⁠
Uncategorized

चालू घडामोडी – ३१ ऑगस्ट २०१६

देश-विदेश

भारत-अमेरिका सामरिक सहकार्य करार
# भारत व अमेरिका यांच्यात द्विपक्षीय सामरिक सहकार्य करार झाला असून त्यामुळे या दोन्ही देशांच्या सेनादलांना एकमेकांचे तळ दुरुस्ती व इतर कारणांसाठी वापरण्याबरोबरच रसद पुरवठय़ाचा मार्ग मोकळा झाला आहे. ‘लॉजिस्टिक्स एक्स्चेंज मेमोरँडम ऑफ अ‍ॅग्रिमेंट (लिमोआ)’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या करारावर संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर व अमेरिकेचे संरक्षणमंत्री अ‍ॅश्टन कार्टर यांनी सोमवारी अमेरिकेतील पेंटॅगॉन येथे स्वाक्षऱ्या केल्या.

[edsanimate_start entry_animation_type= “fadeIn” entry_delay= “0” entry_duration= “1” entry_timing= “linear” exit_animation_type= “” exit_delay= “” exit_duration= “” exit_timing= “” animation_repeat= “infinite” keep= “yes” animate_on= “load” scroll_offset= “” custom_css_class= “”]स्पर्धा परीक्षांचे अपडेट आपल्या मोबाईलवर मोफत मिळवा! अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.[edsanimate_end]

ऑल इंडिया रेडिओवर लवकरच बलुचीमध्येही ऐकायला मिळणार कार्यक्रम
# पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून केलेल्या आपल्या भाषणात बलुचिस्तानचा उल्लेख केल्यानंतर पाकिस्तानसह अनेक देशांच्या भुवया उंचावल्या होत्या. मोदींनी बलुचिस्तानातील नागरिकांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात वाचा फोडल्यानंतर बलुची नागरिकांना मोदींचे आभार तर मानलेच शिवाय बलुचिस्तानाच्या स्वातंत्र्यासाठी मदत करण्याचे आवाहनही केले जात आहे. आता बलुची नागरिकांसाठी आणखी एक आनंदाची बातमी असून ऑल इंडिया रेडिओने (एआयआर) बलुची भाषेत कार्यक्रम सादर करण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच एआयआरच्या वतीने बलुची भाषेत एक बुलेटिन सुरू होण्याची शक्यता असल्याचे प्रसारभारतीच्या सूत्रांनी माहिती दिली. या प्रकरणी एएनआय या वृत्तसंस्थेने ट्विट केले आहे.

किमान वेतन प्रतिदिन ३५० रुपये!
# आर्थिक आणि कामगार धोरणांविरोधात कामगार संघटनांनी शुक्रवारी देशव्यापी संपाची हाक दिली असताना केंद्र सरकारने बिगरशेती क्षेत्रातील अकुशल कामगारांच्या किमान वेतनात प्रतिदिन २४६ रुपयांवरून ३५० रुपये इतकी वाढ करण्याची घोषणा मंगळवारी केली. तसेच गेल्या दोन वर्षांचा बोनस सुधारित नियमांनुसार देणार असल्याचे केंद्राने स्पष्ट केले. या घोषणेनंतर कामगार संघटना प्रस्तावित संप मागे घेतील, अशी अपेक्षा अर्थमंत्री अरूण जेटली यांनी व्यक्त केली असली तरी या संघटना संपावर ठाम आहेत.

राज्य

देशातील दहा हागणदारीमुक्त शहरांमध्ये महाराष्ट्रातील पाचचा समावेश
# केंद्र सरकारच्या नगरविकास मंत्रालयाने जाहीर केलेल्या देशातील पहिल्या दहा हागणदारीमुक्त शहरांच्या यादीत महाराष्ट्रातल्या पाच शहरांचा समावेश असल्याबद्दल आनंद व्यक्त करतानाच या शहरांसह हे अभियान यशस्वीपणे राबविणाऱ्या राज्यातील यंत्रणेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन केले आहे. हागणदारीमुक्त झालेल्या देशातील पहिल्या दहा शहरांची यादी केंद्रीय नगरविकास मंत्रालयाने जाहीर केली आहे. त्यात राज्यातील कागल, मुरगूड, पन्हाळा (जि.कोल्हापूर), वेंगुर्ला (जि.सिंधुदुर्ग), पाचगणी (जि.सातारा) या पाच शहरांचा समावेश आहे. राज्यस्तरीय यंत्रणेकडून याबाबतच्या कार्यवाहीचे मूल्यांकन झाल्यानंतर केंद्र शासनाने नियुक्त केलेल्या त्रयस्थ संस्थेकडून तपासणी झाल्यानंतर ही शहरे हागणदारीमुक्त झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे. यानंतरच्या टप्प्यात राज्यातील दहा शहरांची या संस्थेकडून तपासणी सुरु आहे. येत्या २ ऑक्टोबरपर्यंत राज्यातील १०० शहरे हागणदारीमुक्त होणार आहेत. राज्यात नगरविकास विभागाकडून या अभियानाची काटेकोर आणि प्रभावी अंमलबजावणी सुरु असल्याने पुढील वर्षांत पूर्ण नागरी भाग हागणदारीमुक्त होण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल टाकले गेले आहे.

