Current Affairs 29 January 2020
ग्रीनकार्डच्या नवीन नियमांना अमेरिकी न्यायालयाची मंजुरी

अमेरिकेचे कायम निवासी होण्यासाठी आवश्यक असलेल्या ग्रीनकार्ड बाबत नवीन नियमांच्या अंमलबजावणीस तेथील सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी हिरवा कंदील दिला आहे. जर स्थलांतरित लोक मेडिकेड, अन्न कुपन, गृहनिर्माण व्हाउचर्स यासारख्या सुविधांचा लाभ घेत असतील तर त्यांना ग्रीनकार्ड नाकारता येईल असे नवीन धोरणात म्हटले आहे.
अमेरिकेतील सर्वोच्च न्यायालयाने ५ विरुद्ध ४ मतांनी या धोरणाच्या अंमलबजावणीस मंजुरी दिली आहे. न्यूयॉर्क येथील सेकंड सर्किट न्यायालयाने आधी असा निकाल दिला होता की, ग्रीनकार्ड बाबतचे हे धोरण स्थगित करण्यात यावे कारण त्याला आव्हान देणाऱ्या याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयातील स्टीफन ब्रेयर, रूथ बॅदेर गिन्सबर्ग, एलिना कागन व सोनिया सोटोमेयर या उदारमतवादी न्यायाधीशांनी या ग्रीनकार्ड नियमांची अंमलबजावणी रोखण्याच्या बाजूने मत व्यक्त केले आहे.
दरवर्षी अमेरिकेत ५,४४,००० लोक ग्रीनकार्ड साठी अर्ज करीत असतात. यातील किमान ३,८२,००० अर्जदार हे सरकारी योजनांचा लाभ घेतात असा अंदाज आहे त्यामुळे त्यांना नवीन नियमांचा फटका बसण्याची शक्यता आहे.
तरणजित संधू अमेरिकेत भारताचे नवीन राजदूत

ज्येष्ठ मुत्सद्दी तरणजित संधू अमेरिकेतील भारताचे नवे राजदूत असतील. परराष्ट्र मंत्रालयानुसार संधू सध्याचे राजदूत हर्षवर्धन शृंगला यांची जागा घेतील. शृंगला हे आता विदेश सचिव असतील. ते ३१ जानेवारीला विजय गोखले यांचे स्थान घेतील.
‘संविधान’ ऑक्सफर्ड हिंदी वर्ड ऑफ द इयर

