देश-विदेश
पश्चिम बंगालचे नामकरण
# पश्चिम बंगाल या राज्याला आता नवीन ओळख मिळणार आहे. पश्चिम बंगाल विधानसभेने राज्याचे नाव बदलण्याचा प्रस्ताव मंजूर केला असून आता हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात येणार आहे. केंद्राकडून हिरवा कंदील मिळाल्यावर पश्चिम बंगालला बंगाली भाषेत बांगला, इंग्रजीत बेंगाल आणि हिंदीत बंगाल या नावाने ओळखले जाईल. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काही दिवसांपूर्वीच पश्चिम बंगाल या विद्यमान नावावर नाराजी व्यक्त केली होती. केंद्र आणि राज्यांमधील संबंधावर आधारित एका जाहीर कार्यक्रमात ममता बॅनर्जी म्हणाल्या, इंग्रजी अक्षरांप्रमाणे डब्ल्यू हे अक्षर सर्वात शेवटी येते. त्यामुळे आम्हाला नेहमीच सर्वात शेवटी बोलायला संधी मिळते असे त्यांनी म्हटले होते. पश्चिम बंगालमधील अनेक प्रशासकीय अधिकारी आणि अन्य मंत्र्यांनीही वारंवार हा मुद्दा उपस्थित केला आहे.
राज्य
डान्सबारमध्ये बारबालांवर पैसे उडवता येणार नाहीत- सुप्रीम कोर्ट
# राज्यात पुन्हा सुरू होत असलेल्या डान्सबारमध्ये बारबालांवर पैसे उडवता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाकडून मंगळवारी स्पष्ट करण्यात आले. महिलांवर अशाप्रकारे पैसे उडवणे हे त्यांच्या प्रतिष्ठा, शिष्टाचार आणि सभ्यतेच्या विरोधात आहे, असे न्यायालयाने यावेळी म्हटले. बारबालांना काय वाटते, हा मुद्दा गौण आहे, असेही न्यायालयाने यावेळी स्पष्ट केले. याशिवाय, न्यायालयाने डान्सबारच्या परवान्यासाठीच्या कायद्यासाठी राज्य सरकारला नोटीस बजावली आहे. या नोटीसला राज्य सरकारला सहा आठवड्यात उत्तर द्यावे लागणार आहे. महाराष्ट्र सरकारच्या नव्या कायद्यात डान्सबारमध्ये बारबालांवर पैसे उधळण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्याचे सर्वोच्च न्यायालयाकडून समर्थन करण्यात आले. मात्र, याचिकाकर्ते असणाऱ्या इंडियन हॉटेल अॅण्ड रेस्टॉरन्ट असोसिएशनच्या अन्य आक्षेपांवर न्यायालयाने सरकारला जाब विचारला आहे. डान्सबार मालकांनी सरकारी कायद्यातील अनेक त्रुटींवर बोट ठेवले आहे. अश्लील नृत्य केल्यास राज्य सरकारच्या कायद्यानुसार तीन वर्षांची शिक्षा होणार आहे. मात्र, भारतीय दंड संहितेत यासाठी तीन महिन्यांच्या शिक्षेचीच तरतूद आहे. हा कायदा घटनेची पायमल्ली करणारा असल्याचे सांगत बारमालकांनी या कायद्याला आक्षेप घेतला आहे.
खासगी शाळांना सरसकट २० टक्के अनुदान देण्यास मंत्रिमंडळाची मान्यता
# राज्यातील विनाअनुदान तत्त्वावर तसेच कायम विनाअनुदान तत्त्वावर परवानगी दिलेल्या व मुल्यांकनादरम्यान अनुदानास पात्र ठरलेल्या मान्यताप्राप्त खासगी प्राथमिक व माध्यमिक शाळांना द्यावयाच्या अनुदान सूत्रामध्ये बदल करुन त्यांना सरसकट २० टक्क्यांप्रमाणे अनुदान देण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. जून २००९ पासून प्रलंबित असलेला कायम विनाअनुदानित शाळांचा प्रश्न आजच्या निर्णयामुळे अखेर सोडविण्यात आला. या निर्णयाचा लाभ १९ हजार २४६ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना होणार आहे. राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांना द्यावयाच्या अनुदान सूत्रात यापूर्वी वेळोवेळी सुधारणा करण्यात आल्या आहेत. कायम हा शब्द २० जुलै २००९ रोजी वगळल्यानंतर शाळा मूल्यांकनाच्या विहित अटी, शर्ती व निकषानुसार अनुदान देण्याचा निर्णय तत्कालीन सरकारने घेतला होता. मात्र, २००८ ते २०१६ या आठ वर्षांच्या कालावधीत या शाळांमधील शिक्षकांच्या पदरी प्रत्यक्षात काहीच पडले नव्हते. गेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्र्यांनी तर शालेय शिक्षण मंत्र्यांनी नुकत्याच आटोपलेल्या पावसाळी अधिवेशनात गणेशोत्सवापूर्वी याबाबत निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते.
