अखेरच्या तिमाहीत महाबँकेला नफा
- बँक ऑफ महाराष्ट्रने मार्च २०१९ अखेर संपलेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत ७२.३८ कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या (२०१७-१८) याच तिमाहीत बँकेला ११३.५१ कोटी रुपयांचा निव्वळ तोटा झाला होता. ३१ मार्च २०१९ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात या बँकेला ४,७८४ कोटी रुपयांचा निव्वळ तोटा झाला आहे.
- गतवर्षी जानेवारी-मार्च या तिमाहीत १९.४८ टक्क्यांवर पोहोचलेले हे प्रमाण १६.४० टक्क्यांवर आणण्यात बँकेला यश आले आहे. तर निव्वळ अनुत्पादित कर्जांचे प्रमाणही ११.२४ टक्क्यांवरून ५.५२ टक्क्यांपर्यंत कमी झाले आहे.
नेपाळच्या सीमेवर हिममानवाच्या पावलाचे ठसे; नेटिझन्स चकीत
- भारतीय सैन्याला नेपाळ सीमेवर मकालू बेस कॅम्पजवळ एका हिममानवाच्या पावलाचे ठसे सापडले आहेत. या हिममानवाला स्थानिक लोक यती म्हणून संबोधतात. दरम्यान सोशल मीडियावर मात्र अशा हिममानवाच्या अस्तित्वाबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जातं आहे.
- पाश्चिमात्य कार्टुन्समध्ये, लहान मुलांच्या कार्यक्रमांमध्ये अनेकदा काल्पनिक हिममानव रेखाटला जातो. हा हिममानव लहान मुलांचे भरपूर मनोरंजन करत असला तरी हिममानवाच्या अस्तित्वाचे कोणतेच पुरावे मात्र आजपर्यंत शास्त्रज्ञांना सापडलेले नाहीत. तर दुसरीकडे नेपाळ सीमेवरील हिमपर्वतरांगांमध्ये लोकांमध्ये एका केसाळ, उंच आणि धिप्पाड राक्षसासारख्या दिसणाऱ्या हिंस्त्र हिममानव फिरत असल्याची मान्यता आहे.ही मान्यता आज-कालची नसून तब्बल २६०० वर्षं जुनी आहे.
डॉमनिक थिमला विजेतेपद
- ऑस्ट्रियाच्या तिसऱ्या मानांकित डॉमनिक थिमने रविवारी मध्यरात्री एटीपी बार्सिलोना खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीचे विजेतेपद मिळवले. अंतिम फेरीत थिमने रशियाच्या सातव्या मानांकित डॅनिल मेद्वेद्ेवला ६-४, ६-० अशी सहज धूळ चारली.
- गेल्या १५ वर्षांत या स्पर्धेचे विजेतेपद मिळवणारा थिम हा चौथा टेनिसपटू ठरला आहे. यापूर्वी राफेल नदाल, केई निशिकोरी आणि फर्नाडो व्हर्डास्को यांनी विजेतेपदास गवसणी घातली आहे. त्याचप्रमाणे १९९६ नंतर प्रथमच ऑस्ट्रियाच्या टेनिसपटूने या स्पर्धेच्या अजिंक्यपदावर नाव कोरले. यापूर्वी थॉमस मस्टरने हा पराक्रम केला होता. थिमच्या नावावर आता १३ एटीपी विजेतेपदे जमा आहेत.
विदर्भातील शहरे जगात सर्वाधिक उष्ण
- विदर्भातील शहरे जगातील सर्वाधिक तापमानाची आणि तापमानाचा मुक्काम अधिकाधिक दिवस राहणारी असल्याचे स्पष्ट झाले आहे. भारतीय हवामान खात्याने देशभरातील १७६ वेधशाळांच्या १९६९ वर्षांपासून आजपर्यंतच्या तापमानाच्या आकडेवारीच्या आधारावर हा निष्कर्ष काढला आहे.
- हवामान खात्यातील संशोधकांनी एखाद्या ठिकाणचे मार्च ते जून दरम्यानचे तापमान ३७ अंशापेक्षा अधिक असेल तर त्या दिवसाची नोंद उच्च तापमानाचा दिवस अशी केली आहे. भारतातील १७६ वेधशाळांमधून मिळालेल्या आकडेवारीच्या आधारावर ही उच्च तापमानाची शहरे कोणती, त्याचा शोध घेण्यात आला. गेल्या ५० वर्षांतील आकडेवारीनुसार उच्च तापमानाची सर्वाधिक शहरे देशाच्या दक्षिण आणि मध्य भागात आहेत.
- राजस्थानच्या वाळवंटातील बाडमेर शहरात ४९.९ अंश सेल्सिअस आणि श्रीगंगानगरमध्ये ५० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. मात्र येथे ६९ दिवसच उच्च तापमान राहते.
- १९६९ पासून आजपर्यंतच्या कमाल तापमानाचे आकडे तपासले तर संपूर्ण भारतात कमाल तापमानाची दोन केंद्रे तयार झाली आहेत. पहिले केंद्र राजस्थानमध्ये जैसलमेर-बिकानेर आणि दुसरे महाराष्ट्रात चंद्रपूर येथे आहे. पहिल्या केंद्राचे तापमान ३९ अंश सेल्सिअस आणि दुसऱ्या चंद्रपूर केंद्राचे तापमान ४० अंश सेल्सिअस इतके आहे.