1) बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावात आता ‘रामजी’
घटनाकार बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावात एक महत्त्वाचा बदल होणार आहे. उत्तर प्रदेशात बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव भीमराव आंबेडकर असे लिहिले जात होते. आता त्यांच्या या नावात त्यांच्या वडिलांचे नावही समाविष्ट केले जाणार आहे. रामजी मालोजी सकपाळ हे बाबासाहेब आंबेडकर यांचे वडिल होते. बाबासाहेब आंबेडकर सही करतानाही भीमराव रामजी आंबेडकर अशीच सही करत. त्याचमुळे उत्तरप्रदेशात आता बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव भीमराव रामजी आंबेडकर असे लिहिले जाणार आहे. राज्यपाल राम नाईक यांच्या सल्ल्यानंतर हा बदल केला जणार आहे.
डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर अर्थात बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ मध्ये झाला होता. भीमराव आंबेडकर यांच्या वडिलांचे नाव रामजी मालोजी सकपाळ असे होते तर आईचे नाव भीमाबाई होते. बाबासाहेब आंबेडकरांनी विदेशात जाऊन अर्थशास्त्रात डॉक्टरेट मिळवली होती. १९२६ मध्ये ते भारतात परतले तेव्हा त्यांची निवड विधानसभेचे सदस्य म्हणून करण्यात आली.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर बाबासाहेब आंबेडकर हे न्याय मंत्री होते. तसेच भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणून बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव आदराने घेतले जाते. १९९० मध्ये त्यांना भारतरत्न हा किताब देऊन गौरवण्यात आले. समाजातील अस्पृश्यता, जातीभेद दूर करण्यासाठी त्यांनी आयुष्य वेचले. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. तर ६ डिसेंबर १९५६ रोजी त्यांचा मृत्यू झाला.
2) मलाला ६ वर्षांनंतर मायदेशी परतली
पाकिस्तानातील लहान मुलांच्या शिक्षणासाठी काम करणारी आणि नोबेल पारितोषिक विजेती पाकिस्तानी तरुणी मलाला युसुफझाई गुरुवारी पहाटे मायदेशी अर्थात पाकिस्तानात परतली. पाच वर्षांपेक्षाही अधिक काळ ती देशाबाहेर राहत होती. चार दिवसांच्या दौऱ्यासाठी ती मायदेशात ‘मिट मलाला’ या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी येथे आली आहे. ऑक्टोबर २०१२मध्ये १५ वर्षांची मलाला पाकिस्तानातील महिला आणि लहान मुलींच्या शिक्षणांदर्भात काम करीत असल्याने तालिबानी दहशतवाद्यांनी तिच्यावर हल्ला चढवला होता. मुस्लिम महिलांच्या शिक्षणासाठी काम करणाऱ्या मलालाला २०१४मध्ये शांततेच्या नोबेलने सन्मानित करण्यात आले होते.
3) ब्रिटनमध्ये प्लास्टिक बाटल्यांवर शुल्क आकारण्याचा प्रस्ताव
ब्रिटनमध्ये प्रदूषणाचा सामना करण्यासाठी प्लास्टिक बाटल्यांवर शुल्क आकारण्यात येणार आहे. ते अनामत रकमेच्या स्वरूपात असून वापरलेली बाटली परत दिल्यास त्यातील काही पैसे परत मिळणार आहेत. डेन्मार्क, स्वीडन, जर्मनी या देशात रिकामी बाटली परत आणून दिल्यानंतर २२ पेन्स म्हणजे २५ युरो सेंट्स इतके पैसे परत मिळतात. अनेक दुकानांमध्ये प्लास्टिक पिशव्यांसाठी २०१५ पासून ५ सेंट इतके शुल्क आकारण्यात येत असून त्यामुळे प्लास्टिक पिशव्यांचा वापर ९ अब्जांनी कमी झाला. ब्रिटनने पुढील महिन्यात होणाऱ्या राष्ट्रकुल परिषदेच्या विषयसूचीत प्लास्टिक प्रदूषणाचा प्रश्न मांडण्याचे ठरवले आहे.
4) बटू ताऱ्याभोवती फिरणाऱ्या बाहय़ग्रहाचा शोध
बटू ताऱ्याभोवती फिरणारा पृथ्वीच्या आकाराचा तप्त धातूच्या गोळय़ासारखा ग्रह शोधण्यात आला असून, तो २६ कोटी प्रकाशवर्षे दूर आहे. या ग्रहाचे नामकरण के २ -२२९ बी असे करण्यात आले असून, तो पृथ्वीपेक्षा वीसपटींनी मोठा आहे. त्याचे वस्तुमान पृथ्वीपेक्षा अडीच पटींनी अधिक आहे. त्याचे दिवसाचे तापमान २००० अंश सेल्सियस असून तो त्याच्या मातृताऱ्यापासून सर्वात जवळ म्हणजे ०.०१२ खगोल एकक अंतरावर म्हणजे सूर्य व पृथ्वी यांच्यातील अंतराच्या एक शंभरांश अंतरावर आहे. कन्या तारकासमूहातील मध्यम आकाराच्या बटू ताऱ्याभोवती तो फिरत असून के २-२२९ बी ग्रह मातृताऱ्याभोवती एक प्रदक्षिणा चौदा तासांत पूर्ण करतो. के २ दुर्बिणीच्या मदतीने फ्रान्सच्या एक्स मार्सेली व ब्रिटनच्या वॉरविक विद्यापीठातील वैज्ञानिकांनी हा ग्रह शोधला आहे. गुरुत्वीय आकर्षणामुळे होणाऱ्या वुबल परिणामामुळे हा ग्रह सरकत असतो त्यातून त्याचा शोध लागला आहे.
MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी Mission MPSC ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.