Current Affairs 4 April 2018
1) देशातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या यादीत पुणे विद्यापीठ
देशातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठांची २०१८ सालची यादी (राष्ट्रीय संस्थात्मक नामांकन) केंद्रीय मनुष्यबळ संसाधन विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी मंगळवारी नवी दिल्ली येथे जाहीर केली. या यादीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने देशात नववे स्थान पटकावले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे पहिल्या दहा विद्यापीठांच्या यादीत स्थान मिळवणारे महाराष्ट्रातील एकमेव विद्यापीठ ठरले आहे. देशातील शैक्षणिक संस्थांची क्रमवारी ठरवताना विद्यापीठे, सर्व संस्था, अभियांत्रिकी, महाविद्यालये, व्यवस्थापन, फार्मसी, वैद्यकीय, स्थापत्यशास्त्र व कायदा असे एकंदर नऊ गट निश्चित करण्यात आले होते. या यादीत बंगळुरूमधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या संस्थेने गेल्या वर्षीप्रमाणेच पहिला क्रमांक मिळवला आहे.
दहा सर्वोत्कृष्ट विद्यापीठ
– इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस (बंगळुरू)
– जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी (नवी दिल्ली)
– बनारस हिंदू युनिव्हर्सिटी (वाराणसी)
– अण्णा युनिव्हर्सिटी (चेन्नई)
– युनिव्हर्सिटी ऑफ हैदराबाद (हैदराबाद)
– जादवपूर युनिव्हर्सिटी (कोलकाता)
– युनिव्हर्सिटी ऑफ दिल्ली (दिल्ली)
– अमृता विश्व विद्यापीठ (कोईमतूर)
– सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (पुणे)
– अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटी (अलीगढ)
2) समुद्रकिनाऱ्यावर अक्षय कुमारने बांधून दिले ‘टॉयलेट’
अभिनेता अक्षय कुमारने आता मुंबईतील जुहू समुद्रकिनाऱ्यावर स्वखर्चातून फिरते शौचालय बांधून दिले आहे. मुंबई महानगरपालिकेच्या के वाॅर्डचे सहआयुक्त प्रशांत गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय कुमारने जुहू समुद्रकिनाऱ्यावर शौचालय बांधण्यासाठी पुढाकार घेत अर्ज केला होता. त्यानुसार ४ दिवसांपूर्वी सुमारे १० लाख रुपये खर्चून फिरते शौचालय उभारण्यात आले आहे. हे शौचालय लोकांसाठी नि:शुल्क उपलब्ध असेल.
3) २१ व्या राष्ट्रकूल स्पर्धेला प्रारंभ
ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट शहरात बुधवारपासून २१ व्या राष्ट्रकूल स्पर्धेला प्रारंभ झाला. भारतीय वेळेनुसार दुपारी २.३० वाजता उदघाटन सोहळा सुरू झाला.विविध देशांच्या संचालनात भारतीय चमू ३८ व्या क्रमांकावर आला. रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकणारी पी.व्ही. सिंधू भारताकडून ध्वजवाहक होती. २०१४ मध्ये राष्ट्रकूल स्पर्धा आयोजित करणारा स्कॉटलंडचा संघ परेडमध्ये सर्वात आधी तर शेवटच्या म्हणजेच ७१ व्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा संघ सहभागी झाला होता. या स्पर्धेत भारताचे २१८ खेळाडू १५ क्रीडा प्रकारात सहभागी होणार आहेत. परदेशात आयोजित राष्ट्रकुल स्पर्धेत सहभागी होणारा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा संघ आहे. २०१४ मध्ये ग्लासगोत झालेल्या स्पर्धेत भारताचे २१५ खेळाडू सहभागी झाले होते
53 देशांचे ७१ संघ गोल्ड कोस्टमध्ये होत असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत घेत आहेत सहभाग.
6600 खेळाडू या स्पर्धेत पदकांसाठी झुंजतील. स्पर्धा १२ दिवसांपर्यंत चालणार आहे.
06 लाख ७२ हजार प्रेक्षक गोल्ड कोस्ट शहराला भेट देतील.
101 पदके जिंकली होती भारताने २०१० मध्ये. परदेशात भारताने २००२ मध्ये ६९ पदके जिंकली होती.