ऑक्सफर्ड डिक्शनरीने ‘संविधान’ या शब्दाला २०१९मधील सर्वोत्कृष्ट हिंदी शब्द म्हणून जाहीर केलं आहे. ‘संविधान’ या शब्दाने २०१९मध्ये सर्वांचं लक्ष आकृष्ट केलं होतं. २०१९मध्ये लोकशाही, धर्मनिरपेक्षता, न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुत्वाच्या मूल्यांना संविधानाच्या कसोटीवर तपासलं गेलं. त्यामुळेच संविधान हा शब्द गेल्या वर्षी सर्वाधिक लोकप्रिय ठरल्याने आम्ही या शब्दाची सर्वोत्कृष्ट हिंदी शब्द म्हणून निवड करत आहोत, असं ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने (ओयूपी) म्हटलं आहे.
संविधान हा शब्द म्हटला तर शब्दही आहे आणि अभिव्यक्तीही आहे. या शब्दाने २०१९मध्ये संपूर्ण देशवासियांचं लक्ष वेधून घेतलं. त्यातून लोकांच्या भावनाही व्यक्त झाल्या आहेत. मूलभूत सिद्धांताच्या एकत्रिकरणाने किंवा स्थापित दृष्टांतामुळे एक देश किंवा संघटन प्रस्थापित होते, असा संविधानाचा अर्थ असल्याचं ओयूपीने म्हटलं आहे.
या आधी ऑक्सफर्ड डिक्शनरीने आधार, डबा, चॉल, हडताल आणि शादी आदी शब्दांचा डिक्शनरीत समावेश केला आहे. शुक्रवारी ऑक्सफर्डची नवी आवृत्ती लॉन्च करण्यात आलीय. ऑक्सफर्डची ही १०वी आवृत्ती आहे. त्यात ३८४ भारतीय शब्दांचा समावेश असून जगभरातील भाषांमधील एकूण एक हजार शब्दांचा समावेश या नव्या डिक्शनरीत करण्यात आला आहे. चॅटबॉट, फेकन्यूज आणि मायक्रोप्लास्टिक आदी शब्दांचाही त्यात समावेश करण्यात आला आहे.
नेत्रा विश्वचषकात पदक जिंकणारी पहिली भारतीय
भारताची सेलर नेत्रा कुमाननने अमेरिकेत इतिहास रचला. ती सेलिंग विश्वचषकात पदक जिंकणारी भारताची पहिली महिला खेळाडू बनली. चेन्नईची २२ वर्षीय नेत्राने मियामीमध्ये हेंपेल जागतिक स्पर्धेत सहभागी झाली आणि दुसऱ्या फेरीत कांस्यपदक जिंकले. ती लेजर रेडियल प्रकारात तिसऱ्या स्थानी राहिली. अमेरिकन एरिना रेनेकेने सुवर्ण आणि युनानच्या वेसिलिया काराचालियूने रौप्यपदक मिळवले. आता नेत्राचे लक्ष्य टोकिओ ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळवणे आहे. ती आशियाई चॅम्पियनशिपमध्ये अव्वल २ मध्ये राहिल्यास टोकिओ ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळवेल. एशियन सेलिंग १५ ते २२ मार्चदरम्यान अबुधाबी येथे होईल. नेत्राने म्हटले की, अव्वल खेळाडूंमध्ये रोमानियाच्या एबरू बोलाटसोबत स्पेनच्या केनेरी आयलँडमध्ये प्रशिक्षण घेत होती.
नेत्रा यूथ सेलिंग कप फायनल्समध्ये कांस्य, हाँगकाँग रेस वीकमध्ये रौप्य आणि इंडिया इंटरनॅशनल रेगेटामध्ये कांस्य जिंकले आहेत. तिने राष्ट्रीय प्रकारात ४ सुवर्ण, ३ रौप्य व एक कांस्यपदक मिळवले.
रतन टाटा यांना ‘टायकाॅन मुंबई २०२० जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान
काॅर्पाेरेट जगतातही मूल्यांची कड घेणारे इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांनी मंगळवारी उद्योगपती रतन टाटा यांना ‘टायकाॅन मुंबई २०२० जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान केला. टाटा यांनी स्टार्टअप्सना इशारा दिला की… गुंतवणूकदारांचे पैसे बुडवून पळ काढणाऱ्यांना आता दुसरी-तिसरी संधी मिळणार नाही.
लवकरच आफ्रिकन चित्ते भारतात येणार

दक्षिण आफ्रिकेतील चित्ता हा वन्यजीव येत्या काळात भारतात आणला जाऊ शकतो. तशी परवानगी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिली आहे.
भारतातल्या योग्य अधिवासात आफ्रिकेतील चित्ता आणता येईल असं सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला सांगितलं. आपल्या चपळतेसाठी ओळखला जाणारा चित्ता भारतातून नामशेष झाला आहे.
भारतीय चित्ता देशातून जवळपास नामशेष झाला आहे, त्यामुळे आफ्रिकेतील नामिबिया येथून चित्ता आणण्याची परवानगी मागणारी याचिका राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने (NTCA) सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी निर्णय घेण्यासाठी तीन सदस्यीय समिती नेमली आहे. या समितीत माजी वन्यजीव संचालक रणजीत सिंह, वन्यजीव महासंचालक धनंजय मोहन आणि वाइल्ड लाइफ डीआयजी यांचा समावेश आहे.