⁠  ⁠

चालू घडामोडी : ३० नोव्हेंबर २०१९

Chetan Patil
By Chetan Patil 6 Min Read
6 Min Read

Current Affairs 30 November 2019

सुप्रसिद्ध मल्याळी कवी अक्किथम यांना‘ज्ञानपीठ’

vdh04 2

मल्याळी काव्यातील आदरणीय व्यक्तिमत्त्व अशी ओळख असलेले सुप्रसिद्ध कवी अक्किथम यांची २०१९ या वर्षांसाठीच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या ५५व्या ज्ञानपीठ पुरस्कारासाठी निवड झाली.
ज्ञानपीठ निवड मंडळाने शुक्रवारी ही घोषणा केली. अक्किथम अत्युथन नंबूथिरी असे त्यांचे पूर्ण नाव असून ते अक्किथम या नावाने सुपरिचित आहेत. कवितेबरोबरच त्यांनी नाटय़, टीकात्मक निबंध, बालसाहित्य, लघुकथा आदी साहत्यिाच्या क्षेत्रात आपला विशेष ठसा उमटविला आहे.
अक्किथम यांची ५५ पुस्तके प्रकाशित झाली असून त्यापैकी ४५ कवितासंग्रह आहेत, त्यामध्ये खंडकाव्य, कथाकाव्य, चरित्रकाव्य आणि गाणी यांचा समावेश आहे. वीरवदम, बळिदर्शनम, निमिषा क्षेत्रम, अमृत खतिका, अक्किथम कवितका, अंतिमहाकालम ही त्यांची गाजलेली निर्मिती आहे.
अक्किथम यांना ‘पद्मश्री’ किताबाने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार (१९७३), केरळ साहित्य अकादमी पुरस्कार (१९७२ आणि १९८८), मातृभूमी पुरस्कार, वायलर पुरस्कार आणि कबीर सन्मानानेही सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या साहित्याचा देशी आणि परदेशी भाषांत अनुवाद करण्यात आला आहे.

सिंगापूर-भारताचा संयुक्त हवाई सराव

vdh01 3

सिंगापूरच्या हवाई दलाने भारतासमवेत प्रशिक्षण सरावासाठी प्रगत एफ १६ लढाऊ विमाने तैनात केली असून भारतीय हवाई दलाची सहा सुखोई लढाऊ विमाने या प्रशिक्षणात सहभागी होत आहेत.
पश्चिम बंगालमधील कलाईकुडा हवाई दल केंद्रावर संयुक्त लष्करी सराव करण्यात येणार असून रिपब्लिक ऑफ सिंगापूर एअरफोर्स व भारतीय हवाईदल यांचा त्यात समावेश आहे.
१२ डिसेंबपर्यंत हा सराव चालणार आहे. संयुक्त लष्करी कवायतींचे हे दहावे वर्ष असून यात हवाई सागरी प्रशिक्षणाचा समावेश आहे. भारतीय नौदलाची यंत्रणा यात वापरली जाणार आहे, असे सिंगापूरच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. रिपब्लिक ऑफ सिंगापूर एअरफोर्सने सहा एफ १६ सी/डी लढाऊ विमाने तैनात केली असून भारतीय हवाई दलाने सहा एसयू ३० एमके आय लढाऊ विमाने तैनात केली आहेत.
पहिला संयुक्त सराव हा २००८ मध्ये झाला होता. नंतर सरावाचे कार्यक्रम वाढत गेले. भारतीय हवाई दलाच्या पूर्व कमांडचे एअर मार्शल व्ही. आर. चौधरी यांनी सांगितले की, या सरावातून दोन्ही देशांची हवाई दले व्यावसायिक कौशल्ये मिळवू शकतील. दोन्ही देशात संयुक्त सरावासाठी पहिल्यांदा २००७ मध्ये करार करण्यात आला नंतर त्याला मुदतवाढ देण्यात आली.

आर्थिक विकासासाठी भारत श्रीलंकेला देणार ४५ कोटी डॉलर्सचे कर्ज

modi rajapakshe

श्रीलंकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष गोताबाया राजपक्षे यांच्याबरोबर चर्चा केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीलंकेला ४५ कोटी डॉलर्सच कर्ज देण्याचा निर्णय जाहीर केला. श्रीलंकेच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी पंतप्रधान मोदींनी कर्जाद्वारे आर्थिक मदतीचा हा निर्णय घेतला आहे.
४५ कोटी डॉलर्समध्ये दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी पाच कोटी डॉलर्सचा समावेश आहे. गोताबाया राजपक्षे आणि नरेंद्र मोदी यांच्यामध्ये समाधानकारक चर्चा झाली. राजपक्षे भारत दौऱ्यावर आले आहेत. अध्यक्षपदी निवड झाल्यानंतरचा राजपक्षे यांचा हा पहिलाच परदेश दौरा आहे.
श्रीलंकेतील तामिळ जनतेच्या विषयासह सुरक्षा, व्यापार आणि मच्छीमारांच्या मुद्यावर या बैठकीत चर्चा झाली. विकासाच्या मार्गावर श्रीलंकेला पूर्ण सहकार्य करण्याचे मोदींनी आश्वासन दिले आहे. श्रीलंकेतील विविध विकास प्रकल्पांसाठी ४० कोटी डॉलर्स तर दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी पाच कोटी डॉलर्स देण्यात येणार आहेत.

