महाराष्ट्र
विनाहेल्मेट गाडी चालवल्यास आता ५०० रुपये दंड, दिवाकर रावतेंचा नवा आदेश
# काही दिवसांपूर्वी ‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’ असा आदेश काढणारे राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी आता दुचाकीस्वारांनी हेल्मेट घालण्यास प्रवृत्त करण्यासाठी नवा आदेश काढला असून, त्यामध्ये दंडाच्या रकमेमध्ये वाढ करण्यात आली आहे. यापुढे विनाहेल्मेट गाडी चालवल्यास ५०० रुपये दंड करण्यात येणार आहे. त्याचबरोबर गाडीवर फॅन्सी नंबरप्लेट लावल्यास १००० रुपये दंड आकारण्यात येईल. दिवाकर रावते यांनी गुरुवारी विधानसभेत केलेल्या निवेदनात याबद्दल माहिती दिली.
क्रीडा
सौरव गांगुलीच्या सर्वोत्तम क्रिकेट संघात केवळ दोन भारतीयांचा समावेश
# माजी क्रिकेटपटूंनी आपल्या आवडीच्या ११ खेळाडूंची निवड करून सर्वोत्तम क्रिकेट संघ जाहीर करण्याच्या ट्रेंडला फॉलो करीत आता भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने देखील आपल्या ‘ऑल टाईम बेस्ट-XI’ म्हणजेच सर्वोत्तम संघाची निवड केली आहे. गांगुलीने आपल्या ११ जणांच्या संघात भारताच्या दोन माजी फलंदाजांना स्थान दिले आहे, तर ऑस्ट्रेलियाच्या रिकी पाँटिंग याची गांगुलीने आपल्या संघाचा कर्णधार म्हणून निवड केली आहे. भारतीय क्रिकेटवीर सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड या आपल्या माजी सहकाऱयांना गांगुलीने आपल्या सर्वोत्तम संघात समाविष्ट केले आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज मॅथ्यू हेडन आणि इंग्लंडचा कर्णधार अॅलिस्टर कूक याची निवड गांगुलीने आपल्या संघाचे सलामीवीर म्हणून केली आहे. भारताचा माजी सलामवीर विरेंद्र सेहवागला गांगुलीने आपल्या संघात स्थान दिले नसल्याचे आश्चर्य व्यक्त केले केले. त्यावर गांगुलीने स्पष्टीकरण देखील दिले. तो म्हणाला की, सेहवागची सलामीवीर म्हणून निवड करण्यासाठी मी उत्सुक होतो. पण अॅलिस्टर कूकने आपल्या उमेदीच्या काळात दमदार कामगिरी केली आहे. त्यामुळे मी सलामी जोडीसाठी डावखुऱया फलंदाजाची निवड करण्याचे ठरविले.
अर्थव्यवस्था
GST Bill : ‘जीएसटी’चा मार्ग मोकळा!
# गेल्या अनेक वर्षांपासून रेंगाळलेले आणि देशाच्या अप्रत्यक्ष कररचनेवर दूरगामी परिणाम करणाऱ्या वस्तू आणि सेवा विधेयकाला (जीएसटी) बुधवारी अखेर राज्यसभेत विनासायास मंजुरी मिळाली. आतापर्यंत टोकाचा विरोध करून अडथळे आणणाऱ्या काँग्रेसने काही अटी घालत पाठिंबा दिल्याने मंजुरीचा मार्ग प्रशस्त झाला. त्यामुळे अण्णा द्रमुकच्या सभात्यागाला फारसे महत्त्व उरले नाही. जीएसटीला मिळालेला हिरवा कंदील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी निर्णायक ठरण्याची शक्यता असली तरी त्याच्या अंमलबजावणीमध्ये बोचरे काटे कायमच असतील. विशेषत: राज्यांच्या वेगवेगळ्या हितसंबंधांना सांभाळून करांचे दर सहमतीने ठरविताना सरकारच्या नाकीनऊ येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
देशात 40 कोटी कुशल मनुष्यबळ निर्मितीचे लक्ष्य
# लंडन: भारतातील कुशल मनुष्यबळाची गरज भागविण्यासाठी केंद्र सरकारच्या ‘स्किल इंडिया‘ उपक्रमाअंतर्गत येत्या काही वर्षात 40 कोटी कुशल मनुष्यबळाची निर्मिती केली जाणार आहे, अशी माहिती भारताचे ब्रिटनमधील उच्चायुक्त नवतेज सिंग सरना यांनी दिली आहे. “सत्तर वर्षापुर्वी भारताच्या अस्तित्वाविषयी अनेकांनी प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. परंतु सर्वसमावेशकता, साधेपणा आणि सत्य या तीन गोष्टींच्या आधारावर भारताने गेल्या सत्तर वर्षात स्वतःला सिद्ध केले आहे.आम्ही सर्व प्रकारच्या आव्हानांना उत्तर देण्यासाठी आर्थिक विकासाची दिशा स्पष्ट केली असून, त्या मार्गाने प्रयत्न सुरु आहेत.
