Current Affairs 30 March 2018
1) जीसॅट-६ए उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण
भारतीय अंतराळ संशोधन संस्था ‘इस्रो’ने गुरुवारी जीसॅट-६ए दूरसंचार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले. देशात सॅटेलाईट आधारित मोबाईल कॉलिंग आणि दूरसंचार यंत्रणा या उपग्रहामुळे अधिक सुलभ, वेगवान होणार असून सैन्यदलांना याचा सर्वाधिक लाभ होणार आहे. तसेच देशातील फोर-जी सेवाही अधिक गतिमान करण्यासाठी हा उपग्रह उपयुक्त ठरणार आहे. आंध्रप्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन प्रक्षेपण केंद्रावरून गुरुवारी दुपारी ४ वाजून ५६ मिनिटांनी जीसॅट-६ए उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले. ‘इस्रो’च्या अंतराळ मोहिमेतील सर्वाधिक भरवशाचे जीएसएलव्ही रॉकेट हा २ हजार किलो वजनी उपग्रह घेऊन अवकाशात झेपावले. या अग्निबाणात स्वदेशी क्रायोजेनिक इंधन वापरण्यात आले आहे. प्रक्षेपणानंतर १८ मिनिटांनी हा उपग्रह ३६ हजार किमी उंचीवरील भूस्थिर कक्षेत स्थिर करत, ‘इस्रो’ने आपल्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा खोवला. हायपॉवर एस बँड दूरसंचार सॅटेलाईटच्या मालिकेतील हा दुसरा उपग्रह आहे. यापूर्वी ‘इस्रो’ने ऑगस्ट २०१५मध्ये जीसॅट-६ चे यशस्वी केले होते. जीसॅट-६ए हा जीसॅट-६च्या मदतीसाठी पाठवण्यात आला आहे. यामध्ये अधिक शक्तीशाली दूरसंचार यंत्रणा आहे. यामुळे मोबाईल दूरसंचार क्षेत्रात मल्टीबीम कवरेज सुविधा उपलब्ध होईल. देशातील ४-जी सेवा अधिक वेगवान आणि सर्वत्र पोहचवण्यासाठीही हा उपग्रह उपयुक्त ठरणार आहे. या उपग्रहातील अँटेना ६ मीटर व्यासाचा आहे. सामान्यापेक्षा हा आकार तिप्पट मोठा आहे. यामुळे पृथ्वीच्या कोणत्याही कोपऱ्यातून सॅटेलाईट फोनद्वारे संपर्क साधता येईल. याचा सैन्यदलांना सर्वाधिक लाभ होईल. अतिदुर्गम भागात लष्करी तुकड्या एकमेकांसोबत अधिक चांगल्या पद्धतीने संपर्कात राहतील. आतापर्यंतच्या उपग्रहांमुळे सॅटेलाईट कॉलिंगसाठी संबंधित परिसरात एका ग्राऊंड स्टेशनची गरज होती. मात्र जीसॅट-६ए मुळे दोन सॅटेलाईट फोन दरम्यान थेट कॉलिंग करता येईल.
2) पंतप्रधान मोदी ‘टाइम’च्या प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत
प्रसिद्ध ‘टाइम’ मासिकाच्या जगातील १०० प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत सलग चौथ्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्थान देण्यात आले आहे. या यादीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन, चीनचे शी जिनपिंग, मायक्रोसॉफ्टचे भारतीय वंशाचे सीईओ सत्या नडेला यांचाही समावेश आहे. गेल्या एक दशकाहून अधिक काळापासून ‘टाइम’कडून जगभरातील प्रभावशाली व्यक्तींची यादी जाहीर करण्यात येते. यामध्ये आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे नेते, कलाकार, शास्त्रज्ञ, मानवाधिकार कार्यकर्ते, उद्योगपती, धर्मगुरू यांना स्थान देण्यात येते. यंदाच्या वर्षातील अंतिम विजेत्यांची यादी पुढील महिन्यात जाहीर होईल. तत्पूर्वी ‘टाइम’च्या संपादकांनी जगभरातील १०० जणांचा समावेश असलेली एक प्राथमिक यादी गुरुवारी जाहीर केली. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही स्थान देण्यात आले आहे. २०१५सालापासूनच्या प्रत्येक यादीत मोदींच्या नावाचा समावेश आहे. यंदाचे हे चौथे वर्ष आहे. ऑनलाइन मतदान करून जगातील सर्वाधिक प्रभावशाली व्यक्तीची निवड करायची आहे. मोदींशिवाय या यादीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, त्यांची कन्या इवांका ट्रम्प, जावई जेरेड कुशनर, रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन, चीनचे शी जिनपिंग, मायक्रोसॉफ्टचे भारतीय वंशाचे सीईओ सत्या नडेला, फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग, ॲमेझॉनचे प्रमुख जेफ बेझोस, पाकिस्तानी वंशाचा अमेरिकन अभिनेता कुमैल नानजीआनी, प्रिन्स विल्यम आणि त्याची पत्नी केट, प्रिन्स हॅरी आणि त्याची होणारी पत्नी मेघन, अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा यांचा समावेश आहे.