‘कोठली’ राज्यातील पहिली शासकीय आयएसओ मानांकित आश्रमशाळा
# भौतिक आणि शैक्षणिक सुविधांअभावी राज्यातील आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळा टिकेचे लक्ष होत असतानाच नंदुरबार जिल्ह्य़ातील कोठली शासकीय आश्रमशाळेने आदर्श प्रस्थापित केला आहे. राज्यातील पहिली आयएसओ शासकीय आश्रमशाळा होण्याचा बहुमान या शाळेने मिळवला आहे. निकृष्ठ दर्जाचे जेवण, शैक्षणिक असुविधा यामुळे आंदोलने ही राज्यातील आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळांची ओळख निर्माण झाली आहे. परंतु, आपली नकोशी असणारी ओळख मोडीत काढत नंदुरबार एकात्मीक आदिवासी प्रकल्पातंर्गत असणाऱ्या कोठली आश्रमशाळेने आयएसओ मानांकन मिळवून सुखद धक्का दिला आहे. दोन वर्षांंपासून या शाळेचा कायापालट करण्यासाठी मुख्याध्यापकांसह सर्व कर्मचारी आणि शिक्षक, विद्यार्थ्यांंनी विशेष मेहनत केली. आश्रमशाळेत १२ वीपर्यंतचे शिक्षण दिले जात असून सुमारे ६४२ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
राज्यात जीएसटी विधेयक एकमताने मंजूर
# मोदी सरकारच्या महत्त्वाकांक्षी वस्तू आणि सेवा कर विधेयकाला राज्यातील विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजुरी मिळाली आहे. विधानसभा आणि विधानपरिषदेत एकमताने हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला असून आता राज्यभरात जीएसटी करप्रणाली लागू करण्याचा मोकळा झाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या वस्तू व सेवा कर विधेयकाला नुकत्याच संपलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात बहुमताने मंजुरी देण्यात आली. वस्तू व सेवा कर विधेयक घटनादुरुस्ती विधेयक असल्यामुळे त्याला देशातील राज्य विधिमंडळाच्या सभागृहांची मंजुरीही आवश्यक आहे. त्याप्रमाणे वेगवेगळ्या राज्यातील विधानसभांमध्ये हे विधेयक मांडण्यात येत असून, त्याला मंजुरी देण्याची औपचारिक प्रक्रिया पूर्ण करण्यात येत आहे. जीएसटी करप्रणाली लागू करणारे महाराष्ट्र हे नववे राज्य ठरले आहे.
क्रीडा
सानिया-मोनिकाला विजेतेपद
# भारताची आघाडीची टेनिसपटू सानिया मिर्झाने रोमानियाच्या मोनिका निक्यूलेस्क्यूच्या साथीने खेळताना कनेक्टिकट खुल्या टेनिस स्पध्रेतील महिला दुहेरीच्या विजेतेपदाला गवसणी घातली आहे. त्यामुळे सोमवारपासून सुरू होणाऱ्या अमेरिकन खुल्या ग्रँड स्लॅम टेनिस स्पध्रेला सामोरे जाताना तिचा आत्मविश्वास कमालीचा उंचावला आहे. सानियाने निक्यूलेस्क्यू या नव्या साथीदारासह खेळताना पहिले विजेतेपद पटकावले आहे. या जोडीने कॅटरिना बोंडोरेंको (युक्रेन) आणि च्युआंग चिया-जंग (तैवान) जोडीला दीड तास रंगलेल्या अंतिम फेरीत ७-५, ६-४ असे नामोहरम केले.