श्रीलंकेचे अध्यक्ष राजपक्ष यांची निवड झाल्यानंतरचा भारतात पहिला परदेश दौरा

Rajpakshe

श्रीलंकेचे नवे अध्यक्ष गोताबाया राजपक्ष भारत दौऱ्यावर आले आहेत. हा त्यांचा अध्यक्षपदी निवड झाल्यानंतरचा पहिला परदेश दौरा आहे. आपल्या पहिल्या परदेश दौऱ्यासाठी त्यांनी भारताची निवड केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर त्यांची आज(शुक्रवार) द्विपक्षीय चर्चा पार पडली. यावेळी दहशतवादाबरोबच व्यापारासह अनेक मुद्यांवर चर्चा करण्यात आली. यानंतर आयोजित संयुक्त पत्रकारपरिषदेत त्यांनी श्रीलंकेच्या ताब्यात असलेल्या भारतीय बोटींची मुक्तता केली जाणार असल्याचे घोषणा केली. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, भारत सर्वप्रकारे दहशतवादाचा विरोध करत आहे व दहशतवादाविरोधातील आमची लढाई सुरूच राहील. या लढाईत भारत श्रीलंकेला साथ देत राहील, असे सांगितले.

१५० देशांच्या जीडीपीपेक्षाही मोठी आहे मुकेश अंबानींची रिलायन्स

Mukesh ambani

रिलायन्स इंडस्ट्रीच्या मार्केट कॅपनं १० लाख कोटी रूपयांचा टप्पा पार केला. गेल्या ३० वर्षांमध्ये कंपनीच्या बाजार मूल्यात ६० हजार टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये रिलायन्स तेल आणि गॅस सेक्टरमधील दिग्गज कंपनी म्हणून पुढे आली आहे. त्यानंतर आता डिजिटल आणि रिटेल क्षेत्रातही कंपनी पुढे आली आहे. त्यांच्या कंपनीने इतका मोठा पल्ला गाठला आहे की ती आता १५० देशांच्या जीडीपीपेक्षागी मोठी झाली आहे.
२०१९ च्या आर्थिक वर्षाच्या तिमाहित रिलायन्सनं १० हजार कोटी रूपयांचा नफा कमावला होता. २ जानेवारी १९९१ ते २९ नोव्हेंबर २०१९ दरम्यान रिलायन्सच्या मार्केट कॅपमध्ये ६०० टक्क्यांची वाढ झाली आहे. तर दुसरीकडे एल अँड टी, अशोक लेलँड, टाटा स्टील, सिअॅट यांसारख्या कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये १५ ते २०५ टक्क्यांची वाढ झआली आहे.
आर्थिक वर्ष २००९ मध्ये कंपनीवर कंसॉलिडेटेड डेट ७२ हजार २५६ रूपयांचे होते. ३१ मार्च २०१९ पर्यंत ते वाढून २.८७ लाख कोटी रूपये इतके झाले आहे. कंपनीनं हे कर्ज करण्याचं आश्वासनही दिलं आहे. २०२१ पर्यंत कंपनी कर्जमुक्त होईल, असा दावाही करण्यात आला आहे. तसंच आतापर्यंत कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीतही ४० टक्क्यांची वाढ झाली आहे.

अर्थव्यवस्थेत तेजी नाहीच;जीडीपी ४.५ टक्क्यांवर

GDP साठी इमेज परिणाम

भारतीय अर्थव्यवस्थेसाठी आणखी एक चिंताजनक आकडेवारी समोर आली आहे. चालू आर्थिक वर्षातील दुसरी तिमाही म्हणजे जुलै ते सप्टेंबर या कालावधीत जीडीपी दर घसरून ४.५ टक्क्यांवर आला आहे. गेल्या २६ तिमाहींमध्ये हा भारतीय अर्थव्यवस्थेचा सर्वात निचांकी जीडीपी दर आहे. एका वर्षापूर्वीपर्यंत हा दर ७ टक्के होता, तर यापूर्वीच्या तिमाहीत ५ टक्के दर होता. याशिवाय ऑक्टोबर महिन्यात ८ कोअर सेक्टरमध्ये औद्योगिक वाढ ही ५.८ टक्के राहिली.
जीडीपी दर घसरण्यासोबतच महसूल तूटही वाढली आहे. २०१८ ते २०१९ च्या पहिल्या ७ महिन्यात म्हणजे एप्रिल ते ऑक्टोबर दरम्यान महसूल तूट चालू आर्थिक वर्षात लक्ष्य ठेवलं होतं, त्यापेक्षा जास्त झाली आहे. पहिल्या ७ महिन्यात महसूल तूट ७.२ ट्रिलियन रुपये (१००.३२ अब्ज डॉलर) राहिली, जी अर्थसंकल्पातील लक्ष्याच्या १०२.४ टक्के जास्त आहे.

नियमित अपडेट मिळवण्यासाठी Mission MPSC ला फेसबुक, टेलिग्राम आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा.

Share This Article