3) इजिप्तची सत्तासूत्रे पुन्हा अल-सिसींकडे
इजिप्तमध्ये नुकत्याच झालेल्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत अब्दुल फताह अल-सिसी यांनी दुसऱ्यांना बाजी मारली आहे. तब्बल ९२ टक्के मते मिळवत त्यांनी दुसऱ्यांदा सत्तासूत्रे आपल्या हाती घेतली आहेत. इजिप्तमधील सहा कोटी नोंदणीकृत मतदारांपैकी २.३ कोटी मतदारांनी हक्क बजावला आहे. देशात मागील तीन दिवसांपासून मतदान घेण्यात आले आहे. सिनाई प्रांतातील हिंसाचार व अनेक आव्हाने देशासमोर आहेत.
4) अण्णांच्या ११ मागण्या तत्त्वत: मान्य; उपोषणाची सांगता
अण्णा हजारे यांच्या सात दिवसांच्या उपोषणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी सांगता झाली. केंद्राने अण्णांच्या ११ मागण्या तत्त्वत: मान्य केल्या आहेत. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन केंद्र सरकार व अण्णा यांच्यात शिष्टाई करीत होते.
या होत्या अण्णांच्या मागण्या
शेतीमालाला उत्पादन खर्चाहून ५० टक्के अधिक भाव, शेतीवर अवलंबून असलेल्या ६० वर्षांवरील शेतकरी व मजुरांना दरमहा ५ हजार रुपये निवृत्तिवेतन, निवडणूक आयोगाप्रमाणेच कृषिमूल्य आयोगाला स्वायत्तता, लोकपालची त्वरित नियुक्ती व्हावी. लोकपालप्रमाणे राज्यांत सक्षम लोकायुक्त कायदा, त्यातील कमकुवत करणारे कलम ६३ व ४४मध्ये बदल या अण्णांच्या प्रमुख मागण्या होत्या. शिवाय मतपत्रिकेवर उमेदवाराचे रंगीत छायाचित्र, मतमोजणीसाठी टोटलायझर मशिनचा उपयोग आणि लोकप्रतिनिधीला परत बोलावण्याचा अधिकार याही मागण्या त्यांनी केल्या होत्या.
5) देशात दर चार मिनिटांनी एकाचा अपघाती मृत्यू
देशात दर ४ मिनिटांनी एकाचा अपघाती मृत्यू होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील रस्ते अपघातात महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर असल्याचेही महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेसने प्रकाशित केलेल्या ‘अॅक्सिडेंट इंडिया २०१६’ या अहवालातून समोर आले आहे. या अहवालानुसार, मुंबईत रोज ४ हजार छोटे-मोठे रस्ते अपघात होतात. देशात १,५६८.७२ किलोमीटरचे राज्य महामार्ग, तर २३२.५८ किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग आहेत. राज्यात १ हजार २१० अपघातस्थळे असून त्यातील सर्वाधिक मुंबईत असून त्याखालोखाल नाशिक विभागात अपघातप्रवण स्थळांची संख्या अधिक आहे. मुळात रस्ते वाहतुकीत होणाऱ्या सर्व अपघातांची नोंदणी नॅशनल क्राइम रेकॉडर््स ब्युरोकडून केली जात नाही, तसेच मृत्यूंच्या नेमक्या कारणाचा मृत्यूशी संबंधित आकडेवारीमध्ये अभाव असल्याने ट्रॉमाशी संबंधित मृत्यूंची नेमकी संख्या ओळखणे अवघड असल्याचे संस्थेचे म्हणणे आहे. जगात होणाºया एकूण ट्रॉमा मृत्यूंपैकी पाव टक्का मृत्यू भारतात होतात. तर गेल्या चार वर्षांत महाराष्ट्रात रस्ते अपघातांत अंदाजे दोन लाख लोक जखमी झाले आहेत.
MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी Mission MPSC ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.