४) तुर्कीतील पहिला अणुऊर्जा निर्मिती प्रकल्प
तुर्कीतील अंकारा येथील भूमध्य मर्सिन विभागात अणुऊर्जा निर्मिती प्रकल्पाचा शुभारंभ रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या उपस्थितीत करण्यात आला. तुर्कीतील हा पहिला अणुऊर्जा निर्मिती प्रकल्प आहे. अक्कूयू अणुऊर्जा निर्मिती प्रकल्प असे याचे नाव आहे. तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तैयप एर्दोगन यांनी व्हिडिआे लिंक क्लिक करून राष्ट्राध्यक्ष भवनातून या प्रकल्पाचे उद््घाटन केले. तुर्कीमधील विजेच्या एकूण गरजेपैकी १०% वीजनिर्मिती येथे होणार आहे. तुर्कीमध्ये ऊर्जास्रोतांची वाणवा आहे. आधुनिक तुर्कीच्या दिशेने देशाची वाटचाल सुरू झाली असून २०२६ पर्यंत देश ऊर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होईल, अशी आशा राष्ट्राध्यक्षांनी वर्तवली आहे. रशियाच्या अणुऊर्जा विभाग असलेल्या रोझटॉमने तुर्कीतील अणुऊर्जा प्रकल्पाची बांधणी केली आहे. येथे ४ युनिट असून प्रत्येकी १,२०० मेगावॅट ऊर्जानिर्मितीची क्षमता आहे. २०२३ पर्यंत चारही युनिटमधुन ऊर्जानिर्मिती सुरू होईल. तुर्कीतील स्थानिक भागीदारांकडून रशियाने ४९% निधी उभारल्याने हा प्रकल्प वेळेत सुरू झाला.
५) ‘सार्जंट स्टबी : अॅन अमेरिकन हीरो’ : श्वानावर चित्रपट
पहिल्या महायुद्धादरम्यान अमेरिकन सैन्यातील हीरो ठरलेल्या स्टबी या श्वानावर बनवण्यात आलेला चित्रपट १३ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. स्टबीने युद्धावेळी १७ मोहिमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. हल्ला होत असताना तो सैनिकांना सतर्क करत असे व जखमी सैनिकांना शोधण्यासह शत्रूंचे हेर पकडण्यासाठीही त्याने मदत केली.वास्तविक पाहता तो भटका कुत्रा होता. परंतु कालांतराने तो सैन्याचा हीरो बनला. १९१७ च्या उन्हाळ्यात अमेरिकेचे सैन्य न्यू हेवनमधील येले येथे तैनात होते. या ठिकाणी १०२ इन्फंट्रीची २६ वी तुकडी युद्धासाठी फ्रान्सला जाण्याच्या तयारीत होती. यादरम्यान रॉबर्ट कॉनरॉयची नजर एका कुत्र्याच्या पिलावर पडली. परेडमध्ये सॅल्यूट करणाऱ्या सैनिकांची तो नक्कल करत होता. कॉनरॉय यांनी त्याला सोबत घेतले व त्याला “स्टबी’ असे नाव दिले. काही आठवड्यातच तुकडीला फ्रान्सला जायचे होते. कॉनरॉय यांनी स्टबीला एका मोठ्या कोटमध्ये लपवले आणि जहाजात जाऊन बसले. कमांडरला याची माहिती मिळाली. पण स्टबीने त्याला सॅल्यूट केले आणि कमांडरने स्टबीला सोबत घेण्याची परवानगी दिली. स्टबी जवळपास १८ महिन्यांपर्यंत युद्धभूमीवर राहिला. सैनिकांपर्यंत येणारे मिसाइल शेल, मस्टर्ड गॅसच्या हल्ल्याच्या आधीच तो सैनिकांना सतर्क करत असे. अशाच प्रकारच्या एका गॅस हल्ल्यात त्याने पूर्ण शहराला सतर्क केले होते. त्याचमुळे एका महिलेने त्याच्यासाठी कोट बनवला होता. संपूर्ण आयुष्यभर स्टबीने तो कोट परिधान केला. इतकेच नव्हे तर तो अमेरिकन, जर्मन आणि फ्रान्सच्या सैनिकांच्या आवाजातील फरक अचूक ओळखत होता. हेरगिरी करणाऱ्या जर्मन व्यक्तीच्या मुसक्या आवळल्या जात नाहीत तोपर्यंत स्टबीने त्याला पकडून ठेवले होते. स्टबी जखमी सैनिकांना शोधत असे व त्यांना मदत मिळेपर्यंत तो तेथून हटत नव्हता. एका हल्ल्यात तो जखमी झाला. १९२६ मध्ये त्याची मृत्यू झाली.