देशातील ‘अॅट्रॉसिटी’चे चार टक्के गुन्हे महाराष्ट्रात
# राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या (अ‍ॅट्रॉसिटी) गैरवापराबद्दल केलेल्या विधानानंतर महाराष्ट्रात उलटसुलट चर्चा सुरू झाली असतानाच आकाराने मोठय़ा असलेल्या अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात या कायद्याचा एकूणच वापर कमी झाल्याची अधिकृत आकडेवारी प्रसिद्ध झाली आहे. केंद्र सरकारने मंगळवारी सायंकाळी जाहीर केलेल्या अहवालानुसार, २०१५मध्ये महाराष्ट्रात दलित अत्याचारांच्या १८१६ घटना घडल्या आणि त्यापैकी १७९५ घटनांमध्ये भारतीय दंडविधानाबरोबरच (आयपीसी) ‘अ‍ॅट्रॉसिटी’ची कलमे लावली आहेत. त्यातही फक्त २९० घटनांमध्ये फक्त ‘अ‍ॅट्रॉसिटी’ची कलमे लावली आहेत. देशभराच्या तुलनेत राज्यातील घटनांचे प्रमाण चार टक्के आहे.

क्रीडा

चार दिवसीय कसोटीला ‘बीसीसीआय’चा विरोध
# भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी कसोटी क्रिकेटमधील चार दिवसीय कसोटी सामन्यांना आणि टू-टायर टेस्ट सिस्टमला विरोध केला आहे. कसोटी सामन्यांना उपस्थित राहणाऱया प्रेक्षकांची घटती संख्या यावर कसोटी सामने चार दिवसांचे खेळवावेत, हा उपाय असू शकत नाही, असे मत अनुराग ठाकूर यांनी व्यक्त केले. कसोटी क्रिकेटच्या लोकप्रियतेत वाढ करण्यासाठी त्यावर केला जाणारा उपाय हा क्रिकेट खेळाला हानी पोहोचविणारा नाही, यावर आपण ठाम नसताना असे उपाय करणे योग्य ठरणार नाही. माझ्यामते अशा उपायांचा आपण विचारही करू नये, असेही ते पुढे म्हणाले.

योगेश्वर दत्तने रौप्यपदक नाकारले
# रिओ ऑलिम्पिकमध्ये भारतीय कुस्तीपटू योगश्वर दत्तची निराशा झाली असली तरी लंडन ऑलिम्पिकमध्ये त्याला मिळालेले कांस्यपदक रौप्य पदकात रुपांतरीत होण्याची शक्यता असताना योगेश्वरने मात्र हे पदक नाकारले आहे. २०१२ मध्ये लंडन ऑलिम्पिकमध्ये योगेश्वरने कांस्य पदक पटकावले होते. या लढतीत रौप्य पदक मिळवलेल्या रशियन कुस्तीपटूची उत्तेजक चाचणी पॉझिटिव्ह आल्याने त्याचे हे पदक योगेश्वरला मिळण्याची शक्यता निर्माण झाली. त्यामुळे सर्वांनी योगेश्वरचे कौतुक देखील केले. योगेश्वरने बुधवारी याबाबत बोलताना ‘जे नशिबात लिहीलेले असते तेच होते’, अशी प्रतिक्रिया देऊन आपल्याला मिळणारे रौप्यपदक राष्ट्राला समर्पित करत असल्याची प्रतिक्रिया दिली होती. मात्र, आज योगेश्वरने आपण रौप्यपदक नाकारात असल्याचे विधान सोशल मीडियावर अकाऊंट्सवर केले आहे.

वन डेत इंग्लंडचा सर्वाधिक धावांचा विश्वविक्रम
# एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक धावांचा विक्रम इंग्लंडच्या खात्यावर जमा झाला आहे. पाकिस्तानविरुद्धच्या तिस-या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडने ५० षटकांमध्ये ३ गडींच्या मोबदल्यात ४४४ धावा केल्या आहेत. जॉस बटलने ५१ चेंडूत नाबाद ९० धावांची तुफानी खेळी केल्याने इंग्लंडला हा पल्ला गाठता आला.

[edsanimate_start entry_animation_type= “fadeIn” entry_delay= “0” entry_duration= “1” entry_timing= “linear” exit_animation_type= “” exit_delay= “” exit_duration= “” exit_timing= “” animation_repeat= “infinite” keep= “yes” animate_on= “load” scroll_offset= “” custom_css_class= “”]स्पर्धा परीक्षांचे अपडेट आपल्या मोबाईलवर मोफत मिळवा! अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.[edsanimate_end]

Related Articles

Back to top button