चार वर्षांनंतर कुस्तीपटू योगेश्वर दत्तला लंडन ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक
# रिओ ऑलिम्पिकमधून रिकाम्या हाताने परतलेल्या कुस्तीपटू योगेश्वर दत्तला एक आनंदाची बातमी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी) दिली आहे. २०१२ मध्ये लंडन ऑलिम्पिकमध्ये योगेश्वरने कांस्य पदक पटकावले होते. योगेश्वरला याच लढतीसाठी आता रौप्य पदक मिळणार आहे. या लढतीत रौप्य पदक मिळवलेल्या रशियन कुस्तीपटूची उत्तेजक चाचणी पॉझिटिव्ह आल्याने त्याचे हे पदक योगेश्वरला देण्यात येणार आहे. रिओ ऑलिम्पिकमधील निराशजनक कामगिरीमुळे नाराज असलेल्या योगेश्वरला यामुळे सुखद धक्का बसला आहे. लंडन ऑलिम्पिकमध्ये ६० किलोग्रॅम फ्री स्टाइल वजनी गटात रशियाच्या बेसिक कुदुखोव्हला रौप्य तर योगेश्वरला कांस्य पदक मिळाले होते. कुदुखोवचा २०१३ साली वयाच्या २७ व्या वर्षी रशियामध्ये अपघातात मृत्यू झाला आहे. परंतु याच महिन्यात रिओमध्ये झालेल्या ऑलिम्पिक सामन्यापूर्वी आयओसीने लंडन ऑलिम्पिक दरम्यानच्या खेळाडूंच्या सॅम्पलची पुन्हा एकदा तपासणी केली होती. हे सॅम्पल १० वर्षांपर्यंत ठेवले जाते. जर एखाद्या खेळाडूने चुकीच्या पद्धतीने यश मिळवले असेल तर या चाचणीतून ते समोर येईल असा आयओसीचा उद्देश आहे. या नियमांतर्गतच कुदुखोव्हच्या नमुन्यांची पुन्हा चाचणी घेण्यासत आली. त्याची चाचणी पॉझिटिव्ह आल्याने त्याचे रौप्य पदक योगेश्वर दत्तला मिळेल.
देशातील ‘क्रीडारत्नां’चा राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान
# क्रीडा दिनाचे औचित्य साधून आज देशातील ‘क्रीडारत्नां’चा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते ‘खेलरत्न’ आणि ‘अर्जुन’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला. गेल्या चार वर्षात क्रीडा क्षेत्रात दिलेल्या अमुल्य योगदानाच्या पार्श्वभूमीवर हे पुरस्कार देण्यात आले. दिवंगत महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद सिंग यांचा २९ ऑगस्ट हा जन्मदिवस देशात क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. याच पार्श्वभूमीवर आज पुरस्कार वितरण करण्यात आले.
पुरस्कार विजेते-
राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार- पी.व्ही.सिंधू (बॅडमिंटन), दीपा कर्माकर (जिम्नॅस्टिक्स), जीतू राय (नेमबाजी) आणि साक्षी मलिक (कुस्ती)
द्रोणाचार्य पुरस्कार- नागापुरी रमेश (अॅथलेटिक्स), सागर मल धायाल (बॉक्सिंग), राजकुमार शर्मा (क्रीकेट), बिश्वेश्वर नंदी (जिम्नॅस्टिक्स), एस.प्रदीप कुमार (जलतरण, जीवनगौरव), महावीर फोगट (कुस्ती, जीवनगौरव)
अर्जुन पुरस्कार– रजत चौहान (तिरंदाजी), ललित बाबर (धावपटू), सौरव कोठारी (बिलियर्ड्स आणि स्नूकर), शिवा थापा (बॉक्सिंग), अजिंक्य रहाणे (क्रीकेट), सुब्राता पौल (फुटबॉल), रानी (हॉकी), व्हीआर रघुनाथ (हॉकी), गुरूप्रीत सिंग (नेमबाज), अपूर्वी चंडेला(नेमबाज), सौम्यजित घोष (टेबल टेनिस), विनेश फोगट (कुस्ती), अमित कुमार (कुस्ती), संदीप सिंग मान (पॅरा-अॅथलेटिक्स), विजेंद्र सिंग (बॉक्सिंग)