1) अर्थमंत्री अरुण जेटलींनी सादर केले आर्थिक सर्वेक्षण
अर्थमंत्री अरुण जेटलींनी अर्थसंकल्पाच्या पहिल्या दिवशी आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर केला. या सर्वेक्षणात आर्थिक वर्ष 2018-19 मध्ये विकासदर 7 ते 7.5 टक्के राहाण्याची शक्यता आहे. दुसरीकडे सध्याच्या आर्थिक वर्षात 2017-18 मध्ये जीडीपी ग्रोथ 6.75 टक्के राहाण्याची शक्यता आहे.
– आर्थिक वर्ष 2018 मध्ये जीडीपी ग्रोथ 6.75% पुढे राहाण्याची शक्यता आहे.
– आर्थिक वर्ष 2019 मध्ये जीडीपी ग्रोथ 7 ते 7.5% राहाण्याची शक्यता आहे.
– आर्थिक वर्ष 2018 मध्ये सर्व्हिस ग्रोथ 8.3% राहाण्याची शक्यता आहे.
– कृषि क्षेत्राचा विकासदर 2.1% राहाण्याची शक्यता आहे.
– आर्थिक वर्ष 2019 मध्ये क्रूड ऑइलच्या किंमतीमध्ये 12% वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
2) संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात झाली आहे.
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात झाली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या सदस्यांसमोर अभिभाषण करुन अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. 1 फेब्रुवारी रोजी सरकार अर्थसंकल्प सादर करणार आहे.संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन यंदा दोन टप्प्यांत होत आहे. 9 फेब्रुवारीपर्यंत पहिला टप्पा असेल. त्यानंतर सुमारे एक महिन्याच्या सुटीनंतर दुसरा टप्पा 5मार्चपासून सुरू होईल. तो 6 एप्रिलपर्यंत चालेल. या अधिवेशनात यंदा फार वादाचे विषय नसले तरी ट्रिपल तलाक विधेयकावर दोन्ही सभागृहांत जोरदार चर्चा होण्याची शक्यता आहे.
3) ‘मन की बात’मध्ये माटुंगा स्टेशन व अकोला शहरातील मोर्णा नदीच्या स्वच्छता अभियानाचा गौरव
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’च्या चाळिसाव्या भागात रविवारी मुंबईतील माटुंगा स्टेशनवर सर्व कर्मचारी महिलाच असल्याचे कौतुक करून अकोला शहरातून वाहणाऱ्या मोर्णा नदीच्या स्वच्छता अभियानातील कार्याचा चौथ्यांदा गौरव केला. अकोला शहराच्या मध्यातून वाहणाऱ्या मोर्णा नदीचे पात्र जलकुंभी वनस्पती आणि केरकचऱ्याने भरून गेले आहे. ते स्वच्छ करून नदीला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ‘मिशन क्लीन मोर्णा’ची आखणी केली. दर शनिवारी लोकसहभागातून श्रमदान होते. याचा प्रारंभ संक्रांतीच्या एक दिवस आधी शनिवारी केला गेला. तेव्हापासून नागरिकांनी एकत्र येत नदीची स्वच्छता सुरू केली आहे.
4) पाच मान्यवरांचे लढाऊ विमानातून उड्डाण
आवाजापेक्षा अडीच पट वेगाने म्हणजे २४०० ते २५०० किमी प्रतितासाच्या वेगाने उडणाऱ्या सुखोई ३० एमके या लढाऊ विमानाने एक दशकात अनेक मान्यवरांनी उड्डाण केले आहे. अलीकडेच संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण यांचे उड्डाण इतरांपेक्षा अनेक अर्थाने श्रेष्ठ ठरले. ४५ मिनिटांच्या उड्डाणात वेग १ मॅक म्हणजे १२३४ किमी प्रति तासापेक्षा जास्त होता. विमान पश्चिम सीमेवर पाकिस्तानपर्यंत गेले आणि २४००० फूट उंचीवर उडाले. ही उंची माऊंट एव्हरेस्ट पेक्षा जास्त आहे. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनीही या विमानातून उड्डाण केले होते.
मान्यवरांच्या उड्डाणांची वैशिष्ट्ये अशी –
डॉ. कलाम | सर्वाधिक वयात केले होते उड्डाण, धोकादायक कसरतीही
७४ व्या वर्षी जून २००६ मध्ये ३० मिनिटांचे उड्डाण केले होते. वेग ८०० ते १००० किमी प्रति तास होता. विमान २० हजार फुटांवर गेले होते. त्यांनी त्यातील हवेतून हवेत आणि हवेतून जमिनीवर मारा करणारी क्षेपणास्त्र यंत्रणा स्वत: पारखली होती.
जॉर्ज फर्नांडिस | सर्वात प्रथम, सर्वात धोकादायक उड्डाण
जॉर्ज फर्नांडिस यांनी ७३ व्या वर्षी लोहगाव येथून जून २००३ मध्ये ४० मिनिटांचे उड्डाण केले होते. १००० किमी प्रति तास वेग होता. १६००० फुटांपर्यंत गेले होते. मिग २१ मधून उड्डाण करणारे जॉर्ज फर्नांडिस हे देशाचे पहिले संरक्षणमंत्री होते.
किरण रिजिजू | सर्वात युवा नेते, पण कुठलीही जोखीम नाही
गृहराज्यमंत्र्यांनी ४४ व्या वर्षी पंजाबच्या हलवारा विमानतळावरून मे २०१६ मध्ये ३० मिनिटांचे उड्डाण केले होते. वेग ८०० ते ९०० किमी प्रति तास होता. ते ७९०० फूट उंचीवर गेले होते. हे विमान उड्डाण करणारे ते सर्वात तरुण मंत्री होते, पण उड्डाणात कुठलीही जोखीम नव्हती.
राव इंद्रजीत सिंह | फक्त २० मिनिटांची ‘जॉय राइड’
माजी संरक्षण राज्यमंत्री राव इंद्रजित सिंह यांनी २०१५ मध्ये सुखोईत उड्डाण केले होते. फक्त २० मिनिटांच्या उड्डाणात ८०० किमी प्रति तासाची गती होती. ७००० फूट उंचीवर गेले. त्यांचे उड्डाण सर्वात लहान होते. राव इंद्रजित सिंह यांच्यासाठी हे उड्डाण ‘राइड ऑफ जॉय’ प्रमाणे होते.
MSPC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी Mission MPSC ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्रामवर फॉलो करा.