आठ टक्के विकास दर शक्य
# आर्थिक सुधारणांची प्रक्रिया कायम राहिली नाही तर भारतात दिसलेली आर्थिक उभारी अल्पजीवी ठरेल, असे भाकीत वर्तवितानाच, पतविषयक आणि वित्तीय धोरणांच्या पूरकतेद्वारे देशाला आठ टक्के विकास दर गाठता येऊ शकेल, असा विश्वास ‘एस अँड पी’ या जागतिक पतमानांकन संस्थेने बुधवारी व्यक्त केला. रोडावलेली खासगी गुंतवणूक, फुगलेल्या बुडीत कर्जामुळे डळमळलेला बँकांचा ताळेबंद या थंड बस्त्यात पडलेल्या मुद्दय़ांना भारताला आता निकाली काढावेच लागेल, असे स्पष्ट करताना या पतमानांकन संस्थेने देशातील पायाभूत सेवा क्षेत्रावर अधिक भर देण्याची गरज व्यक्त केली आहे. जागतिक अर्थव्यवस्थेत मंदीचे वातावरण असताना आणि अनेक विकसनशील देशांमध्ये बिकट अर्थस्थिती असताना भारताने चीनला मागे टाकून जगातील एक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून मान मिळविल्याचा गौरवही पतसंस्थेने केला आहे. मात्र हे सारे भारतासाठी तात्पुरते ठरण्याची भीती व्यक्त करत आर्थिक सुधारणांना वेग देण्याची आवश्यकता अमेरिकास्थित ‘एस अँड पी’ने तिच्या ताज्या अहवालात मांडली आहे.
सेवा क्षेत्राची तिमाही उच्चांकी कामगिरी
# देशातील सेवा क्षेत्राने जुलैमध्ये गत तीन महिन्यांच्या तुलनेत सरस कामगिरी साधली आहे. मागणी कमी असली तरी सेवा क्षेत्रातील उद्योगांमध्ये व्यावसायिक हालचाली वाढल्या असल्याचे निरीक्षण यानिमित्ताने नोंदविले गेले आहे. निक्केई इंडिया सेवा व्यवसाय निर्देशांक (मार्किट) जुलैमध्ये ५१.९ टक्क्यांवर गेला आहे. आधीच्या, जूनमध्ये तो ५०.३ टक्के होता. निर्देशांकाचा ५० टक्क्यांखालील स्तर हा क्षेत्राचा प्रवास सुमार गृहीत धरला जातो. जुलैच्या समाधानकारक सेवा क्षेत्राच्या कामगिरीने चालू आर्थिक वर्षांच्या दुसऱ्या तिमाहीची सुरुवात सकारात्मक झाल्याचे मानायला हरकत नाही, असे मार्किटचे अर्थतज्ज्ञ पॉलयान्ना डे लिमा यांनी म्हटले आहे. सेवा क्षेत्राची मागणी वाढल्याचे हा निर्देशांक वर्तवितो, असेही ते म्हणाले. अर्थव्यवस्थेवरील महागाई व रोजगाराबाबतची स्थिती अद्यापही चिंताजनक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
‘एनपीएस’मध्ये ७५ टक्क्यांपर्यंत समभाग गुंतवणुकीला मुभा!
# निवृत्तिवेतन निधीची नियंत्रक असलेल्या ‘पीएफआरडीए’ने आगामी महिनाभरात गुंतवणूकदारांना ७५ टक्क्यांपर्यंत निधी समभागसंलग्न पर्यायात गुंतविण्याची मुभा देणाऱ्या दोन नवीन योजना आणण्याचा मानस स्पष्ट केला आहे. राष्ट्रीय पेन्शन प्रणालीत (एनपीएस) गुंतवणूकदारांना त्यांच्या मासिक योगदानांतून सध्या कमाल ५० टक्क्यांपर्यंत निधी समभागांत गुंतविता येतो. तथापि, ही मुभा ७५ टक्क्यांपर्यंत वाढविणाऱ्या आणि आक्रमक (अॅग्रेसिव्ह) व संवर्धन (कन्झव्र्हेशन) असे दोन पर्याय खुले असलेली योजना आणली जाईल, असे पीएफआरडीएचे अध्यक्ष हेमंत कॉन्ट्रॅक्टर यांनी सांगितले. आक्रमक पर्यायात गुंतवणूकदारांच्या योगदानातील ७५ टक्के निधी समभागांमध्ये गुंतविला जाईल, ज्याचे प्रमाण गुंतवणूकदारांचे वय जसे वाढत जाईल तसे उत्तरोत्तर कमी होईल. त्या उलट संवर्धन पर्याय निवडणाऱ्यांचा २५ टक्के निधी समभागांत गुंतविला जाईल आणि त्याचे प्रमाणही वयपरत्वे घटत जाईल, असे कॉन्ट्रॅक्टर यांनी स्पष्ट केले.