंदवले. लायन गोरेझ्का (१४) आणि कोरोन्टिन तोलिसो (८९) यांनी प्रत्येकी एक गोल करून म्युनिचच्या विजयात मोलाचे योगदान दिले. लेवांडोव्हस्कीने पहिल्या सत्रातही एक गोल नोंदवला होता. परंतु ‘व्हार’मुळे तो रद्द करण्यात आला आहे. या विजयासह म्युनिचने त्यांचे अग्रस्थान कायम राखले असून त्यांच्या खात्यात पाच सामन्यांतील पाच विजयांचे १५ गुण जमा आहेत. टॉटेनहॅम हॉटस्पर १० गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे.
आशियाई तिरंदाजी स्पर्धा : अभिषेक-ज्योतीला सुवर्ण
अभिषेक वर्मा आणि ज्योती सुरेखा व्हेन्नम यांनी आशियाई तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत बुधवारी कंपाऊंड मिश्र दुहेरी प्रकारात सुवर्णपदक जिंकले. त्यामुळे भारताच्या खात्यावर सातवे पदक जमा झाले.
अभिषेक-ज्योती जोडीने अंतिम सामन्यात चायनीज तैपेईच्या यि-सुआन चेन आणि चेह-लूह चेन जोडीचा १५८-१५१ असा पराभव केला. भारताने या स्पर्धेत एक सुवर्ण, दोन रौप्य आणि चार कांस्यपदकांची कमाई केली.
दिवसाच्या पूर्वार्धात अभिषेकने फक्त एका गुणाच्या फरकाने कंपाऊंड सांघिक सुवर्णपदक गमावले. कोरियाने २३३-२३२ असा पराभव केल्याने भारताला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. अभिषेक, रजत चौहान आणि मोहन भारद्वाज या त्रिकुटाने पहिल्या सत्रातसुद्धा अप्रतिम खेळ करीत बरोबरी साधली. परंतु दुसऱ्या सत्रात जाईवॉन यांग, याँगची चॉय आणि ईऊन-क्यू चोय यांनी सामन्यावरील नियंत्रण सोडले नाही. महिलांच्या कंपाऊंड सांघिक प्रकारात ज्योती, मुस्कान किरार आणि प्रिया गुर्जर यांनी कोरियाकडून २१५-२३१ अशी हार पत्करल्याने जेतेपद गमावले.
जागतिक तिरंदाजी महासंघाने भारतीय तिरंदाजी संघटनेवर बंदी घातल्यामुळे भारतीय खेळाडू त्रयस्थ क्रीडापटू म्हणून जागतिक तिरंदाजी संघटनेच्या ध्वजाखाली या स्पर्धेत सहभागी झाले होते.
नियमित अपडेट मिळवण्यासाठी Mission MPSC ला फेसबुक, टेलिग्राम आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा.